नागनाथ मंदिर

कुर्डू, ता. माढा, जि. सोलापूर

नागनाथ महाराजांना मानणारा भक्तवर्ग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे. नवनाथांपैकी एक असणारे नागनाथ महाराज हे शंकराचा अवतार असल्याचे मानले जाते. माढा तालुक्यातील कुर्डू हे ठिकाण नागनाथांच्या वास्तव्याने पावन झालेले आहे. येथील प्राचीन नागनाथ मंदिर हे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. फाल्गुन महिन्यात येथे होणाऱ्या उत्सवासाठी महाराष्ट्रासह परराज्यातूही हजारो भाविक येतात. मंदिर परिसरात असलेल्या सासूसुनेच्या विहीरी, आतून पोकळ असलेल्या दीपमाळा, तेराव्या शतकातील शिलालेख यावरून मंदिराचे प्राचिनत्व सिद्ध होते

सोलापूर परिसरात नागनाथांची अनेक मंदिरे आहेत. त्यांच्यावर येथील नागरिकांची विशेष श्रद्धा आहे. नागनाथ प्रत्येक महिलेला बहिण मानतात. आपल्या प्रत्येक बहिणीचे ते सतत रक्षण करतात, असा या परिसरातील महिलांचा ठाम विश्वास आहे. प्रतिवर्षी नागपंचमीला अनेक महिला नागनाथांच्या नावाने उपवास करतात. त्यालाभावाचा उपवासअसे म्हटले जाते. ज्याप्रमाणे वारकरी पंढरीची वारी करतात, तशी या परिसरात नागनाथ महाराजांची अमावास्येची वारी काढली जाते. या वारीत हजारो भक्त सहभागी होतात. दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या कुर्डू गावात तेराव्या शतकात या मंदिराची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्य़ात येते. या परिसरात काही वर्षांपूर्वी सापडलेल्या एका दगडी शिलालेखाचा त्यासाठी हवाला देण्यात येतो.

मंदिर परिसरात सापडलेला हा शिलालेख म्हणजे प्रत्यक्षात एक गद्देगळ आहे. तत्कालीन सामाजिक इतिहासासाठी तो उपयुक्त मानला जातो. शिलालेखाबरोबरच त्यात काही शिल्पेही आहेत. कुर्डू येथे सापडलेला गद्देगळ पाच फूट उंच दोन फूट रूंदीचा आहे. त्यावर चंद्र सूर्याच्या आकृती आणि लेखन आहे. त्यावर नऊ ओळी कोरलेल्या आहेत. स्वतीश्री सकु ११८३ म्हणजे सन १२६१ असा कालोल्लेख आहे. यावरून हे मंदिर तेराव्या शतकातील असल्याचे सिद्ध होते. अशा गद्देगळीत लिहिलेले नियम आणि आज्ञा नागरिकांनी मोडू नये, त्यांचे कसोशीने पालन करावे, यासाठी त्याच्या शेवटी शापवचने कोरलेली असतात.

असे सांगितले जाते की नागनाथ महाराजांचे भ्रमण सुरू असताना ते या परिसरात आले होते. हे रम्य स्थान पाहून त्यांनी काही काळ येथे विश्रांती घेतली होती. त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या ठिकाणी मग मंदिर उभारण्यात आले. मंदिराच्या भोवती आवारभिंत आहे. त्यातील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मंदिरासमोर दोन दीपमाळा आहेत. दोन्ही दीपमाळा दगडी बांधकामाच्या प्राचीन आहेत. या दीपमाळांच्या आतून शिखरावर जाण्यासाठीचा गोलाकार पायरी मार्ग आहे

नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. नंदी मंडपात शुभ्र रंग दिलेली नंदीची मोठी मूर्ती आहे. नंदीमंडपाच्या समोर सभामंडपाच्या उतरत्या छपरावर शंकर आणि पार्वतीच्या मूर्ती आहेत. या मूर्तींवर पंचमुखी दगडी नागाने छत्र धरलेले आहे. सभामंडपावर मध्यभागी असलेल्या या मूर्तींच्या बाजूला हंसशिल्पे आहेत. सभामंडपातील देवकोष्टकांत गणपती आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत. येथेच शिवशंकर आणि त्यांच्या वामांगी बसलेली पार्वतीची प्राचीन मूर्ती आहे. पुढे अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला स्तंभशाखा आहेत. अनेक मंदिराच्या उंबरठ्याला अर्धगोलाकार चंद्रशिळा असते. येथे मात्र ती चौकोनी आकाराची आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात काळ्या पाषाणातील अखंड शिवपिंडी आहे. या पिंडीच्या मागील बाजूस मिशी असलेला फेटा ल्यालेला नागनाथांचा मुखवटा आहे

गर्भगृहाच्या छतावर चारही कोपऱ्यांत चार वैशिष्ट्यपूर्ण नंदीमुखे आहेत. शिखरावरील लहान लहान देवकोष्टकांत देवीदेवतांसह संतमहंतांच्याही मूर्ती आहेत. या शिखरावर दोन आमलक आहेत. त्यापैकी खालचा आमलक कमलपर्ण तर वरील आमलक कमळकळीच्या आकाराचा आहे. शिखरावर शीर्षस्थानी कळस आहे. मंदिराशेजारी असलेले दत्तमंदिरही प्राचीन आहे. या मंदिराच्या आवारात काही पुरातन शिल्पे असलेल्या शिळा आहेत. याशिवाय येथे पालखी आणि रथ आहे. उत्सवांच्या वेळी त्यांचा वापर केला जातो. या प्रांगणात सासूसुनेच्या विहीरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन विहिरी आहेत. त्यापैकी एका विहिरीचे पाणी गोड दुसरीचे खारट आहे. या दोन्ही विहिरींचा विस्तार मोठा आहे. पुष्करणींसारखी रचना असलेल्या या विहिरींत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. असे सांगितले जाते की स्नान केल्यानंतर या विहिरीतून मंदिरात येण्यासाठी एक भुयारी मार्ग होता.

फाल्गुन महिन्यात शेवटच्या सोमवारपासून पाच दिवस नागनाथांची यात्रा असते. यात्रेची सुरूवात सकाळी महाआरतीने होते. अभिषेक झाल्यानंतर दुपारी महाप्रसाद सुरू होतो, तो पूर्ण दिवस चालतो. पहिल्या दिवशी रात्री अकराच्या सुमारास पालखी निघते. मंदिराभोवती एक प्रदक्षिणा करून नंतर खास रथातून देव नगर प्रदक्षिणेला निघतो. ही प्रदक्षिणा रात्रभर चालते. पहाटे पाचच्या सुमारास पालखी पुन्हा मंदिरात येते. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची स्पर्धा पार पडते. कुर्डू गावाला कुस्तीची मोठी परंपरा आहे. उत्सवाच्या निमित्ताने होणारी ही कुस्तीस्पर्धा राज्यातील एक महत्वाची स्पर्धा मानली जाते. तिसऱ्या दिवशी किर्तन प्रवचन आणि चौथ्या दिवशी मनोरंजनाचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम असतात. या साऱ्या काळात मंदिराच्या दीपमाळा शेकडो दिव्यांनी उजळून निघतात. याव्यतिरिक्त महाशिवरात्री, सोमवती अमावास्या, नागपंचमी या सणांच्या वेळीही मंदिरात भाविकांची गर्दी असते

उपयुक्त माहिती

  • माढा येथून १८ किमी, तर सोलापूर येथून ८० किमी अंतरावर
  • माढा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंगेश गुरव, पुजारी, मो. ८९७५६२३८३६
Back To Home