नाग हा खरेतर शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. पण त्याच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात भीतीच अधिक असते. नाग दिसला की सगळ्यांचीच घाबरगुंडी उडते ती त्यामुळेच. पण नागाला पाहूनही न घाबरणारे, त्याच्यासोबत सहजपणे वावरणारे गावकरी असलेले, त्याला मित्रच नाही तर घरातला सदस्य मानणारे एक गाव महाराष्ट्रात आहे. त्या गावाची ओळख नागोबाचे शेटफळ अशीच आहे. गावात नागनाथांचे पुरातन मंदिर तर आहेच पण महत्वाचे म्हणजे गावातल्या प्रत्येक घरात, अगदी नव्याने बांधलेल्या घरातही नागोबासाठी खास जागा असते.
करमाळा तालुक्यातील शेटफळ गावात जुने दगडी वाडे आहेत, तशीच दगड-मातीचा वापर करून बांधलेली अनेक जुनी घरेही आहेत. या प्रत्येक वाड्यात आणि घरात नागांसांठी वरच्या बाजूला माळवद केलेले आढळते. जुन्या घराची दुरुस्ती करताना आधी माळवदाची सुरक्षा तपासली जाते. नवे घर बांधताना त्यातही नागांसाठीची विशेष सोय असेल, असे पाहिले जाते. त्यासाठी खास तयार केलेल्या मातीच्या माळवदात गोलाकार आकाराचे बांबू लावले जातात. तिथे नागांना सहजपणे राहता यावे, यासाठी ही सोय असते. कालमानपरत्वे या रचनेत थोडाफार बदल झाला असला, तरी नागांविषयी गावाला वाटणारी आत्मियता बदललेली नाही. गावाची लोकसंख्या अंदाजे तीन हजार असावी. पण गावात असलेल्या नागांची संख्या त्याहीपेक्षा जास्त असल्याचा दावा ग्रामस्थ करतात.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार येथे असलेल्या सापांमध्ये किंग कोब्रांचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले जाते. पण तरीही गेल्या अनेक वर्षांत सर्पदंशामुळे येथे कुणी दगावलेले नाही की कोणाला नागांमुळे इजा झालेली नाही. सर्व समाजाचे नागरिक आणि हे नाग शेटफळ गावात गुण्यागोविंदाने राहतात. रस्त्यामध्ये कुणाला एकादा नाग दिसलाच तर त्यामुळे घाबरुन न जाता देवबाप्पा आले, असे म्हणत त्याचे स्वागत केले जाते. त्यानंतर त्याला कोणताही अपाय होऊ नये, याची काळजी घेत त्याला सन्मानाने गावातील नागनाथ मंदिरामागे सोडले जाते. या मंदिराला बाराशे वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते. इतर मंदिरामध्ये धातुचा नागफणा शिवपिंडीभोवती असला तरी थेट शिवपिंडीवर नागाकृती कोरलेले मंदिर दुर्मिळ असते. येथे मात्र अशी पिंडी असलेल्या या नागनाथ मंदिरामुळेचे गावात नागाला मान आणि आपलेपणा मिळतो, असे म्हटले जाते. या गावात एकदा आलेले नाग मग कुठेही जात नाहीत. गावातील एका व्यक्तीने त्याच्या लहानपणी एका नागाच्या फण्याला झालेली इजा पाहिली होती. कालांतराने ही जखम बरी झाली असली तरी या नागाच्या फण्यावर जखमेची खूण कायम राहिली. अशी खुणा असलेला तो नाग अद्यापही गावात फिरताना दिसत असल्याचा त्यांचा दावा आहे. कित्येक वर्षापासून एकाच ठिकाणी नाग वावरत असल्याने ते माणसाळलेले असल्याचेही ग्रामस्थांकडून सांगितले जाते.
या मंदिराबाबत आख्यायिका अशी की शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यासाठी आलेल्या मुघल सैन्याने या परिसरातही मंदिरांची तोडफोड आरंभली होती. त्यावेळी येथेही आक्रमकांचा हल्ला झाला. मंदिराबाहेर असलेल्या मारुतीच्या मंदिराची त्यांनी तोडफोड केली. ती सारी सेना नागनाथ मंदिरात शिरणार तितक्यात मंदिरातून मधमाशांचा एक मोठा थवाच बाहेर आला. मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी आलेले हे सैन्य त्या मधमाशांच्या चाव्यांनी हैराण झाले. आपला जीव वाचवण्यासाठी त्या साऱ्यांना पळ काढावा लागला.
नागनाथांच्या मंदिराबाहेर अर्धवट पाडलेले हनुमान मंदिर आणि त्यात हनुमानाची मूर्ती आहे. या मंदिराच्या मागे नागनाथ मंदिराची कोटभिंत आहे. मंदिराच्या चारही दिशांना असलेल्या भिंतीत दोन दरवाजे आहेत. त्यातील एक दरवाजा मंदिराशेजारी असलेल्या विहिरीच्या दिशेने उघडतो. या विहीरीतील पाण्याचा वापर पूर्वी पिण्यासाठी आणि मंदिरातील इतर कामांसाठी केला जात असे. मंदिर आवारात एक उत्तम रचनेची पुष्करणी आहे. त्या पुष्करणीच्या भिंतींमधील देवकोष्टकांत अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिर परिसरात काही वीरगळही आहेत. मंदिराच्या समोर असलेल्या नंदीमंडपात नंदीच्या दोन मूर्ती आहेत. नंदीमंडपाला असलेले चार खांब आणि मंदिराच्या सभामंडपात असलेले खांब एकाच पद्धतीचे आहेत. बंदिस्त सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.
मंदिरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या दरवाजाजवळ नागयुगुलांच्या दगडी कोरीव प्रतिमा आहेत. मंदिराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वागतिका, द्वारपाल आणि यक्ष प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्या प्रतिमांच्या वर नक्षीदार स्तंभशाखा आहे. मंदिराच्या गुढमंडपात मध्यभागी कासव आणि नंदीच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडे एक शंकर पार्वतीची मूर्ती आहे. ही मूर्तीची काहीशी झिज झाली असली तरी नंदीवर बसलेल्या शंकर पार्वतीच्या अंगावरील दागिने, त्यांच्या हातातील वस्तू स्पष्ट दिसतात. शंकराच्या मांडीवर गणपती, तर पार्वतीच्या हातात षडानन म्हणजेच कार्तिकेयाची मूर्ती आहे.
गर्भगृहात शंकराची पिंडी आहे. त्यामागील चौथऱ्यावर शंकराचा मुखवटा आहे. गर्भगृहावर साधेसे शिखर आणि वर कळस आहे. शेजारी आणखी एक लहानसे शिवमंदिर असून त्याचा दरवाजा म्हणजे मुख्य मंदिराच्या दरवाजाची प्रतिकृती दिसते. या मंदिरात असलेल्या पिंडीवरही नागप्रतिमा कोरलेली दिसते.
या मंदिरात चैत्र महिन्यात तसेच श्रावणात नामसप्ताहाचे आयोजन होते. यावेळी भजन कीर्तन आणि महाभंडारा होतो. महाशिवरात्रीला दोन दिवसांची यात्रा असते. त्यावेळी नंदीवरून देव गावात फिरविला जातो. नागपंचमीचाही उत्सव येथे मोठ्या प्रमाणात होतो. असे सांगितले जाते की या दिवशी गावातील नागांना खास मंदिरात आणले जाते. पण काही नाग स्वतःहून या मंदिरात येतात. हे सारे नाग मंदिरात मोकळेच असतात. ते शांत राहून भाविकांकडून नमस्कार करून घेतात. या नागांभोवती जमून गावातील महिलावर्ग गाणी म्हणतो.