नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल म्हणून ओळखला जातो. आदिवासी समाज मूलतः निसर्गपुजक असतो. गवतापासून ते वाघ, नाग पुजणारा हा समाज नदी, डोंगर इतकेच काय तर दगड–धोंड्यांतही देव पाहतो. या समाजासोबतच इतर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले नवापूर तालुक्यातील शिरवे येथील धवळीबारी माता मंदिर नंदुरबारमधील प्रसिद्ध देवस्थान आहे. या मंदिरात दगडातील अरुंद गुहेला धवळीबारी (अन्नपूर्णा) माता म्हणून पुजले जाते. भक्तांचे कल्याण करणारी ही देवता जागृत व नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार शिरवे येथील धवळीबारी मातेचे मंदिर हे सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे आहे. पूर्वी आदिवासी समाजाची सर्व देवालये उघड्या आकाशाखाली होती. त्यापैकीच हे एक मंदिर होय. असे सांगितले जाते की या मंदिराच्या गुहेतील भुयारातून सप्तशृंगी गडावर जाता येत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, तेव्हा परतीच्या प्रवासात मंदिराच्या मागे असलेल्या शिरवे गडावर मुक्काम केला होता. त्यादरम्यान त्यांनी येथील देवीचे मंदिर बांधण्याचे आदेश दिले होते. या परिसरात अनेकदा उत्खननात सोन्याची नाणी वा मोहरा सापडतात. त्याबाबत असे सांगितले जाते की सुरतेचा लुटलेला खजिना या मार्गावरून नेत असताना त्यापैकी काही नाणी या परिसरात पडली होती.
शिरवे गावाजवळ डोंगर टेकडीवर असलेल्या या मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्का रस्ता आहे. मंदिराच्या आवारभिंत असलेल्या प्रांगणात पेव्हरब्लॉकची फरसबंदी आहे. आवारभिंतींवर वारली शैलीतील अनेक चित्रे रेखाटलेली आहेत. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणापेक्षा काहीशा उंचावर असलेल्या मंडपातून मंदिरात प्रवेश होतो. मुखंडपात समोरील बाजूला दोन गोलाकार स्तंभ व मागील भिंतीच्या आधारावर पाच थरांचे चौकोनी शिखर व त्यावर कळस आहे. मुखमंडपाच्या उजवीकडे एका चौथऱ्यावरील मखरात गणेशमूर्ती आहे. येथून सभामंडपात प्रवेश होतो. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात मध्यभागी दोन गोलाकार नक्षीदार स्तंभ आहेत व त्या स्तंभांमध्ये भिंतीलगत दोन पाषाणाच्या मधोमध अरुंद गुहा आहे. ही गुहा येथे धवळीबारी माता म्हणून पुजली जाते. गुहेसमोर दोन्ही बाजूस असलेल्या स्तंभांवर छत असलेला लहानसा मखर आहे. या मखराच्या शेजारी पितळी त्रिशूल आहे.
मंदिराच्या छतावर चहुबाजुने आधारासाठी कमी उंचीच्या स्तंभांचा सुरक्षा कठडा आहे. मध्यभागी एकामागे एक अशी दोन शिखरे आहेत. पुढील लहान शिखर घुमटाकार आहे व त्यावर पानाफुलांच्या नक्षी आहेत. शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. मागील मुख्य शिखर चौकोनी आहे व त्यावर लहान लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. मंदिराच्या प्रांगणात येण्यासाठी असलेल्या पायऱ्यांजवळ नवसाचे पाषाण आहेत. चुलीप्रमाणे मांडलेल्या तीन पाषाणांच्या आधाराने मध्यभागी चौथा पाषाण ठेवलेला असतो. या चौथ्या पाषाणाच्या वर चार ते पाच गोलाकार पाषाण असतात. हा वरचा पाषाण अशा पद्धतीने उचलायचा असतो की त्यावरील गोलाकार लहान पाषाण त्यावरून पडता कामा नयेत. अशा पद्धतीने जर पाषाण उलचता आला तर धवळीबारी नवसपूर्ती करणार, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात नवान्न पौर्णिमेला वार्षिक उत्सव साजरा केला जातो. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. साधारणतः शेतीवर गुजराण असणाऱ्या घरात ही साजरी केली जाते. नवान्न याचा एक अर्थ अन्न असा आहे. नवीन अन्न वापरायला काढण्याचा हा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नव्या धान्याची खीर करून त्याचा नेवेद्य करण्याची पद्धत आहे. या दिवशी दाराला नवीन आलेल्या पिकाचे कणीस असलेले आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस असतो.
नवान्न पौर्णिमेच्या निमित्ताने परिसरातील हजारो आदिवासी व शेतकरी बांधव या मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. आपल्या शेतात पिकवलेले नवे धान्य, धान्याची कणसे तसेच शिजलेले अन्न देवीस अर्पण करतात. गोडधोडाचा नेवेद्य अर्पण करून देवीचे आभार मानण्याची प्रथा आहे. यावेळी विविध वस्तूंची दुकाने सजून या परिसराला यात्रेचे स्वरूप येते. याशिवाय मंदिरात चैत्र पाडवा, चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री, दसरा, दिवाळी, देवदिवाळी, होळी आदी वार्षिक उत्सवही साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात आदिवासी नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या देवीच्या पूजेचा परंपरागत मान आजही आदिवासी समाजाकडे अबाधित आहे.