गजानन महाराज मंदिर

सोरेगाव, सोलापूर, ता जि सोलापूर

भारतात तमिळनाडू प्रांतातील आळवार या वैष्णव संतानी ‘आळवार प्रबंधम्’ या ग्रंथात भक्ती मार्गाचा उल्लेख करून सन ५०० ते ८५० दरम्यान भक्तिमार्गाचा प्रारंभ केला, असे काही विद्वानांचे मत आहे. कर्मकांडरहित, सहज व सोप्या पद्धतीने परमेश्वराची कृपा मिळवून देणाऱ्या या भक्तिमार्गाचा प्रसार व प्रचार करणाऱ्या हजारो साधू, सन्यासी व संतांमध्ये शेगावचे संत गजानन महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. भारतात महाराजांची शेकडो लहान मोठी मंदिरे आहेत. त्यापैकीच एक प्रसिद्ध मंदिर सोलापूर जवळील सोरेगाव येथे आहे. येथे दर्शन घेतल्याने महाराजांची कृपा लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर सन १९९५ साली बांधून पूर्ण झाले असले तरी येथील गजानन महाराजांच्या पालखीची परंपरा पन्नासहून अधिक वर्षे प्राचीन असल्याचे येथील विश्वस्त सांगतात. संत गजानन महाराच यांचे चरीत्र चमत्कारांनी ओतप्रोत भरलेले आहे. या दीपवून टाकणाऱ्या चमत्कृत घटनांतूनच महाराजांनी ईश्वर प्राप्तीचा मार्ग भक्तांना दाखविला. माघ वद्य सप्तमी २३ फेब्रुवारी १८८७ रोजी महाराज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे प्रकटले तेव्हा ते अदमासे ३० वर्षाचे होते. शेगावात देविदास पातूरकर मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतून भाताची शीते खाणारे गजानन महाराज अन्नाची नासाडी करू नये, असा संदेश नकळत देत होते. या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे की ‘कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।।’
त्यानंतर महाराज आपल्या अंतापर्यंत शेगावात राहिले. हजारो भक्तांवर त्यांनी अनुग्रह केला व अंती ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषी पंचमीस समाधिस्थ झाले. महाराजांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विविध भागांतून शेगाव येथे पालख्या येत. आज शेगावात येणाऱ्या पालख्यांची संख्या हजारोंच्या संख्येत आहे. त्यातच सोरेगाव येथून जाणारी पालखीही असते.
हे मंदिर सोरेगावच्या वेशीवर सुमारे दोन एकर जागेवर उभे आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीत प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथून मंदिराकडे येणाऱ्या पायवाटेवर दोन्ही बाजूला दोन वास्तू आहेत. त्यात एक प्रतिक्षालय व दुसरे महाराजांचा प्रसाद शिजवण्यासाठीचे स्वयंपाकघर आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. मंदिर प्रांगणापेक्षा सुमारे चार फूट उंचीवर आहे. मुखमंडपास डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी पाच पायऱ्या आहेत. मुखमंडपात सहा गोलाकार स्तंभ व त्यांवर छत आहे. मुखमंडपात डाव्या व उजव्या बाजूला स्तंभिका असलेले कठडे आहेत.
सभामंडपाचे प्रवेशद्वार साधेसे आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावून दर्शन रांगेचे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. सभामंडपात भिंतीवर गजानन महाराजांची अनेक चित्रे लावलेली आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर मेजावर महाराजांच्या पादुका, चरण तीर्थ व गंधादी पाद्य पूजनाचे साहित्य ठेवलेले आहे. उत्सवकाळात भाविकांना येथून दर्शन दिले जाते. गर्भगृह सभामंडपापेक्षा चार फूट उंचावर आहे. पाच पायऱ्या चढून गर्भगृहात प्रवेश होतो. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला चार फूट रुंदीचा चौथरा आहे. गर्भगृहाच्या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांच्या नक्षी आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार झडपा आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गोलाकार स्तंभ व त्यावर मध्यभागी देवकोष्टक आहे. या देवकोष्टकात गणपतीची मूर्ती आहे. सज्जावर डाव्या व उजव्या बाजूला दोन लघूशिखरे आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर गजानन महाराजांची चिलीम ओढत असलेल्या अवस्थेतील आनंदध्यानी संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीची उंची सुमारे पाच फूट आहे. मूर्तीच्या अंगावर उपरणे व डोक्यावर फेटा आहे. छताला चांदीचे छत्र टांगलेले आहे. बाजूला गजानन महाराजांचे चित्र असलेली तसबीर आहे.
गर्भगृहाच्या छतावर सुमारे वीस फूट उंचीचे शिखर आहे. शिखराच्या खालील भागात स्तंभनक्षी आणि चारही बाजूंनी अंगीशिखर व त्यांवर अर्धआमलक आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. मंदिराच्या तटबंदीला लागून फरसबंदी प्रदक्षिणा मार्ग आहे.
माघ वद्य सप्तमी हा गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्सव येथे तीन दिवस उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी जिल्हाभरातून तीस ते चाळीस हजार भाविक महाराजांच्या दर्शनासाठी येतात. यावेळी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ऋषी पंचमी हा महाराजांच्या समाधीचा दिवस, गुरूपौर्णिमा, रामनवमी व दर महिन्यातून एक दिवसाचे ग्रंथ पारायण आदी कार्यक्रमांचे येथे आयोजन केले जाते. मंदिर ट्रस्टच्या वतीने गरजू नागरिकांना आरोग्य सेवा सहाय्य व विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य केले जाते.

उपयुक्त माहिती

  • सोलापूरपासून १० किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून सोलापूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : जयप्रकाश पाखरे, अध्यक्ष, मो. ९४२३०६६८८१
Back To Home