
जळगाव जिल्ह्यातील तापी नदीकाठी असलेल्या रिधूर गावातील अवचित हनुमान मंदिर हे जळगावसह खान्देशातील प्राचीन मंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे. पूर्वी हे मंदिर हेमाडपंती शैलीतील होते. येथील हनुमान जागृत, नवसाला पावणारा व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या हनुमानाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर चक्क लोण्याचे लेपन केले जाते. त्यामुळे हे स्थान ‘लोणी हनुमान’ म्हणून खान्देशात प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की कितीही उन्हाळा असला तरी या मूर्तीवरील लोणी वितळत नाही.
या मंदिराची आख्यायिका अशी की प्राचीन काळी या परिसरात दुधाचा व्यवसाय अधिक प्रमाणात केला जात असे. येथील गुराखी या ठिकाणी आपल्या गुरांना चरण्यासाठी आणत असत. येथे एक वडाचे झाड होते. त्याच्या अवतीभोवती गुरे चरत असत. एकदा एका गुराख्याला हनुमानाने दृष्टांत देऊन ‘मी वडाच्या झाडाखाली आहे, तेथे शोध घेऊन माझी प्रतिष्ठापन केल्यास गावाचे कल्याण होईल’, असे सांगितले. या गुराख्याने ग्रामस्थांना या दृष्टांताची कल्पना दिली. परंतु ते वडाचे झाड ज्या जमिनीवर होते, त्या जमीनमालकाने खणण्यास विरोध केल्याने तेथे खोदकाम होऊ शकले नाही. पुढे काही दिवसांनी हनुमानाने त्या जमीन मालकालाच दृष्टांत देऊन वडाच्या झाडाखाली असल्याचे सांगितले. त्यानंतर तेथे खोदकाम केले असता हनुमानाची मूर्ती सापडली.
गावकऱ्यांनी याच जागेवर लहानसे मंदिर बांधून त्यात या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. अचानकपणे प्रकट झाल्यामुळे ‘अवचित हनुमान’ असे नाव या हनुमानाला पडले. या आख्यायिकेप्रमाणे आजही हे मंदिर वडाच्या झाडाजवळ आहे. या हनुमानाला ‘लोणी हनुमान’ या नावानेही ओळखले जाते. त्याबातची आख्यायिका अशी की रिधूर गावात आपल्या नातेवाईकांकडे एक
पाहुणा आला होते. त्या पाहुण्याच्या गायीने अचानक दूध देणे थांबविले. त्यामुळे तो चिंतेत होता. तो पाहुणा अवचित हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी येथील मंदिरात आला आणि दर्शन घेतल्यावर त्याने हनुमानाला साकडे घातले की देवा माझी गाय दूध द्यायला लागली तर त्या दुधाचे लोणी आणून तुला अर्पण करीन. त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर पाहुण्याच्या गायीने दूध देण्यास सुरूवात केली. काही दिवसांनी तो पाहुणा परत रिधूर गावातील आपल्या नातेवाईकांकडे आला. सकाळी जाऊन हनुमानाला लोण्याचा गोळा अर्पण करू, असा विचार करून तो झोपी गेला. परंतु त्याच रात्री तो ज्या घरात थांबला होता त्या घराला अचानक आग लागली. पाहता पाहता घरातील सर्व वस्तू आगीत खाक झाल्या. पण छताला टांगून ठेवलेले लोणी मात्र मडक्यासह तसेच होते. त्यानंतर त्या लोण्याचा नैवेद्य अवचित हनुमानाला दाखविण्यात आला. तेव्हापासून पौर्णिमा व अमावस्येला देवाला शेंदूरमिश्रीत लोणी लेपन करण्याचा पायंडा पडला. असे सांगितले जाते की एकदा लावलेला लोण्याचा
लेप हा कितीही उन्हाळा असला तरी तो वितळत नाही. त्यामुळे थरावर थर वाढत जाऊन ही मूळ अडीच फुट उंचीची मूर्ती आता सात फूट उंचीची व त्याप्रमाणेच रुंदही झालेली आहे. अनेक भाविक नवसपूर्तीनंतर या हनुमानाला लोण्याचा लेप लावतात. त्यामुळेच हा हनुमान ‘लोणी हनुमान’ म्हणून प्रसिद्ध आहे.
१९८४ साली अहमदनगरमधील कोळगाव येथून आलेल्या स्वामी माधवदास यांनी या परिसराचा कायापालट केला. ते सैन्यात सेवा करत होते. त्यांना काही साक्षात्कार झाल्यावर काम सोडून त्यांनी वैराग्य पत्करले आणि ते गुजरातला गेले. तिथे त्यांनी गुरू केले आणि भ्रमण करत जळगावला आले. जळगावात त्यांना या मंदिराबाबत समजले. तेव्हापासून ते नित्यनेमाने येथील हनुमानाची सेवा करू लागले. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
प्रशस्त अशा मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र पेव्हरब्लॉकची फरसबंदी आहे. सभामंडप, अंतराळ व प्रदक्षिणामार्ग सोडून गर्भगृह अशी अवचित हनुमान मंदिराची संरचना आहे. येथील बंदिस्त स्वरूपाचा सभामंडप, प्रशस्त आहे. येथील अंतराळ हे सभामंडपापेक्षा उंचावर आहे. अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहातील वज्रपिठावर सुमारे सात फूट उंचीची हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मूर्तीच्या एका हातात द्रोणागिरी पर्वत व दुसऱ्या हातात गदा आहे. डोक्यावर चांदीचा मुकुट व देवाच्या भुवया आणि डोळेही चांदीचे आहेत. असे सांगण्यात येते की ही मूर्ती पूर्णतः लोण्याने बनलेली आहे. पूर्वी दृष्टान्तानंतर खोदकामात जी मूर्ती आढळली होती, ती मंदिराच्या खाली तळघरात ठेवण्यात आली आहे व ते तळघर बंद करण्यात आले आहे.
याशिवाय मंदिर व परिसरात रामदरबार, काळभैरव, एकादशी माता व तप्तेश्वर महादेव यांची स्वतंत्र मंदिरे आहेत. या मंदिराच्या मागील भागात भजनपुरी नावाच्या एका स्वामींची समाधी आहे. ही समाधी ७५० वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी या मंदिरात फार मोठा उत्सव असतो. यावेळी हनुमानाला चोला नावाचे एक पारंपारिक वस्त्र नेसवतात. नेसविण्याआधी हे वस्त्र शेंदूर व चमेलीच्या तेलात भिजवले जाते. त्यानंतर हनुमानाची विधीवत पूजा करण्यात येते. भजन, किर्तन, जागर करण्यात येतो. यावेळी आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो.