सोलापूर जिल्ह्यात शेटफळ नावाची दोन गावे आहेत. त्यापैकी एकाची ओळख नागोबाचे शेटफळ व दुसऱ्याची सिद्धेश्वराचे शेटफळ अशी आहे. शेटफळ नागोबाचे हे करमाळा तालुक्यात आहे तर शेटफळ सिद्धेश्वराचे हे मोहोळ तालुक्यात आहे. अवघ्या काही मिनिटांत देवाच्या यात्रेसाठीचा भलामोठा मंडप उभारण्याची अनोखी परंपरा असलेले गाव म्हणूनही सिद्धेश्वर शेटफळ ओळखले जाते. येथे भगवान शंकराचे एक रूप असलेल्या सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथील शिवलिंग हे स्वयंभू व जागृत आहे. यामुळे येथे सतत भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी सिद्धेश्वरास नवस करतात. यात्रेच्या वेळी केली जाणारी भाकणूक हेही या स्थानाचे एक वैशिष्ट्य आहे.
शैव संप्रदायामध्ये, आत्मसाधनेद्वारे जो आध्यात्मिक प्रगती साधून आपल्या जाणीवांवर नियंत्रण ठेवतो, शिवाशी एकरूप होतो आणि ज्याला दिव्य शक्ती प्राप्त होतात, त्याला सिद्ध असे म्हटलेले आहे. संत ज्ञानेश्वरांनी नाथ संप्रदायाला सिद्धपंथ असे म्हटले आहे. नाथपंथात चौऱ्यांशी सिद्ध सांगितले आहेत. या सिद्धांचा ईश्वर तो सिद्धेश्वर. ‘कल्पसमूह संहिता’ या ग्रंथात ‘सिद्धेश्वर देव असे तेथे सिद्धि असे’ असे
म्हटलेले आहे. अशा या सिद्धेश्वराची अनेक मंदिरे महाराष्ट्र तसेच कर्नाटकात आहेत. शेटफळ येथील सिद्धेश्वर मंदिर हे त्यातीलच एक होय. येथे शिवलिंग स्वरूपात सिद्धेश्वराची पूजा केली जाते. येथील मंदिराच्या स्थापनेचा नेमका इतिहास अज्ञात असला, तरी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या मंदिराची उभारणी काही शतकांपूर्वी झालेली आहे.
शेटफळ गावच्या मध्यवर्ती ठिकाणी सिद्धेश्वराचे मंदिर स्थित आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीत तीन मजली भव्य असे प्रवेशद्वार आहे. कमानीकृती प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्तंभशाखा आहेत. प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर बाजूने दोन खोल्या व मध्यभागी मेघडंबरीसदृश्य तीन खिडक्या आहेत. त्यावरील तिसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. या नगारखान्यालाही समोरील बाजूने तीन खिडक्या आहेत. प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजूला द्वारपालकक्ष आहेत. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. तटबंदीला आतील सर्व बाजूने ओवऱ्या आहेत. प्रांगणात मंदिरासमोरील एका चौथऱ्यावर उंच दीपस्तंभ आहे. याशिवाय प्रवेशद्वाराच्या अगदी समोर आतील बाजूला एक तुलसीवृंदावन व त्यापुढे नंदीमंडप आहे. खुला मंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. खुल्या सभामंडपात दोन्ही बाजूला भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. त्यापुढे काहीसे खाली असलेला अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. या मंदिरात अंतराळाच्या प्रवेशद्वारातून उत्सवाव्यतिरिक्त भाविकांना पुढे प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे अंतराळाच्या प्रवेशद्वारातूनच भाविकांना सिद्धेश्वराचे दर्शन घ्यावे लागते. अंतराळाच्या पुढे असलेल्या गर्भगृहात सिद्धेश्वराची पिंडी आहे. अंतराळाच्या छतावर दर्शनी बाजूला दोन व मध्यभागी एक अशा तीन सिद्धेश्वराचे वाहन असलेल्या घोड्यांची शिल्पे आहेत. याशिवाय दोन मयूरशिल्पे व एक कमलपुष्प शिल्प आहे. गर्भगृहावर मंदिराचे मुख्य शिखर आहे. या शिखरावर आमलकाच्या बाजूने लहान लहान शिखर प्रतिमा आहेत. दोन आमलक व त्यावर कळस असे या शिखराचे स्वरूप आहे. या मंदिरातील गर्भगृहाचे वा मूर्तीचे येथील ग्रामस्थांकडून कधीही छायाचित्र काढले जात नाही व भाविकांनाही तसे करण्यास अनुमती नाही. त्यामुळे या सिद्धेश्वराचे रूप हे केवळ मंदिरात जाऊनच पाहता येते.
महाशिवरात्री, श्रावण मास आणि प्रत्येक सोमवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात विशेष पूजा, अभिषेक, रुद्राभिषेक, महाआरती व हरिपाठ आदी कार्यक्रमांचे आयोजन होते. चैत्र पौर्णिमेला येथे पाच दिवसांचा यात्रोत्सव असतो. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर काही मिनिटांत उभा राहणारा मंडप. या मंडप उभारणीची विशिष्ट परंपरा येथे पाळली जाते. यात्रेच्या दिवशी सकाळी मंडपाचे खांब आणि त्यावरील ताडपत्री बाहेर काढण्यात येते. नंतर ते मंदिरासमोर आणले जातात. गावातील भांगे, डोंगरे, खडके ही मानकरी घराणी व बारा बलुतेदार आपापल्या ठरलेल्या खांबापाशी येऊन उभे राहतात. सकाळी बरोबर ११.०५ वाजता मंडप उभारणीस सुरूवात होते. हे कार्य एवढ्या गतीने व एकमेकांच्या समन्वयाने पार पाडले जाते, की अवघ्या पाच ते सहा मिनिटांत तो ६० बाय ७० फूट आकाराचा व २० फूट उंचीचा मंडप उभा राहतो. यात्रेच्या पाचव्या दिवशीही सायंकाळी ५ वाजता अशाच प्रकारे येथे मंडप उभारला जातो. हा अद्भूत प्रकार पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येथे जमतात.
या मंदिरातील यात्रोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे होणारी भाकणूक अर्थात भविष्यकथन. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी केले जाणारे हे भविष्यकथन ऐकण्यासाठीही येथे हजारो भाविक उपस्थित असतात. भागवत संप्रदायातील वारी परंपरेचा भाग म्हणून श्रावणात येथे सिद्धेश्वराच्या पालखीसोबत गावातील महिला व पुरूषांची दिंडी निघते. मंदिराच्या माध्यमातून कीर्तन, भागवत सप्ताह, प्रवचन, संस्कार वर्ग यांचे आयोजन होते. युवकांना धार्मिक व सामाजिक शिक्षण मिळावे म्हणून स्वयंसेवक वर्ग सुरू असतात. अनेक वेळा मंदिर समितीच्या वतीने अन्नदान, रक्तदान, आरोग्य शिबीर आणि पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवले जातात.