पंचलिंग मंदिर

जुन्नर, ता. जुन्नर, जि. पुणे


शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले शिवकालीन पंचलिंगी मंदिर तालुक्यातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. पंचलिंग महादेवाच्या दर्शनासाठी राजमाता जिजाऊ येत असत, असे सांगितले जाते. इ.स. १७७७ साली या वास्तूचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद जुन्या दस्ताऐवजांमध्ये आहे. जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थान पुण्यासून ९५ किलोमीटरवर आहे.

शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला, अष्टविनायकांमधील ओझर व लेण्याद्री अशा एकापेक्षा एक श्रेष्ठ ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा ठेवा जुन्नर परिसरात आहे. त्यामुळे भाविकांसह इतिहासप्रेमीही या परिसरात येत असतात. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या शौर्याची माहिती देणारा शिवसृष्टी हा प्रकल्प आहे. त्याच्या शेजारीच पंचलिंग मंदिर आहे. किल्ल्यावरून खाली पाहिले असता, रेखीव आणि शिल्पकलेचा सुंदर आविष्कार असलेला मंदिराचा आकर्षक कळस लक्ष वेधून घेतो. त्यावर कोरलेली गणेशाची मूर्ती फारच सुबक आहे.

मंदिराभोवती दगडी भिंतीचा कोट आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यानंतर समोरच नंदी मंडप आहे. नंदी मंडपाखालीच पाषाणात कोरलेली गणपतीची मूर्ती आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर भगवान शंकराची सुंदर प्रतिमा रेखाटलेली दिसते. प्रवेशद्वाराच्या मध्यभागी गणेशाची मूर्ती अन् पायथ्याशी कीर्तिमुख आहे. दगडी बांधकामाबरोबरच सभामंडपात लाकडाचा आणि काही ठिकाणी सिमेंट-विटांचाही वापर करण्यात आला आहे. गाभाऱ्यात पिंड असली तरी तिचा मध्यभाग खोलगट आहे. या खोलगट भागात पाच पिंडी कोरलेल्या आहेत. त्यामुळेच हे मंदिर पंचलिंग म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पार्वतीमातेचीही मूर्ती आहे.

मंदिराबाहेर एक रेखीव बांधणीचे कुंड दिसते. या कुंडात शिवनेरी किल्ल्यावरील गंगा-यमुना या टाक्यांतून पाणीपुरवठ्याचे कौशल्य साधले गेले आहे. गोमुखातून हे पाणी या कुंडात पडते. या कुंडातील पाण्याचा वापर देवपूजेसाठी करण्यात येतो. हे पाणी बाहेर जाण्यासाठीही योग्य ती व्यवस्था आहे. पूर्वीच्या काळातील जलव्यवस्थापनाचा अंदाज यावरून आपण करू शकतो.

श्रावणात व महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी असते. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी एक आणि शेवटच्या सोमवारी तांदळाच्या पाच पिंडी येथे तयार केल्या जातात. एका लिंबाच्या आधारावर तांदूळ न भिजवता या पिंडी तयार केल्या जातात.

श्रावणी सोमवारपासून १६ सोमवार पंचलिंगीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे असे व्रत करणारे शेकडो भाविक येथे येतात. प्रत्येक श्रावणी सोमवारी येथे यात्रा भरते. यात्रेला मोठ्या प्रमाणावर अन्नदान होते. खिचडी व केळी अशा प्रसादाचे वाटप दिवसभर सुरू असते.

उपयुक्त माहिती:

  • जुन्नर बसस्थानकापासून एक किमी; तर पुण्यापासून ९५ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक भागांतून जुन्नरसाठी एसटी सेवा
  • शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशीच देवस्थान
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाण्याची व्यवस्था
Back To Home