शनैश्वर देवस्थान

सुरजगिरी महाराज मठ

पोथरे, ता. करमाळा, जि. सोलापूर

महाराष्ट्रातील शनीदेवाचे मुख्य ठिकाण असलेल्या शनी शिंगणापूर येथील चौथऱ्यावरील शिळा हे त्याचे स्थान मानले जाते. मात्र, करमाळा तालुक्यातील पोथरे या गावातील शनैश्वर मंदिरात शनिदेवाचे साकार रूप आहे. हे स्थान शनीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची मान्यता आहे. एका बारवेच्या भिंतीला लागून असलेल्या, विशिष्ट्यपूर्ण रचनेच्या, या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पायऱ्या उतरून यावे लागते. या मंदिराला लागून जमिनीखाली असलेला तीन मजली दगडी बांधकामातील भव्य मठ, ज्यात अनेक भुयारी मार्ग आहेत, हे येथील वैशिष्ट्य समजले जाते

पोथरे गावातील शनैश्वर देवस्थानाची ही आगळीवेगळी वास्तू भाविकांमध्ये मठ म्हणून प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की आपल्याकडे असलेल्या सिद्धींचा वापर करून सुरजगिरी महाराजांनी या मठाची स्थापना केली होती. महाराज पहिल्यांदा या परिसरात आले तेव्हा येथे घनदाट जंगल होते. या स्थानावर आल्यानंतर त्यांच्या हातातील छडी गरकन फिरली आणि नेमक्या याच ठिकाणी जमिनीवर विसावली. त्यामुळे महाराजांनी या रम्य स्थानी मठ उभारण्याचा निर्णय घेतला. शनिमंदिरात जाण्यासाठीच्या पायऱ्या उतरताना त्याचे दोन मजले जाणवतात. पण प्रत्यक्षात मठाला तीन मजले असल्याचे सांगितले जाते. तिसरा मला या विहिरीच्या पाणीपातळीच्या स्तरावर किंवा त्याहूनही खाली असल्याचा दावा ग्रामस्थ करतात

पोथरे हे गाव कान्होळा नदीकाठावर आहे. मठाच्या उत्तर दिशेला तिचे पात्र आहे. नदीकडून मठाकडे येण्याच्या मार्गावर मठाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. ताशीव दगडातून घडवलेल्या या दरवाजाची आज काहीशी पडझड झालेली आहे. या प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला मोठ्या मंदिरांच्या प्रवेशद्वारांना किंवा किल्ल्यांच्या महादरवाजांना असतात तशा देवड्या आहेत. येथे पुरातन बारव प्रकारातील विहीर आहे. या विहिरीच्या पाणीपातळीपासून काहीशा उंचीवर शनैश्वराची मूर्ती असलेले मंदिर आहे. या मंदिराच्या गर्भगृहापर्यंत येण्यासाठी पायरीमार्ग आहे. येथील शनिदेवाची मूर्ती काळ्या रंगाच्या अखंड पाषाणातून घडविलेली आहे

मंदिराची अख्यायिका अशी की येथील मठाचे बांधकाम जेव्हा पूर्ण झाले तेव्हा सुरजगिरी महाराजांनी त्याच्या वास्तुशांतीसाठी काशीहून काही ब्राह्मण बोलावले होते. या मोठ्या वास्तुची पुजा करण्यासाठी वेळ लागल्याने दुपार उलटून गेली. त्यामुळे दुपारपूर्वी जेवण्याचा नेम असलेले ब्राह्मण दुपारनंतर जेवणार नाही, असे सांगून निघू लागले. पण सुरजगिरी महाराजांनी आपल्या हातातील काठी आकाशाच्या दिशेने उलटी फिरवल्यानंतर सूर्य मागे सरकला आणि दुपारपूर्वीची वेळ पुन्हा आली. दुपारपूर्वी जेवण्याचा नेम पार पाडण्यात अडचण नसल्याने मग सगळी मंडळी भोजन करून तृप्त झाली

दरम्यान, सूर्याचा प्रवास उलटा फिरविण्याचे सामर्थ्य कुणाच्या अंगी आहे हे पाहण्यासाठी शनिमहाराज या ठिकाणी आले. ते पाहून सुरजगिरी महाराजांनी त्यांचाही सत्कार केला आणि त्यांना येथे थांबण्याचा आग्रह केला. त्याला मान देऊन शनिदेवांनी येथेच थांबायचे ठरवले. यावेळी शनिदेवांनी आपल्यासोबत गंगेचे पाणी आणले होते. त्या पाण्याची खूण म्हणून त्यांच्या मंदिरासमोर असलेले गोमुख दाखवण्यात येते. अनेकदा हे गोमुख पाणीपातळीच्या खाली असते. मात्र ते वर आले की त्या गोमुखातून स्वच्छ पाणी पडते आणि ती गंगा असते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. विहिरीतील पाणी कमी झाल्यावर या गोमुखाजवळून उतरण्यासाठीच्या पायऱ्या दिसू लागतात. तेथेच एक भुयारी मार्ग आहे. या भुयारातून थेट मठाच्या सर्वात खालच्या म्हणजे तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करता येतो. असे सांगितले जाते की पूर्वी या मठात तपश्चर्या करणारे सुरजगिरी महाराज याच भुयारी मार्गाने शनिमहाराजांची पुजा करण्यासाठी मंदिरात येत असत.

विहिरीच्या डावीकडून मठात जाण्यासाठीचे प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना किल्ल्यासारख्या भिंती आहेत. या भिंतींमध्ये तीन वातायने आहेत. येथून अनेक भुयारी मार्गांतून मठाच्या जमिनीखाली असलेल्या वास्तुच्या पहिल्या थरात प्रवेश होतो. येथे डाव्या हाताला एक बंदिस्त सभागृह आहे. बाहेरील भिंतीत दिसणाऱ्या वातायनांतून येथे हवा येईल, अशी रचना आहे. पण ती फक्त वातायने नाहीत. त्या वातायनांच्या समोर अंदाजे सत्तर ते ऐंशी फुटांवर एका देवळीत एक मूर्ती ठेवण्यात आली आहे. रोज सकाळी सूर्याची किरणे त्या छोटी छोटी गोल भोके असलेल्या वातायनांतून त्या मूर्तीवर पडतात. ही वातायने तीन आहेत. सूर्याचे उत्तरायन आणि दक्षिणायन लक्षात घेऊन कोणत्याही मोसमात मूर्तीवर किरणे पडतील, यासाठीची ती वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. पूर्वी येथे अन्नपुर्णेची पुरातन पंचधातूची मूर्ती होती. पण आता ती गहाळ झालेली आहे

मठाच्या मधल्या (जमिनीच्या वरील भागात) प्रांगणात प्रवेश करण्यासाठीचा दरवाजा आहे. येथे तीन समाधी मंदिरे चारही बाजूने ओवऱ्या आहेत. यापैकी एक समाधी सुरजगिरी महाराजांची आणि शेजारच्या दोन त्यांच्या शिष्यांच्या असल्याचे सांगितले जाते. या मठाच्या दगडी बांधकामाची रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. अनेक ठिकाणी खालच्या मजल्यावर जाण्यासाठी लहान लहान पायरी मार्ग (गुहेप्रमाणे) आहेत. खालच्या मजल्यावर हवा आणि काही प्रमाणात प्रकाश रहावा यासाठी मठाच्या जमिनीत छोटी छोटी उभी भोके ठेवलेली आहेत. यापैकी एका भुयारी मार्गातून खाली उतरून महादेवाच्या मंदिरात प्रवेश होतो. येथे नंदी आणि महादेवाची मोठी पिंडी आहे. वरच्या कलशातील पिंडीवर पडणारे पाणी एका ठिकाणी जमा होते. तेथून ते बाहेर नेण्याची व्यवस्था आहे. या शिवमंदिराच्या अवती भवतीच्या कोनाड्यांत काही मूर्ती आहेत. त्यात असलेली गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. एका कोनाड्यात असणारी एक मूर्ती बाहेर असलेल्या शनिच्या मूर्तीशी साधर्म्य सांगणारी आहे. दुसऱ्या कोनाड्यात शस्त्रधारी देवीची मूर्ती आहे. या मंदिराच्या चारही बाजूने ध्यान करण्यासाठी प्रशस्त खोल्या आहेत.

येथील नंदीच्या बाजूने एक लहान भुयारी मार्ग आहे. येथून जमिनीखाली असलेल्या दुसऱ्या दगडी महालात प्रवेश होतो. हा टप्पा संत सुरजगिरी महाराजांच्या समाधीखालचा असल्याचे सांगितले जाते. त्या महालातूनही पुढे काही गुप्त वाटा भुयारी मार्ग संपूर्ण मठभर पसरले आहेत. येथील महालांच्या मध्यवर्ती भागात लोखंडी साखळदंड टांगलेले आहेत. यापैकी एका महालात फार पूर्वी यादवकालीन नाणी सापडल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात

मठाची एकूण रचना पाहता तो स्थापत्यकलेचा अतिशय सुंदर नमुना भासतो. जमिनीखाली असला तरी कोठेही पावसाचे पाणी साचून राहू नये याची काटेकोर दक्षता येथे घेण्यात आल्याचे दिसते. या भागात उन्हाळा कडक असल्याने पाण्याच्या शेजारी साधनेसाठी हा बंदिस्त मठ उभारण्यात आला असावा. आताही येथे आल्यावर बाहेर कडक उन्हे असली तरी आत गारवा जाणवतो. मठात अनेक ठिकाणी शिवायले ध्यानगृहे आहेत. मात्र ही सारी रचना गुंतागुंतीची आहे. त्याचा फायदा घेत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांनी भूमिगत होण्यासाठी या मठाचा आधार घेतला होता, असे सांगितले जाते. हा मठ बहुतांश ठिकाणी उत्तम स्थितीत असला तरी काही ठिकाणी मात्र ढासळू लागला आहे

मठात असलेल्या मंदिरांच्या अनुषंगाने येथे धार्मिक उत्सव साजरे केले जातात. श्रावण महिन्यात आणि चैत्र महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. या उत्सवादरम्यान येथे भजन, कीर्तन, भारुड इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाशिवरात्रीप्रमाणेच शनी जयंतीला येथे मोठा उत्सव साजरा होतो. मंदिर परिसरात दिसणाऱ्या रथामधून शनी महाराजांची मिरवणूक काढण्यात येते. शनिवारी आणि अमावस्येला या मठात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते

उपयुक्त माहिती

  • करमाळा येथून किमी, तर सोलापूर येथून १२८ किमी अंतरावर
  • करमाळा येथून एसटी खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home