सावता माळी मंदिर

अरण, ता. माढा, जि. सोलापूर

‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ असे म्हणणाऱ्या संत सावता माळी यांची समाधी पंढरपूर जवळच्या अरण येथे आहे. आपले नियत कर्म योग्य प्रकारे करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे सांगणारे संत सावता माळी कधीही पंढरीच्या वारीला गेले नाहीत. उलट पांडुरंगच त्यांना भेटायला अरण येथे आल्याची कथा सांगितली जाते. त्यांच्या महानिर्वाणानंतरही त्यांच्या नावाची पालखी पंढरपूरला जात नाही, उलट आषाढीची वारी झाल्यावर खुद्द पांडुरंगाचीच पालखी सावता माळी यांच्या भेटीसाठी अरण येथे येते.

संत नामदेवांचे समकालीन असलेल्या संत सावता माळी यांचा जन्म पंढरपूरजवळ असलेल्या अरणभेंडी या गावात झाला. घरातल्या धार्मिक वातावरणामुळे त्यांना भक्तीमार्गाची आवड लागली. पण योग-याग-जप-तप यात ते अडकून पडले नाहीत. भक्तीला कशाचेही अवडंबर नसते, अंतर्मनाची शुद्धी, सदाचार आणि मनोभावे ईश्वरस्मरण ही त्रिसूत्री पाळत आपले काम नेटकेपणाने केले तर ईश्वर प्रसन्न होतोच, असे त्यांचे म्हणणे होते. धर्माचरणातील अंधश्रद्धा, कर्मठपणा आणि दांभिकतेवर त्यांनी सतत कोरडे ओढले.
सावता माळी यांच्या नावातील साव या शब्दाचा अर्थ होतो सज्जन गृहस्थ. त्यांचे सारे जीवन या शब्दाला शोभावे असेच होते. सावता माळी यांचे लग्न भानवसे रुपमाळी घराण्यातील जनाईशी झाले. त्यांनी उत्तम संसार केला. विठ्ठल आणि नागाताई अशी दोन मुले त्यांना झाली. आपल्या शेतात राबताना हरीनाम घेणे, हाच त्यांचा विरंगुळा होता. सेना न्हावी, नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांच्या अभंगातही त्यांच्या नेहमीच्या जगण्यातील शब्द आणि वाक्प्रचार येतात. ‘आमुची माळियाची जात। शेत लावू बागाईत। आम्हा हाती मोट नाडा। पाणी जाते फुलझाडा।। शांती शेवंती फुलली। प्रेम जाई-जुई व्याली। सावताने केला मळा। विठ्ठल देखियला डोळाll’ असे त्यांचे रोजचे जगणे मांडणारे अभंग गावातील काशीबा गुरव लिहून ठेवत असे. त्यांच्या या अभंगांनी मराठी संत वाङ्मय समृद्ध झाले आहे.

सावता माळी आपल्या मळ्यात किती रममाण झाले होते, हे सांगण्यासाठी एक कथा सांगितली जाते. ती अशी की पंढरपूर वारीच्या काळात त्यांच्या शेताजवळून वारकऱ्यांची दिंडी चालली होती. त्यांच्या भजनाचा, टाळमृदुंगांचा आवाज सावता माळी यांनी ऐकला. ते शेतातून बाहेर आले. त्यांनी वारकऱ्यांना तिथेच काही काळ विश्रांती घेण्याची विनंती केली. त्यांना पाणी, भाकरी, फळे व फुले दिली. वारकऱ्यांनी निघताना सावतांनाही पंढरपूरला येण्याचा आग्रह केला. सावता माळी म्हणाले, मी तुमच्यासोबत आलो तर माझा देव माझ्यावर रागावेल. वारकऱ्यांना काही कळेना. तेव्हा सावता माळी म्हणाले, माझा पाडुरंग या शेतात राहतो. या शेतात मळ्यात राबणे हीच त्याची सेवा. त्यामुळे हा मळा हेच माझे पंढरपूर आहे. आपले माळीयाचे काम त्यांनी आयुष्यभर केले. खऱ्या अर्थाने त्यांनी समाजमनाची मशागत केली. निसर्गतत्वातच देवत्व शोधणाऱ्या या थोर संताचे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७, म्हणजेच १२९५ च्या जुलै महिन्यात अरण येथे निधन झाले. सोपा धर्म ऐसा। हरिनाम घेणेll तरोनीया जाणे। भवसिंधूll हे त्यांच्याच अभंगातील शब्द त्यांनी सर्वार्थाने खरे करून दाखवले.
सावता माळी यांनी संजीवन समाधी घेतलेल्या ठिकाणी आधी लहानसे मंदिर होते. तेराव्या शतकातील या समाधीमंदिराचा अनेकवेळा जिर्णोद्धार झाला आहे. आज येथे तेथे मोठे प्रशस्त मंदिर उभे आहे. एकेकाळी अरण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गावाजवळ असलेला सावतांचा मळा तसा दाट अरण्यातच होता. आज तो अगदी रस्त्याजवळ आला आहे. समाधी मंदिरही अगदी रस्त्याला लागूनच आहे. रस्त्यालगत असलेल्या मंदिराच्या छोट्या दरवाज्याच्या बाजूला, मंदिराला अगदी खेटून एक मोठी विहीर आहे. असे सांगितले जाते की ही विहीर सावता माळी आणि त्यांच्या कुटुंबियांनी स्वतः खणली. खूप खोदूनही या विहिरीला पाणी लागत नव्हते. तेव्हा सावतांनी विठ्ठलाचा धावा केला. त्याबरोबर विहिरीत असलेला दगडाचा थर फोडून पाण्याची धार वर उसळली. या विहिरीचेच पाणी सावता आपल्या मळ्याला देत असत. त्यांचा मळा या मंदिराशेजारीच आहे व त्यांचे निवासस्थानही तेथून जवळच होते. तेथेही आता एक सभागृह उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी चित्रांतून त्यांचे जीवनदर्शन मांडलेले दिसते.
या विहिरीशेजारी असलेल्या दरवाजाशिवाय या मंदिराला समोरच्या बाजूने आणखी एक दरवाजा आहे. तो महाद्वार म्हणून ओळखला जातो. दरवाजाच्या चौकटीला धातुच्या पत्र्याने मढवण्यात आलेले आहे. या दरवाजाच्या वरच्या बाजूला सावता माळी यांची प्रतिमा रेखाटण्यात आली आहे. ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. या दरवाजातून आत प्रवेश केला की डाव्या हाताला दोन छोटी मंदिरे आहेत. एकात शंकरमूर्ती तर दुसऱ्यात कृष्णमूर्ती आहे. शेजारी त्याच आकाराचे गणपतीची मूर्ती असलेले मंदिरही आहे. उजवीकडील छोट्या मंदिरात दत्तमूर्ती आहे. येथून जवळच सभामंडपातच तुळशीवृंदावन आणि त्याला टेकून ठेवलेली हनुमानाची शिळा आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रशस्त ओवऱ्या आहेत. हा सारा परिसर अत्यंत स्वच्छ भासतो. सभामंडपात एक गरुडखांब आहे व त्याला धातुच्या पत्र्याने मढविलेले आहे. सभामंडपाच्या छताच्या खालच्या बाजूला सर्व दिशांना सावता माळी यांचे अभंग लिहिलेले आहेत.
सभामंडपात समोरच सावता माळी यांचे समाधी स्थान आहे. हे मूळ व प्राचीन मंदिर दगडी बांधकामातील आहे. मंदिराला तीन छोट्या महिरपदार कमानी आहेत. त्यापैकी मधल्या कमानीसमोर दोन पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. त्यापुढे असलेल्या गर्भगृहाची द्वारशाखा चांदीच्या नक्षीदार पत्र्याने मढविलेली आहे. ललाटबिंबावर एका लहानशा मखरात गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतींवरील देवकोष्टकात डावीकडे संत नामदेव आणि उजवीकडे संत ज्ञानेश्वर अशा दोन मूर्ती आहेत. पुढे गर्भगृहात सावता माळी यांची समाधी आहे. समाधीच्या चौथऱ्यावर सावता माळी यांचा चांदीचा मुखवटा व मागील बाजूस विठ्ठलमूर्ती आहे. गर्भगृहाच्या वर चार कोनांवर चार संतमूर्ती व मध्यभागी पाच टप्प्यांचे देवकोष्टकांचे शोभिवंत शिखर आहे. त्यावर शिरोभागी आमलक व कळस आहेत.
मंदिरात आषाढ वद्य चतुर्दशीला संत सावता माळी यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. आषाढीची वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी संत सावता माळी यांना भेटायला येते तेव्हा मंदिरात मोठी गर्दी उसळते. आताही पंढरपूरला जाणाऱ्या काही दिंड्या सावता माळी यांच्या मंदिरात येतात. त्यांचे दर्शन घेऊन पुढे निघतात. पांडुरंगाची पालखी येथे आल्यावर दहीहंडी फोडून मोठा उत्सव साजरा होतो. मंदिराजवळच अन्नछत्र आहे. तेथे वारकऱ्यांसाठी आणि इतर भक्तांसाठी भोजनाची सोय करण्यात येते.

उपयुक्त माहिती

  • माढा येथून ३० किमी, तर पंढरपूर येथून ४१ किमी अंतरावर
  • माढा, सोलापूर व पंढरपूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ०९९२१११९८७८
Back To Home