जयश्री हनुमान मंदिर

शिरसाळा, ता. बोदवड, जि. जळगाव

महाराष्ट्रात शिखर नसलेली अनेक मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरांना कालौघात कोसळल्याने वा आक्रमकांनी पाडल्याने शिखरे नाहीत. काही देवतांच्या मंदिरांवर जाणीवपूर्वक शिखर बांधले जात नाही. तसे बांधण्याचा प्रयत्न केल्यास ते कोसळते असे सांगण्यात येते. असेच एक हनुमानाचे मंदिर बोदवड तालुक्यातील शिरसाळा या गावात आहे. पूर्वी सिद्धेश्वाच्या नावाने ओळखले जाणारे हे मंदिर जयश्री हनुमान मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. येथील बजरंगबली जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिरात दर मंगळवारी शनिवारी मोठ्या संख्येने भाविक येतात

या मंदिराचा इतिहास अज्ञात आहे. मात्र त्याबाबत आख्यायिका अशी की फार वर्षांपूर्वी शिरसाळा गावात एक हनुमानभक्त राहात होता. त्यास एकदा हनुमानाने स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले कीगावातील नदीत माझी मूर्ती आहे. ती बाहेर काढून तिची प्रतिष्ठापना करा.’ त्यानुसार गावकऱ्यांनी मूर्तीचा शोध घेतला. सध्या जेथे मंदिर वसलेले आहे त्याच्या मागील बाजूस असलेल्या नदीपात्रात मारूतीरायाची दगडी मूर्ती ग्रामस्थांना सापडली. परंतु अनेक प्रयत्न करूनही ती तेथून हलवता आली नाही. अखेर गावातील एका काकापुतण्याने प्रयत्न केला असता ती सहजपणे उचलली गेली. त्या काकापुतण्याने ती मूर्ती एका कडूनिंबाच्या झाडाखाली ठेवली. तेथे मूर्तीची विधीवत पूजा करण्यात येऊ लागली. येथे केलेले नवस पूर्ण झाल्याने येथील हनुमान जागृत असल्याची प्रचिती अनेकांना आली

भुसावळ गावातील द्वारकादास अग्रवाल या भक्ताने केलेला नवसही पूर्ण झाला होता. त्या प्रीत्यर्थ त्याने हनुमानाचे मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली. मंदिराच्या गर्भगृहाचे काम सुरू असताना अचानक तो आजारी पडला. यानंतर मंदिरावर शिखर बसवण्याचे काम सुरू असतानाच ते मूळापासून कोसळले. अखेर मंदिरावर शिखर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्याची प्रकृती सुधारली. शिखर बांधण्याचा प्रयत्न केल्यास गावात काहीतरी वाईट घडते शिखर कोसळते, हे लक्षात आल्यानंतर हे मंदिर शिखराविना ठेवण्यात आले.

हे मंदिर अत्यंत विस्तिर्ण अशा आवारात वसले आहे. आवारास मोठे महाद्वार आहे. येथून काही अंतरावर हनुमानाचे आधुनिक पद्धतीने बांधलेले, संगमरवरी टाइल्सच्या भिंती असलेले मंदिर आहे. मंदिरासमोर एका मोठ्या दगडी चौथऱ्यावर कलशाच्या आकाराचा मोठा शेंदूरचर्चित पाषाण आहे. येथे शेंदूरचर्चित पादुकाही आहेत. मंदिरात येणारे भाविक येथे तैलपूजा करतात. स्टीलचे रेलिंग लावलेल्या दर्शन मार्गिकेतून मंदिरात प्रवेश होतो. सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. अनेक मोठ्या खिडक्या असलेल्या या प्रशस्त सभामंडपातही स्टीलच्या खांबांची दर्शनबारी तयार करण्यात आली आहे. मंदिराचे गर्भगृह साधेसे आहे. आत एका उंच चौथऱ्यावर हनुमानाची पाषाण शिळामूर्ती विराजमान आहे. या शेंदूरचर्चित पाषाणाचा वरचा भाग निमुळता आहे. त्यावर दोन मोठे नेत्र आहेत. कपाळावर गंध कोरलेले आहे. मूर्तीच्या मागील भिंतीवर मकरतोरण असलेला मखर आहे. बिनशिखराच्या या गर्भगृहातील ही मूर्ती ऊनपाऊसवारा यांचा सामना करत वर्षानुवर्षे उभी आहे. या हनुमानास संकटमोचक जयश्री हनुमान या नावाने संबोधले जाते

हनुमान मंदिराच्या डाव्या बाजूस गणेशाचे उंच शिखर असलेले मंदिर आहे. त्याच्या बाजूस श्रीरामाचे मंदिर आहे. या मंदिरास मोठा सभामंडप आहे. गर्भगृहात उंच चौथऱ्यावरील संगमरवरी देव्हाऱ्यामध्ये श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती विराजमान आहेत. आवारात शनीचेही मंदिर आहे. उंच जगतीवर बांधलेल्या या मंदिरातकलियुग के न्यायाधीशअसे म्हटलेल्या शनीची पाषाण शिळा आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश नाही. शनीमंदिरानजीक महादेवाचेही मंदिर आहे. याच प्रमाणे हनुमान मंदिराच्या मागच्या बाजूला भूतलापासून काही फूट खाली महादेवाची पिंडी प्रतिष्ठापित केलेली आहे

या मंदिरात हनुमान जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्या दिवशी येथे पंचक्रोशीतून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यावेळी येथे अन्नदानही केले जाते. खासकरून श्रावण आणि मार्गशीर्ष महिन्यातील मंगळवारी आणि शनिवारी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. त्याच प्रमाणे शनीअमावस्येला या परिसरास यात्रेचे स्वरूप येते

उपयुक्त माहिती

  • मुक्ताईनगरपासून १२ किमी, तर जळगावपासून ६२ किमी, तर अंतरावर
  • मुक्ताईनगर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही 
Back To Home