सप्तर्षींपैकी एक असलेले गौतम ऋषी हे वेदांतील अनेक रुचांचे रचियते आहेत. आपली पत्नी अहिल्येला इंद्रदेवाने कपटाने भोगल्याने त्यांनी इंद्र व अहिल्या या दोघांनाही शाप दिला. पुढे या शापासाठी त्यांनी उःशाप देखील दिला. त्यामुळे इंद्राच्या अंगावर पडलेल्या सहस्र योनींचे डोळे होऊन इंद्राला सहस्राक्ष नाव पडले व शिळा होऊन पडलेली अहिल्या रामाच्या पदस्पर्शाने पुन्हा सचेतन झाली. या महान ऋषींच्या नावाने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात, प्रकाशा या गावी, गोमती नदीच्या तीरावर गौतमेश्वर महादेव मंदिर आहे.
‘तापी महात्म्य’मधील नवव्या अध्यायात प्रकाशासंदर्भात माहिती आहे. ती अशी ‘श्रीरुद्र उवाचं, प्रकाशकमिदं तीर्थ सर्वपापप्रणाशनम्। प्रकाशत्वं गता यत्र पयोष्यांतर्गता सरित॥ सर्व देवमिदं क्षेत्र दुर्लभं वत्स भूतले। अशेषं पाप दहनं विशेषाद्योत्तरायणे।’ याचा अर्थ असा की महादेवाने सांगितले की प्रकाशा हे तीर्थक्षेत्र सर्व पापांचे नाश करणारे आहे. लुप्त झालेली पयोष्णी नदी प्रकाशाला प्रकट झालेली आहे. हे वत्स, पृथ्वीवर असे क्षेत्र प्राप्त होणे हे खूपच दुर्लभ आहे. विशेषतः उत्तरायणात या क्षेत्री केलेल्या तापोस्नानाने सर्व पापांचा नाश होतो.
या गावाला असलेल्या प्रकाशा या नावाबाबत अख्यायिका अशी की प्राचीन काळी पृथ्वीवर सहा महिने रात्र व सहा महिने दिवस असे. तेव्हा महादेवाच्या कायम वास्तव्यासाठी १०८ शिवलिंगे असलेली मंदिरे एका रात्रीत बांधण्याचे काम प्रकाशा येथे सुरू करण्यात आले. मात्र १०७ शिवलिंगे स्थापन होईपर्यंत पहाटेचा प्रकाश पडला आणि या मंदिराचे काम अपूर्ण राहिले. त्यामुळे या गावाला प्रकाशा हे नाव व या तीर्थास दक्षिण काशी म्हणून संबोधले जाऊ लागले. अशी मान्यता आहे की उत्तर काशीची यात्रा करणाऱ्या भाविकांना प्रकाशा येथे दर्शन घेतल्याशिवाय तीर्थाटनाचे पुण्य मिळत नाही.
प्रकाशा येथील गौतमेश्वर महादेव मंदिराची अख्यायिका अशी की पत्नी अहिल्या व इंद्रदेवास दिलेल्या शाप व उःशापामुळे गौतम ऋषींच्या शक्ती क्षीण झाल्या होती. त्या पुन्हा मिळवण्यासाठी ते हिमालयात गेले. आपल्या शक्ती पुन्हा प्राप्त करून नाशिक येथील सिंहस्थासाठी प्रवास करीत असताना ते इथवर पोहोचले. तेव्हा सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाला होता. आपण सिंहस्थासाठी वेळेत पोहोचू न शकल्याने त्यांना वाईट वाटले. तेव्हा महादेवाने त्यांना या स्थानी दर्शन देऊन येथील नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करून सिंहस्थाचे पुण्य मिळेल, असे सांगितले. महादेवाच्या सांगण्यानुसार त्यांनी येथील त्रिवेणी संगमावर स्नान करून शिवलिंगाची स्थापना केली. त्यांनी स्थापन केल्यामुळे हे शिवलिंग गौतमेश्वर महादेव नावाने ओळखले जाऊ लागले.
गोमती नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर तेराव्या ते चौदाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या प्रांगणाभोवती नदीतिराकडील बाजू सोडून उर्वरित तिन्ही बाजूने आवारभिंत आहे. या भिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रागंणात प्रवेश होतो. येथील प्रशस्त प्रांगणात मध्यभागी गौतमेश्वर मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी संरचना असलेल्या मंदिराच्या मुखमंडपासमोर आणि सभामंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूला प्रत्येकी नऊ पायऱ्या आहेत. नदीतीरावर असल्यामुळे व पुराच्या पाण्याचा धोका असल्याने मंदिराचे बांधकाम प्रांगणापेक्षा सुमारे सात फूट उंचावर आहे. मुखमंडपासमोरील पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस चौथरे व त्यावर शिवपिंडी आहेत. मुखमंडपात चौथऱ्यावर नंदीची अखंड काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.
मंदिराचा सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपात दोन्ही बाजूला प्रत्येकी चार अष्टकोनी नक्षीदार स्तंभ आहेत. येथील सर्व स्तंभ एकमेकांना चंद्रकोर कमानीने जोडलेले आहेत. अंतराळातील स्तंभांवर वरच्या बाजूला भारवाहक यक्ष शिल्पे आहेत. अंतराळात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर दीपकोष्टके आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या मंडारकावर दोन्ही बाजूस किर्तीमुखे आहेत. द्वारशाखांच्या खालच्या बाजूस प्रतिहारींच्या मूर्ती व वरच्या बाजूला पद्मशाखा, वेलबुट्टीशाखा व पर्णशाखा आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व त्यावरील उत्तरांगेवर विविध देवतांची चार शिल्पे आहेत.
गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीतील शाळुंका काळ्या पाषाणातील व त्यावरील लिंगपाषाण हे लालसर रंगातील आहे. गर्भगृहातील चारही कोनांत असलेल्या नक्षीदार स्तंभांवर कणी व त्यावरील हस्तांवर तुळई आहेत. तुळईवर पाषाणाच्या अष्टकोनी रचनेतून घुमट साकारला आहे व वितानावर चक्राकार नक्षीकाम आहे. या बंदिस्त गर्भगृहात हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपाच्या छतावर घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे. छतावर चारही कोनांवर चार लघुशिखरे आहेत. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी शिखर व त्यात पुढील बाजूस असलेल्या देवकोष्टकात देव प्रतिमा व देवकोष्टकाच्या छतावर व्याघ्रशिल्प आहे.
या मंदिरासमोर तीन पायऱ्या असलेल्या उंच चौथऱ्यावर मारुतीचे मंदिर आहे. मंदिरात मारुतीची शेंदूर चर्चित पाषाणमूर्ती आहे. मारुतीच्या एका हातात गदा व दुसऱ्या हातात फूल असलेली ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुढे नदीतीराला लागून पायऱ्या असलेला विस्तीर्ण घाट आहे. येथे बारा वर्षातून एकदा सिंहस्थात भरणारी यात्रा विशेष प्रसिद्ध आहे. यावेळी देशभरातून हजारो भाविक येथे पवित्र स्नानासाठी येतात. मंदिरात महाशिवरात्री व श्रावणातील सर्व सोमवारी हजारो भाविक येतात. येथील घाटावर विविध शांती व श्राद्ध विधी करण्यात येतात. दर सोमवारी, अमावस्या व सुट्टीच्या दिवशी भाविकांची व पर्यटकांची गर्दी असते.