देशातील प्रख्यात १२ ज्योतिर्लिंगांमध्ये मध्य प्रदेशातील ओंकार-मान्धाता येथील ओंकारेश्वर हे धार्मिकदृष्ट्या एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. त्याच्या नावाने ओळखले जाणारे जळगाव शहरातील जयनगर येथील ओंकारेश्वर मंदिर हे परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील शिवपिंडी स्वयंभू असल्याचे सांगण्यात येते. यामुळे हे स्थान अत्यंत चैतन्यपूर्ण व जागृत मानले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर नवसातून बांधण्यात आलेले आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की जळगाव शहारातील मिश्रीलाल जोशी हे पोटशूळाच्या आजाराने त्रस्त होते. सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी संन्यास घेतला आणि ते काशीला निघून गेले. तेथे त्यांना गुरूबंधु म्हणून जसवंत सिंग नावाचे गृहस्थ भेटले. जसवंत सिंग यांनी त्यांचे मतपरिवर्तन केले व काशीस कायमचे राहण्याची गरज नाही, असे त्यांना सांगितले. दरम्यानच्या काळात त्यांच्या बंधुंनी ओंकारेश्वराला नवस केला की जर भावाचा पोटशूळ थांबला व तो घरी परतला तर जळगावात तुमचे मंदिर बांधून त्याची यथासांग सेवा करू. इकडे गुरूबंधुंची आज्ञा मानून मिश्रीलाल जळगावला परतले. त्यानंतर मिश्रिलाल आणि त्यांच्या बंधूंनी १७ आगस्ट १९६६ रोजी ओंकारेश्वर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून मंदिराच्या बांधकामास सुरूवात केली.
सन १९६८ मध्ये जयनगर परिसरात २८,५०० चौरस फूट जागेवर ओंकारेश्वराचे मंदिर उभारणीचे काम पूर्ण झाले. परंतु या मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठीची शिवपिंडी ही स्वयंभू असावी, अशी या बंधूंची इच्छा होती. त्यासाठी ते मध्य प्रदेशातील नर्मदा नदीकिनाऱ्यावर असलेल्या ओंकारेश्वरला गेले. परंतु खूप शोध घेऊनही स्वयंभू शिवपिंडी न मिळाल्याने त्यांना माघारी परतावे लागले. काही दिवसांनी ओंकारेश्वर येथून स्वयंभू शिवपिंडी असल्याचा संदेश आला. त्यानंतर तेथून स्वयंभू शिवपिंडी आणण्यात आली. ८ फेब्रुवारी १९७१ रोजी महाऋषी ब्रजमोहन व्यास यांच्या हस्ते या पिंडीसह इतर मूर्तींचीही मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून हे देवस्थान शहरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
जळगाव शहराच्या गजबजलेल्या जयनगर भागात ओंकारेश्वराचे हे मंदिर आहे. या मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीमधील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या स्तंभांवर सिंहांची शिल्पे आहेत. फरसबंदी असलेले प्रांगण प्रशस्त आहे. जमिनीपासून उंचावर असलेल्या या मंदिराची संरचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मुखमंडपात असलेल्या नऊ पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची शुभ्र संगमरवरी मोठी मूर्ती आहे. या मूर्तीवरील अलंकार सुवर्णरंगात कोरलेले असल्याने ती आणखी सुबक भासते. सभामंडपाच्या उजवीकडे व डावीकडे बाहेर पडण्यासाठी दरवाजे आहेत.
याशिवाय भाविकांच्या सुविधेसाठी येथे दर्शनरांगेची व्यवस्था आहे.
गर्भगृहात मध्यभागी ओंकारेश्वराची संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीच्या शिरावर पाच फण्यांची नागदेवता आहे. मूर्तीसमोर धातुच्या पत्र्याने मढविलेली स्वयंभू शिवपिंडी आहे. या पिंडीवर पंचधातूच्या पात्रातून जलाभिषेक होत असतो. मुख्य मूर्तीच्या डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. चंद्रिकेश्वर व नंदिकेश्वर यांचेही येथे स्थान आहे. मंदिराच्या छतावर चारही कोपऱ्यांत मेघडंबरी आहेत. गर्भगृहावर असलेल्या शिखरावर चारही बाजूने अनेक शिखरांच्या प्रतिकृती आहेत. शिखराच्या शिरोभागी आमलक व त्यावर कळस आहे.
महाशिवरात्रीला या मंदिरात मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून भाविकांना ओंकारेश्वराचे दर्शन घेता येते. दिवसभर चोवीस तासांत सात पर्वांमध्ये विविध अभिषेक करण्यात येतात. अभिषेक झाल्यानंतर होणाऱ्या महाआरतीसाठी १०८ निरंजनांचा वापर केला जातो. यावेळी आलेल्या भाविकांना महाप्रसाद देण्यात येतो. गुरुपौर्णिमेपासून पिठोरी आमावस्येपर्यंत या मंदिरात उत्तर भारतीय श्रावणमास साजरा केला जातो. या ४५ दिवसांत येथे विशेष रुद्राभिषेक केले जातात. याशिवाय श्रावणी सोमवार, श्रीराम नवमी, गुरुपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशीही जिल्ह्यातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.