पुंडलिक मंदिर / लोहदंडतीर्थ

महाद्वार घाट, पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा… असा विठ्ठलाच्या आरतीत उल्लेख आहे. कर्मकांड किंवा तीर्थाटनापेक्षा आपले कर्तव्य व माता-पित्याची सेवा श्रेष्ठ आहे, हे सूत्र पुंडलिकाने अंगिकारले होते. त्याच्या मातृ-पितृ सेवेमुळे प्रत्यक्ष श्रीहरी त्याला दर्शन द्यायला आले तरी त्याने पांडुरंगाला विट देऊन ‘यावर उभा राहून वाट पहा’ असे सांगितले. पुंडलिकाच्या पुण्याईने बांधिल पांडुरंग अठ्ठावीस युगे विटेवरी उभा आहे. पुंडलिकाचे समाधी मंदिर महाद्वार घाटाजवळ चंद्रभागेच्या तीरावर आहे. मंदिराशेजारी नदीपात्रात लोहदंडतीर्थ आहे. लोहदंडतीर्थात स्नान केल्याने पापांचा नाश होतो व पुंडलिकाचे दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाच्या दर्शनाचे पुण्य लाभत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पुंडलिकाचे हे मंदिर महान योगी संत चांगदेवांनी बांधल्याची मान्यता आहे. त्यामुळे हे मंदिर प्रागेतिहासिक काळाशी जोडले जाते. या मंदिरात सोळाव्या ते सतराव्या शतकातही बदल झाल्याचे सांगितले जाते. पेशव्यांचे सरदार भाटे यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची नोंद आहे. भक्त पुंडलिकाबाबत अनेक अख्यायिका प्रचलीत आहेत. चंद्रभागेच्या काठावरील कुंडलगाव येथे जानदेव ब्राम्हणाच्या घरी जन्मलेला पुंडलिक विलासी जीवन जगणारा सुखलोलुप पुरुष होता. पुढे त्याला आपल्या कृत्यांचा पश्चात्ताप झाला व पाप क्षालनासाठी काशीला निघाला असता रस्ता चुकून तो कुकुट ऋषींच्या आश्रमात पोहोचला. पुंडलिकाने कुकूट ऋषींना काशीचा रस्ता विचारला तेव्हा ‘आपण कधी काशीला गेलोच नसल्याने आपणास रस्ता माहित नाही’ असे ऋषींनी सांगितले. परंतु कधीही काशीला न जाणाऱ्या ऋषींच्या आश्रमात गंगा, यमुना व सरस्वती या तीन पवित्र नद्या झाडलोट करीत असल्याचे पुंडलिकाने पहिले. याचे कारण विचारले असता ऋषींचे मातृ-पितृ सेवेचे पुण्य मोक्ष प्राप्तीहून अधिक असल्याचे नद्यांनी सांगितले. त्यानंतर पुंडलिक मातृ-पितृ भक्त झाला व प्रत्यक्ष पांडुरंग पुंडलिकाची वाट पाहत युगे अठ्ठावीस विटेवरी उभा राहिलेला आहे.
पुंडलिक मंदिरासमोरील लोहदंडतीर्थाबाबत अख्यायिका अशी की गौतम ऋषींची पत्नी अहिल्येला कपटाने भोगल्याने इंद्राच्या अंगास भगे पडली होती. यावर उपाय काय असे इंद्राने सप्तऋषींना विचारले असता ऋषींनी इंद्राच्या हातात लोहाचा दंड देऊन ‘हा दंड ज्या तीर्थात तरंगेल त्या तीर्थात स्नान केल्याने तुझ्या सर्व पापांचा नाश होऊन तू शापमुक्त होशील’ असे सांगितले. तो दंड घेऊन इंद्र समस्त पृथ्वीवर फिरला व शेवटी या तीर्थात लोहाचा दंड तरंगला. म्हणून या तीर्थास लोहदंडतीर्थ असे नाव पडले. या तीर्थाची निर्मिती महादेवाने जमिनीत त्रिशूल मारून केल्याचीही अख्यायिका आहे.
महाद्वार घाटाच्या खाली चंद्रभागेच्या तीरावरील वाळवंटात पुंडलिक मंदिर आहे. वाळवंटात अनेक मंदिरांपैकी पुंडलिक मंदिराचे शिखर सर्वाधिक उंच आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या पूर्वाभिमुख मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या पूर्व, उत्तर व दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दिशेच्या प्रवेशद्वारातून मंदिरात येता येते. या प्रवेशद्वारासमोर लोखंडी स्तंभांच्या रचनेवर पत्र्याचे छत असलेला रांगमंडप आहे. त्यात स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावून दर्शन रांगेचे व्यवस्थापन केलेले आहे. तिन्ही प्रवेशद्वारांच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबांवर गणपतीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या दर्शनी भिंतींवर अनेक संतांची चित्रे रंगवलेली आहेत. अष्टकोनी गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर पुंडलिकाचा पितळी मुखवटा आहे. या पिंडीच्या दोन्ही बाजूला यक्षांची पितळी शिल्पे आहेत.
गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांवर चार मिनारसदृश स्तंभ, त्यांवर आमलक व कळस आहेत. स्तंभात चारही बाजूंना असलेल्या देवकोष्टकांत अनेक देवांच्या मूर्ती आहेत. छतावर चार थरांचे गोलाकार शिखर व प्रत्येक थरात बारा देवकोष्टके आहेत. सर्व देवकोष्टकांच्या शीर्षभागी घुमटाकार शिखर, त्यावर आमलक व कळस आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक व त्यावर कळस आहे. शिखराचा खालील अर्धा भाग दगडी बांधणीचा व वरील भाग विटांनी बांधलेला आहे. या मंदिराची संपूर्ण व्यवस्था कोळी समाजाकडे आहे. येथे नित्य, काकडा, अभिषेक, धुपारती इत्यादी पूजा केल्या जातात. पावसाळ्यात मंदिर पाण्याखाली गेल्यानंतर पुंडलिकाचा पितळी मुखवटा उद्धव घाटावरील मंदिरात ठेऊन तेथे नित्य पूजा केली जाते. महाशिवरात्री हा येथील मुख्य वार्षिक उत्सव आहे. या वेळी विशेष पूजा करण्यात येते. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक पुंडलिकाच्या दर्शनाला आवर्जून येतात. त्यामुळे मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. पंढरपूर नगर प्रदक्षिणेला येणाऱ्या दिंड्या आवर्जून पुंडलिकाच्या भेटीला येतात.
पुंडलिक मंदिराच्या बाजूला चंद्रभागेच्या पात्रात लोहदंडतीर्थ आहे. तीन बाजूंना कमानी सदृश प्रवेशद्वारे असलेल्या या तीर्थमंदिराचे पाषाणी बांधकाम प्राचीन असल्याचे सांगितले जाते. तीर्थमंदिराच्या सभोवती समाध्यांचे अनेक चौथरे आहेत. तीर्थमंदिरात फरशी आच्छादित जमिनीत कूप नलिकेसारखे छिद्र आहे. त्यातूनच लोहदंडतीर्थांचे पाणी बाहेर पडते. मंदिरात मागील भिंतीत असलेल्या देवकोष्टकात शिवपिंडी व नंदी आहे. तीर्थमंदिराचे छत सपाट आहे. पंढरपुरात येणारे अनेक भाविक आवर्जून या तीर्थात स्नान करतात. दररोज सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना या मंदिरात पुंडलिकांचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • पंढरपूर बस स्थानकापासून १.५ किमी, तर रेल्वे स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून पंढरपूरसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : पुजारी, मो. ७३५०१४१८८८
Back To Home