तुकाई देवी मंदिर

कोंढणपूर, ता. हवेली, जि. पुणे


आई तुळजाभवानीची मोठी बहीण मानल्या जाणाऱ्या तुकाई देवीची अनेक ठिकाणी स्थाने आहेत. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवीचे पुणे जिल्ह्यातील कोंढणपूर हे स्थान सहज पोहोचता येईल, अशा ठिकाणी असल्याने तिथे भाविकांची नेहमी गर्दी असते. कोंढणपूरच्या या प्राचीन मंदिराला पांडवकालीन इतिहास असल्याचे सांगितले जाते. संत नामदेवांच्या गाथेतही ‘कौंडण्यपुरी अंबिकाभुवन’ असा या मंदिराचा उल्लेख सापडतो.

या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की, एकदा कैलास पर्वतावर महादेव रामनामाचा जप करीत होते. त्याचा पार्वतीला फार राग आला. रोज उठून महादेवांनी रामाची भक्ती करावी, एवढे राम मोठे आहेत का? महादेवांपेक्षा जगात कोणीही मोठे नाही, असे पार्वती चिडून म्हणाली. त्यावर महादेवांनी काहीच उत्तर न दिल्यामुळे पार्वती अधिकच चिडली. ती म्हणाली की, तुम्ही अगदीच भोळे आहात. श्रीराम कोण आहेत? मी त्यांची कशी फजिती करते ते पाहा; म्हणजे तुमचे डोळे उघडतील.

त्यावर शंकराने फक्त ‘श्रीराम फार मोठे आहेत’ एवढेच उत्तर दिले. त्यावर जास्तच चिडलेल्या पार्वतीने सीतेचे रूप धारण केले आणि ती सिंहगडाच्या साधारण उत्तरेस व कोंढणपूरच्या पश्चिमेस रामकडा नावाचा भाग आहे त्या ठिकाणी ठाण मांडून बसली. पार्वतीने सीता या ठिकाणी आली आहे, तिला रामाने येऊन घेऊन जावे, अशी माहिती काही लोकांकरवी रामापर्यंत पोहोचवली. त्यानंतर राम सीतेचा शोध घेत रामकड्यावर आले. रामाच्या लक्षात आले की, सीतेचे रूप धारण केलेली साक्षात पार्वती माता येथे आली आहे. जगत्जननी आई भेटल्याच्या आनंदात रामाने तिचे पाय धरले. त्याचवेळी मुखातून उद्‌गार बाहेर पडले, तू का आलीस आई? पार्वतीने रामाला आपणच सीता असल्याचे सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला; पण रामाने, ‘तू एवढ्या लांबून कैलासाहून इथे का आली आहेस आई?’ असे विचारल्यावर मात्र पार्वतीला रामाच्या अगाध शक्तीची प्रचिती आली. महादेवांकडूनही रामाचा जप का केला जातो, याचे कोडे तिला उलगडले. पण, त्यानंतर राम तिला म्हणाले, ‘‘माते तू आली आहेस. तर आता जाऊ नकोस. इकडेच राहा.’’ रामाचा हा आग्रह पार्वतीमातेने मोडला नाही. तेव्हापासून कोंढणपूर येथेच तुकाईचे वास्तव्य झाले.

तुकाई हे नाव ‘तुक्क’ म्हणजे ‘शुक्र’ या द्रविड शब्दापासून बनलेले असल्याचे सांगितले जाते. ‘शुक्रवारची देवी’ या अर्थाने तुकाई हा शब्द आलेला आहे. शुक्रवार हा देवीच्या उपासनेचा महत्त्वाचा वार आहे. या मंदिरात संत ज्ञानेश्वर येऊन गेल्याचे सांगतात; तसेच इतर अनेक मंदिरांप्रमाणे याचीही उभारणी पांडवांनी एका रात्रीत केल्याची कथा येथे सांगितली जाते.

येथील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासमोरच तुकाईमाता मंदिर आहे. मंदिर येथे असले तरी देवीचे मूळ स्थान सिंहगड किल्ल्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रामकड्यावरील एका गुहेत आहे. कोंढणपूर गावातूनही सिंहगडाचे दर्शन होते. मंदिराच्या बाहेरच एक कुंड आहे. काही पायऱ्या उतरून या कुंडाकडे जाता येते. या कुंडात असलेल्या गायमुखातून येणारे पाणी देवीचे प्रकट स्थान असलेल्या रामकड्यावरून येत असल्याचे सांगण्यात येते. या कुंडातील पाणी अंगावर घेतल्याने अनेक व्याधी बऱ्या होतात, अशी श्रद्धा आहे.

मंदिराचा मुख्य रस्ता दगडी आहे. प्रवेशद्वाराबाहेर इतरही लहान लहान मंदिरे आहेत. मंदिराचे बांधकाम दगडी, हेमाडपंथी पद्धतीचे आहे. त्याची रचना कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराप्रमाणे आहे. मंदिरात प्रवेश करताना सुरुवातीला नगारखाना लागतो. तुकाईमातेच्या उत्सवाच्या वेळी इथे वाजणाऱ्या नगाऱ्याने परिसर दुमदुमून जातो.

सभामंडपासमोर देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मूर्ती आहे. मंदिराची रचना पारंपरिक पद्धतीची सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडप नक्षीकामाने सजला आहे. त्यात उत्तम रंगरंगोटी पाहायला मिळते. गर्भगृहाच्या दरवाजावरही नक्षीकाम असून वरील भागात गणेश मूर्ती आहे. गर्भगृहात सुंदर मखर आहे. त्यात फुलांनी सजवलेली तुकाई देवीची प्रसन्न मूर्ती आहे. मंदिरात तुकाईमातेचे विश्रामगृह आहे, त्यात पादुका, तलवार, तसेच इतर साहित्य ठेवण्यात आले आहे. संपूर्ण मंदिराला तटभींती आहेत.

पौष महिन्यात तुकाई देवीची महिनाभर चालणारी यात्रा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यासाठी महाराष्ट्रासह तसेच इतर राज्यांतूनही भाविक येतात. भाविकांची सोय व्हावी म्हणून यात्रेनिमित्ताने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे दररोज विशेष बस सोडल्या जातात. नवरात्रोत्सवातही तुकाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • पुण्यापासून ३१ किमी अंतरावर
  • पुण्यातील अनेक भागांतून येथे येण्यासाठी पीएमपीएमएल बस सेवा
  • खेड शिवापूर फाट्यापासून रिक्षाची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या
  • पार्किंग परिसरात येण्यासाठी व्यवस्था
Back To Home