वेंकटेश्वर देवस्थान

दाजीपेठ, सोलापूर, ता. जि. सोलापूर

मराठी, तेलुगू आणि कन्नड भाषा बोलल्या जाणाऱ्या सोलापूर शहराचे प्राचीन नाव सोनलपूर असे होते. प्राचीन विहिरीवर सापडलेल्या शिलालेखात या शहराचा उल्लेख संदलपूर असा आला आहे. ब्रिटिश राजवटीत शहराचे नाव सोलापूर प्रचलित झाले. जीआय टॅग (भौगोलिक मानांकन) मिळालेल्या सोलापूरी चादरी व टॉवेल जगभरात प्रसिद्ध आहेत. हा जिल्हा विडी उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. सिद्धेश्वर हे सोलापूर शहराचे ग्रामदैवत आहे. शहरातील दाजीपेठ येथील वेंकटेश्वराचे हे मंदिर प्रसिद्ध आहे. येथील जागृत देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ या अभ्यासपूर्ण ग्रंथात थोर संशोधक रा. चिं. ढेरे यांनी असे नमूद केले आहे की पंढरपूरचा विठ्ठल आणि तिरुपतीचा वेंकटेश हे दोन्ही समधर्मी देव आहेत. दोघेही विष्णूच्या पुराणप्रसिद्ध अवतारांशी अथवा रूपांशी संबंध नसणारे आणि तरीही विष्णुरूप पावलेले आहेत. विठ्ठल हा बाळकृष्ण मानला जातो, तर वेंकटेश हा बालाजी या नावाने ओळखला जातो. विठ्ठलाची पत्नी राधेचे निमित्त सांगून दिंडीरवनात रुसून बसलेली, तर वेंकटेशाची पत्नी भृगूने केलेला अपमान पतीने सोसल्यामुळे चिडून प्रथम करवीरात आणि नंतर तिरुचानूरमध्ये दूर वेगळी राहिलेली. वेंकटेश हा विठ्ठलाप्रमाणेच शस्त्रहीन, मौनी आहे आणि डावा हात कटीवर ठेवून, उजव्या हाताने भक्तांना वरप्रदान करीत आहे. अशा या बालाजीचे भक्त आंध्राप्रमाणेच महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर आहेत.
याच भक्तांना तिरुपती बालाजीचे दर्शन सोलापुरातही घेता यावे यासाठी १९५० साली हे मंदिर बांधण्यात आले. तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुमला डोंगरावर स्थित आहे. ते किमान दीड हजार वर्षे एवढे जुने आहे. असे सांगितले जाते की पल्लव राणी समवाई हिने इ.स. ६१४ मध्ये या मंदिराची पहिली वेदी बांधली. त्या मंदिराच्या उभारणीत व देखभालीमध्ये चोल, पल्लव राजांप्रमाणेच मराठा सेनापती रघुजी भोसले यांचाही सहभाग आहे. रोममधील व्हॅटिकन सिटीनंतरचे हे जगातील सर्वांत श्रीमंत देवस्थान गणले जाते. तिरुपती बालाजीचे हे मंदिर द्राविड शैलीतील आहे व त्याच मंदिरशैलीमध्ये सोलापूरमधील वेंकटेश बालाजी मंदिरही बांधण्यात आलेले आहे.
सोलापुरातील दाजी पेठ भागात रस्त्यालगत हे मंदिर आहे. मंदिराभोवती भक्कम तटबंदी आहे. तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन कक्ष आहेत. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला दोन नक्षीदार स्तंभ व त्यांवर सज्जा आहे. सज्जावर शाल पद्धतीचे आडवे शिखर आहे. शिखरावर आडव्या ओळीत पाच कळस आहेत. शिखरातील देवकोष्टकांत शेषशयनी विष्णू व विष्णूचे पाय चेपणारी लक्ष्मी असे शिल्प आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मध्यभागी सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेले वेंकटेश बालाजी मंदिर आहे. खुल्या स्वरूपाच्या सभामंडपाच्या छतावर चारही बाजूंनी श्रीविष्णू व लक्ष्मी यांचे पौराणिक प्रसंग रेखाटलेले आहेत. सभामंडपात अंतराळाच्या दोन्ही बाजूला दंडधारी द्वारपाल शिल्पे आहेत. अंतराळाचे प्रवेशद्वार रजतपटल आच्छादित व द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. ललाटबिंबावर चक्र आहे. प्रवेशद्वाराच्या वर दर्शनी भिंतीवर शंख, चक्र, पद्म अशी शुभचिन्हे अंकित आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वारात मेजावर पद्मपादुका व देवाची पितळी उत्सव मूर्ती आहे. येथून भाविकांना गर्भगृहातील व्यंकटेश बालाजीचे दर्शन दिले जाते. गर्भगृहाचे प्रवेशद्वार सुवर्णपटल अच्छादित आहे. द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी व ललाटबिंबावर चक्र आहे. गर्भगृहात वेंकटेश बालाजीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. देवाच्या पायाजवळ पद्मावती व लक्ष्मी यांची शिल्पे कोरलेली आहेत. मूर्तीच्या डोक्यावर सुवर्ण मुकुट, अंगावर विविध वस्त्रे व अलंकार आहेत. गर्भगृह व अंतराळाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. मंडोवरास मकरमुख आहे. त्यातून देवाच्या अभिषेकाचे तीर्थ बाहेर पडते. गर्भगृहाच्या छतावर द्रविडी शैलीतील तीन थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखरावर विविध देवदेवता व पशूशिल्पे आहेत. शिखराच्या दुसऱ्या थरात चोहोबाजूंनी वीस देवकोष्टके आहेत. त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शिरोभागी स्तुपिका व कळस आहे.
वेंकटेश बालाजी मंदिराच्या बाजूला पद्मावती देवी मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिराच्या खुल्या स्वरूपाच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर गजलक्ष्मी शिल्प आहे. प्रवेशद्वारास लोखंडी जाळीदार झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर पद्मावती देवीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या छतावर द्रविडी शैलीतील तीन थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या पहिल्या खालील थरात चारही बाजूंना पद्मावती देवीची शिल्पे आहेत. दुसऱ्या थरात कुट व शाल रचना आणि तिसऱ्या थरात विविध देवतांच्या मूर्ती व पशू शिल्पे आहेत. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका व कळस आहे.
पद्मावती मंदिराच्या शेजारी हरिहरेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर प्रांगणात चौथऱ्यावर नंदीची मूर्ती व शिवपिंडी आहे. मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी जमिनीवर शिवपिंडी व त्यावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. मंदिराच्या छतावर समोरील बाजूला शंकर-पार्वती आणि चारही बाजूला नंदीशिल्पे आहेत. छतावर मध्यभागी घुमटाकार शिखर, शीर्षभागी स्तूपिका व कळस आहे. प्रांगणात डाव्या बाजूला अन्नछत्राची भव्य वास्तू आहे. येथे भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. याच इमारतीला लागून देवस्थानचे कार्यालय आहे. प्रांगणात पाषाणी चौथऱ्यावर पितळी विष्णूध्वज आहे. मंदिरासमोर गरुड, हनुमंत व नवग्रह मंदिर आहे. प्रांगणात भक्तनिवास, पुजारी व सेवेकऱ्यांची निवासस्थाने आणि परीसरात गोशाळा व वृक्ष वाटिका आहे.
तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात होणारे सर्व पूजा विधी व वार्षिक उत्सव याही मंदिरात साजरे केले जातात. तिरुपती मंदिरातील पुजारी येथील पूजाविधी व उत्सव पार पाडण्यासाठी उपस्थित राहतात. तिरुपती बालाजी मंदिरात साजरा होणाऱ्या ब्रह्मोत्सवास जाणाऱ्या भाविकांची नोंद या मंदिराच्या कार्यालायात करण्याचीही सुविधा आहे. मंदिरात चैत्र पाडवा, कार्तिक पौर्णिमा, शारदीय नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी आदी सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी देवाची विशेष पूजा व अभिषेक करण्यात येतात. उत्सवाच्या वेळी देवाचा मुखवटा पालखीत ठेवून पालखी नाचवण्याची परंपरा आहे. यावेळी शास्त्रीय संगीत, नृत्य व नाटिका सादर केल्या जातात. उत्सवकाळात हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. नित्य दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. दररोज पहाटेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात वेंकटेश्वराचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • सोलापूर रेल्वे व बस स्थानकापासून ३.५ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून सोलापूरसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दू. ०२१७ २६३१८०९, मो. ९३२५०३०००८
Back To Home