शुभराय महाराज मठ

बुधवार पेठ, सोलापूर, जि. सोलापूर

योगामध्ये श्रेष्ठ म्हणून भक्तीयोग ओळखला जातो. देवापासून विभक्त नसतो तो भक्त सातत्याने हृदयात देवाची आठवण ठेऊन असतो. अशा भक्तांचा भार देव स्वतः वाहतो व भक्तालाच देव करतो. भारतात भक्तीयोगाचा प्रसार तळागाळात असल्याने गावोगावी महायोग्यांचे मठ देवकार्य करताना दिसतात. अशा हजारो मठांचे कार्य शेकडो वर्षापासून सुरू आहे. यापैकीच एक प्राचीन व प्रसिद्ध शुभराय मठ सोलापूर शहरातील बुधवार पेठेत कार्यरत आहे. येथे शुभराय महाराज, स्वामी समर्थ महाराज व शंकर महाराजांचे वास्तव्य आजही जाणवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
शुभराय महाराज यांचे संपूर्ण आयुष्य दैवी चमत्कारांनी भरलेले आहे. त्यांच्यावर देवाची अखंड कृपा होती हे त्यांच्या चरीत्रावरून दिसून येते. महाराजांचा जन्म सन १७५० साली तमिळनाडू राज्यातील मालूर या गावी पिता गंगाधर व माता पन्नमा यांच्या पोटी झाला. ते गुरुकुलात शिकून वेदशास्त्रसंपन्न झाले. विज्ञान, कला, नितीपाठ, राजकारण आदी सर्व विषयात पारंगत असलेल्या महाराजांना मैसूरच्या टिपू सुलतानाने आपल्या दरबारात नायब दिवाण या जबाबदारीच्या पदावर नोकरीस ठेवले. सन १७७१ साली महाराजांचा सुलक्षणा नावाच्या मुलीशी विवाह झाला. पुढे महाराजांची अध्यात्माची ओढ वाढली व त्यांना दैवी दृष्टांत होऊन ‘सर्व संग परित्याग करावा’ असा संकेत मिळाला.
दैवी दृष्टांताने प्रेरीत होऊन महाराज नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर पडले व अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगी गावी मारुतीच्या मंदिरात राहू लागले. तेथून ते महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले. देवीने त्यांना पंढरपूरला जाण्याची आज्ञा केली. सन १७७९ साली महाराज सदगुरू रामदासी थिमप्पा यांच्या सेवेत पंढरपूर येथे पोहोचले. सद्गुरूंच्या आदेशाने महाराज सोलापूर येथे पोहोचले व विठ्ठल मंदिरात राहू लागले. सोलापुरातील किल्लेदार आबासाहेब कुंडले यांनी गावातील तलावाजवळील सिद्धेश्वराच्या मंदिराजवळची विस्तीर्ण जमीन दान केली. येथे महाराजांनी १७८३ साली मठ बांधला. तोच आजचा शुभराय मठ होय. याच मठात महाराजांना विठ्ठलाचा दृष्टांत झाल्याने त्यांनी मल्लिकार्जुन शेटे या आपल्या शिष्याला पाठवून पंढरपुरातील कुंडलिक डोहात असलेली विठ्ठलाची वालुकामय मूर्ती आणविली. सन १७८५ साली या मूर्तीची मठात स्थापना केली. आपल्या अंतकाळी शुभराय महाराजांनी रावजी बुवा यांना आपल्या मठाची जबाबदारी सोपवून इहलोकीची यात्रा संपवली. असे सांगितले जाते की अक्कलकोटचे स्वामी समर्थ व शंकर महाराज या मठात येऊन ध्यानसाधना करीत असत.
शहरातील बुधवार पेठेत रस्त्यालगत हा मठ आहे. मठाच्या बाजूला एकमुखी दत्त मंदिर आहे. मठाच्या आवारभिंतीत दुमजली प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या मंडारकावर कीर्तीमुख व वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आत पाणपोई आहे. येथे शुचिर्भूत होऊन मठात जाण्याची प्रथा आहे. येथून मठाची इमारत सुमारे वीस ते तीस फूट उंचीवर आहे. पायरी मार्गाच्या उजव्या बाजूला असलेल्या औदुंबर वृक्षाखाली गोलाकार मेघडंबरीत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. मठाच्या प्रांगणात तटबंदीला लागून दुमजली इमारतीत भाविकांना राहण्यासाठी खोल्या आहेत.
पुढे सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेला हा मठ आहे. सभामंडपाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे. सभामंडपाच्या भिंतींवर शुभराय महाराजांनी चितारलेली चित्रे आहेत. या चित्रांचे खास वैशिष्ट्य म्हणजे पानाफुलांच्या अर्कातून तयार केलेल्या नैसर्गिक रंगातून ही चित्रे साकारलेली आहेत. सभामंडपात शुभराय महाराज व शंकर महाराज यांच्या प्रतिमांसोबतच जयकृष्ण गोविंद बुवा, गोपिकाबाई जयकृष्ण बुवा, जनार्दन बुवा व जयकृष्ण जनार्दन बुवा यांच्या प्रतिमा आहेत. शंकर महाराजांच्या चरीत्र ग्रंथातील कथांमध्ये यांचा उल्लेख आहे.
गर्भगृहात वज्रपिठावर पंढरपूरच्या डोहातून आणलेली विठ्ठलाची मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला स्वामी समर्थांनी दिलेली कुबडी आहे. वज्रपीठावर स्वामी समर्थ, शंकर महाराज, शुभराय महाराज व जयकृष्ण महाराज यांच्या पादुका व बाजूला विष्णूची चातुर्मासात पुजली जाणारी मूर्ती आहे. मागील भिंतीवर शंकर महाराज व शुभराय महाराज यांच्या तसबीरी आहेत. वज्रपिठावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारूती यांच्या मूर्ती आणि बाजूला गणपतीची मूर्ती आहे. वज्रपिठावर इतर देवी देवतांच्या तांब्या पितळेच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाजूला एक कक्ष आहे. येथे शंकर महाराज ध्यान साधना करीत असत. या कक्षात शंकर महाराजांची गादी, लाकडी खुर्ची व कपाट आहे.
आषाढी व कार्तिकी एकादशी हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी शुभराय महाराजांनी त्यांच्या हयातीत तयार केलेल्या लाकडी रथातून विठ्ठलाची मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा केली जाते. हजारो भाविक ढोल ताशांच्या गजरात रथोत्सवात सहभागी होतात. मठात चैत्रपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, श्रावण मास, कोजागिरी पौर्णिमा आदी सण व उत्सव साजरे केले जातात. गुरुवार, एकादशी, प्रदोष, पौर्णिमा आदी दिवशी मठात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असते.

उपयुक्त माहिती

  • सोलापूर बस स्थानकापासून १ किमी, तर रेल्वे स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून सोलापूरसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : शुभांगी बुवा (माई), मो. ९७६७५८८७०१, जयंत डिंगरे, मो. ९८९००७३२००
Back To Home