‘पंढरपूरच्या विठुरायाचे वैद्य’ अशी ओळख असलेल्या नरसिंग महाराजांचे समाधी मंदिर अकोट येथे आहे. शेगावच्या गजानन महाराजांसाठी बंधूस्वरूप असलेल्या नरसिंग महाराजांवर विदर्भातील असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. त्यांनी तिरडीवर झोपवलेल्या मातेला पुन्हा जिवंत केल्याची तसेच समाधी घेण्यापूर्वी आपल्याला प्राप्त असलेल्या अष्टसिद्धी गजानन महाराजांना प्रदान केल्याची आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. गजानन महाराजांसह अनेक संतांच्या उपस्थितीत नरसिंग महाराजांना समाधी देण्यात आली होती. कार्तिक महिन्यात त्यांच्या मंदिराच्या परिसरात विदर्भातील सर्वाधिक काळ म्हणजे दीड महिना चालणारी यात्रा भरते.
अकोटपासून नऊ किमी अंतरावर असलेले जळगाव नहाटे हे नरसिंग महाराजांचे मूळ गाव आहे. या गावातील वतनदार कुटुंबातील पुंजाजी पाटील यांना यमाबाई आणि राजूबाई या दोन पत्नी होत्या. १८०५ मध्ये राजूबाईंच्या पोटी नरसिंग महाराजांचा जन्म झाला. बालपणापासूनच ते पंढरपूह, देहू, आळंदीच्या वाऱ्या करीत. दगडांना देव मानून ते पूजा करत असत. मोहनाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना तीन अपत्ये होती.
तालुक्यातील उमरा गावात लोण्याचा मोठा बाजार भरत असे. नरसिंग महाराज तेथे लोणी विकण्यासाठी जात. तेथे त्यांची ओळख कुवत शाहअली मिया या मुस्लिम संताशी झाली. नरसिंग महाराजांनी त्यांना आपले गुरू मानले. ते गुरुंसमोर २१ दिवस अन्न-पाण्याशिवाय एका पायावर उभे राहिले होते. त्यानंतर गुरूंनी त्यांना गुरूपदेश दिल्याचेही सांगण्यात येते.
गुरूंची सेवा करत असताना मातोश्री राजूबाई यांचे सिरसोली गावात देहावसान झाल्याचे नरसिंग महाराजांना समजले. गुरूंच्या आज्ञेने मातेचे अंतिम दर्शन घेण्यासाठी ते सिरसोली येथे गेले. तिरडीजवळ गेल्यावर त्यांनी ‘मला भूक लागली असून काही खाण्यास दे, माझे सर्व हट्ट पूर्ण केलेस. आताच का रागावलीस,’ असे म्हणत मातेच्या मृत शरीरावर अंगारा लावला. त्यावेळी राजूबाई पुन्हा जिवंत झाल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. नरसिंग महाराजांनी पंढरपूरच्या विठोबाच्या पायाची जखमही बरी केल्याची दंतकथा ‘अकोला गॅझेटियर’मध्ये देण्यात आली आहे. ती अशी की एकदा एका नास्तिक व्यक्तीने पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती फोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विठ्ठलाच्या पायातून रक्त येऊ लागले. ते पाहून सर्व भक्तांमध्ये खळबळ माजली. हे कळताच मंदिरात आलेल्या नरसिंग यांनी मूर्तीच्या पायावर औषध लावून पट्टी बांधली. काही वेळातच मूर्तीच्या पायावरील जखम बरी झाली आणि त्याच बरोबर ती नास्तिक व्यक्ती मरण पावली.
नरसिंग महाराज गावातील एका झोपडीत तप करत. गजानन महाराज अनेकदा त्यांना भेटण्यासाठी या झोपडीत येत. ते दोघे आध्यात्मिक चर्चा करत. एके दिवशी गजानन महाराज नरसिंग महाराजांना भेटण्यासाठी अकोटला आले होते. त्यावेळी नरसिंग महाराज गावातील एका विहिरीच्या काठावर बसले होते. गजानन महाराजांनी विहिरीत डोकावून पाहिले असता आतील पाण्याला झरे फुटून ते कारंज्याच्या रूपाने वर येऊ लागले. येथे जणू गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम झाल्याचे सांगत गजानन महाराजांनी या पाण्याने सचैल स्नान केले तसेच विहिरीला ‘मनकर्णिका’ असे नाव दिल्याचे सांगण्यात येते.
नरसिंग महाराजांनी समाधीस्थ होण्यापूर्वी स्वतःच्या समाधी मंदिराचे काम सुरू केले. २८ जानेवारी १८८७ रोजी, माघ शुद्ध पोर्णिमेला ते राहत असलेल्या झोपडीत त्यांचे देहावसान झाले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाला मिरवणुकीने समाधीच्या ठिकाणी आणण्यात आले. येथे तयार करण्यात आलेल्या समाधीत पार्थिव ठेवून त्यावर मीठ व गुलाल टाकण्यात आला. त्यानंतर संतांच्या उपस्थितीत समाधी देण्यात आली. त्यांचे शिष्य मारुती नाईक असलकर यांनी कालांतराने या समाधी मंदिराचे काम पूर्ण केले.
अकोट शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर आहे. तटबंदीमध्ये असलेल्या प्रवेशद्वारातून फरसबंदी प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणाच्या मध्यभागी असलेल्या मंदिराचे रूप काहीसे मशिदीसारखे आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. गर्भगृहाकडील बाजू सोडल्यास सर्व दिशांना सभामंडपात येण्यासाठी प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपातील बाह्यभिंतीत असलेले सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. उंच अधिष्ठानावर असलेले हे समाधी मंदिर अधिष्ठानावरच प्रदक्षिणा मार्ग सोडून बांधलेले आहे. प्रांगणातून तीन पायऱ्या चढून सभामंडपात प्रवेश होतो.
सभामंडपातील सर्व भिंतींवर छताकडील बाजूला अनेक संत महात्म्यांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. येथे असलेल्या एका काचेच्या पेटीत नरसिंग महाराजांच्या पादुका व त्यांनी वापरलेले पागोटे, काठी तसेच इतर वस्तू ठेवलेल्या आहेत.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांवर सुंदर नक्षीकाम व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर नरसिंग महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीच्या डोक्यावर फेटा, हातात काठी व मूर्तीच्या समोरील बाजूस पादूका आहेत. मूर्तीच्या मागील भिंतीत असलेल्या देवकोष्टकात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. याशिवाय गर्भगृहात राधा, कृष्ण, श्रीराम, लक्ष्मण, सीता, मारूती व श्रीदत्त आदी मूर्ती आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर घुमटाकार शिखर आहे. शिखरच्या चारही बाजूंनी मिनारासारखी रचना आहे. मंदिर परिसरात नरसिंग महाराजांच्या मातोश्री राजूबाई, पत्नी मोहनाबाई तसेच शिष्य खिदाजीबुवा यांच्या समाध्याही आहेत. ज्या झोपडीत नरसिंग महाराज तप करत तिचेही ग्रामस्थांनी जतन केले आहे.
या मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. गावातील माहेरवाशिणींचीही नरसिंग महाराजांवर प्रचंड श्रद्धा आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात अकोटहून पंढरपूरला पालखी जाते. कार्तिक महिन्यात मंदिर परिसरात विदर्भातील सर्वात मोठी यात्रा भरते. नरसिंग महाजांनी आपल्या हयातीतच गुरुंच्या नावे ही यात्रा सुरू केल्याचे सांगण्यात येते. दीड महिना चालणाऱ्या या यात्रेदरम्यान पंधरा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतात. कार्तिक वद्य पोर्णिमेला मंदिरात तीर्थस्थापना होते. तीर्थस्थानी गुरूंचे पागोटे असते. द्वितीया व तृतियेला गुरूंच्या पागोट्यांची तख्तावर प्रतिष्ठापना करण्यात येते. चतुर्थीला नरसिंग महाराजांची पालखी गुरुपूजेसाठी (संदल) उमरा येथे जाते. ही पालखी रात्री अकोटला परत आल्यावर उपस्थितांना सुक्या मेव्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात येते. पंचमी आणि षष्ठी हे यात्रेचे मुख्य दिवस असतात. पंचमीला रात्रभर येथे भजन-कीर्तन होते. षष्ठीला सकाळी नरसिंग महाराज व झांजी महाराजांची पालखी गावातून फिरते. दुपारी पालखी मंदिरात आल्यावर गोपालकाला होतो. त्यानंतर भाविकांना भंडाऱ्याचे वाटप केले जाते. सप्तमी ते एकादशीपर्यंत मंदिरात अभिषेक तसेच भजन-कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होतात. त्रयोदशीला गुरूंच्या तख्तासमोर गोपाळकाला झाल्यावर रात्री भजन होते. त्यानंतर या यात्रेचा समारोप होतो. नरसिंग महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तही येथे विविध कार्यक्रम होतात. दररोज सकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत भाविक या मंदिरात दर्शनासाठी येऊ शकतात