कनकंबा देवी ही मूळ कनक दुर्गा किंवा कनक अंबा नावाने ओळखली जाते. नावाचा अपभ्रंश झाल्याने देवीस कनकंबा देवी म्हणून संबोधले जाऊ लागले. या देवीची देशात अनेक ठिकाणी मंदिरे आहे. देवीचे मूळ स्थान आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे कृष्णा नदीच्या तीरावर असलेल्या इंद्रकिलाद्री टेकडीवर आहे. अशी मान्यता आहे की देवीचे हे स्थान स्वयंभू आहे. महिषासुराचा वध केल्यानंतर देवी सुवर्णासम तेजवर्ण दिसू लागली म्हणून देवीस कनक अंबा अथवा कनक दुर्गा नावाने संबोधले जाऊ लागले. या देवीचे एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर पंढरपूर तालुक्यात करकंब गावात आहे. कनकंबा देवी ही येथील ग्रामदैवत आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे आहे. ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये करकंब हे प्राचीन काळी महत्वाचे लष्करी ठाणे व येथून व्यापारी मार्ग होता, असा उल्लेख आहे. असे सांगितले जाते की या प्राचीन मंदिराचा जिर्णोद्धार छत्रपती संभाजी महाराजांनी केला होता. पटवर्धन संस्थानाकडे हे ठाणे असताना नरसो गोविंद यांनी येथे बंडाळी केली होती, असा इतिहास आहे. हे ठाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजवटीशी संबंधित होते. मंदिर परीसरात असलेल्या वीरगळ व सतीशिळा पाहता हे स्थान व मंदिर प्राचीन असल्याची खात्री पटते. अलीकडील काळात मंदिरासमोरील दर्शनमंडपाचे काम करीत असताना जमिनीखाली देवीची एक पाषाणमूर्ती सापडली. ती मंदिराच्या अंतराळात ठेवण्यात आलेली आहे.
गावापासून जवळ असलेल्या या मंदिराभोवती दोन फूट उंचीचा कठडा आहे. प्रवेशद्वारासमोर तुलसी वृंदावन व काही अंतरावर सुमारे चाळीस फूट उंच दगडी बांधणीची गोलाकार दीपमाळ आहे. दीपमाळेजवळ काही वीरगळ, नागशिळा व सतीशिळा आहेत. दीपमाळेच्या बाजूला एक समाधी आहे. समाधीपासून १५ ते २० मीटर अंतरावर एक लहान मंदिर आहे व त्यात शेंदूरचर्चित प्राचीन गणेशमूर्ती आहे. गणेश मंदिराच्या खाली तळघरात पंचमुखी शिवपिंडी आहे. तळघरात उतरण्यासाठी मंदिराच्या बाहेरून दगडी पायऱ्या आहेत. गणपती मंदिराच्या चारही दिशांना उतार असलेल्या छतावर गोलाकार स्तंभसदृश शिखर, शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.
दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी कनकंबा देवी मंदिराची रचना आहे. मंदिरासमोरील दर्शनमंडप नव्याने बांधण्यात आलेला आहे. दर्शनमंडपात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या सहा रांगा आहेत. स्तंभांवर तुळई व त्यावर छत आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या दर्शनमंडपात सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर यज्ञकुंड आहे. पुढे सभामंडप, अंतराळ व गर्भगृहाचे बांधकाम हे दगडी आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारास पर्णशाखा, पुष्पशाखा व स्तंभशाखा आणि ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारावरील तोरणात अस्पष्ट शिल्पे आहेत. मंडारकास चंद्रशिळा आहे. सभामंडपात जमिनीवर कासवशिल्प आहे. सभामंडपात प्रत्येकी चार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सभामंडपात मध्यभागी असलेले चार स्तंभ नक्षीदार आहेत व स्तंभदंडात त्यांचे चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभावरील चौकोनी पटावर विविध प्रकारच्या नक्षी कोरलेल्या आहेत.
बाह्यबाजुचे स्तंभ भिंतींत आहेत. सभामंडपात अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन देवकोष्टके आहेत. याशिवाय अंतराळात डाव्या व उजव्या बाजूला दोन देवकोष्टके आहेत. अंतराळात डाव्या बाजूला दर्शनमंडपाच्या कामाच्या वेळी खोदकाम करताना जमिनीखाली सापडलेली देवीची मूर्ती आहे. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारास वेलबुट्टी शाखा, पर्णशाखा, पुष्पशाखा व स्तंभशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व ललाटपट्टीवर पानाफुलांची नक्षी आहे. तोरणात शिखरशिल्पे व मंडारकास चंद्रशिळा आहे.
गर्भगृहात वज्रपिठावर कनकंबा देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. महिषासुरमर्दिनी रूपात असलेल्या या देवीच्या वरच्या दोन हातात तलवार व अग्निकुंड आहेत. खालील दोन्ही हातातील त्रिशुळाने पायाखाली पडलेल्या असुरावर वार केलेला आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट, विविध वस्त्रे व अलंकार कोरलेले आहेत. मूर्तीस चांदीचा मुखवटा व डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे गोलाकार व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखरात दोन पद्मदलमंडल व स्तंभनक्षी आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
शारदीय नवरात्रोत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. सलग दहा दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, गोंधळ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दसऱ्याच्या दिवशी महाप्रसादाचे वाटप केले जाते. मंदिरात चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, शाकंभरी नवरात्री, कोजागिरी पौर्णिमा आदी सण व उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी हजारो भाविकांची येथे गर्दी होते. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आदी दिवशी दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. दररोज सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविक या मंदिरात येऊन कनकंबा देवीचे दर्शन घेऊ शकतात.