पावसाळ्यात ज्या घाटाचे सौदर्य पाहण्यासाठी ट्रेकर्स आवर्जून येतात तो म्हणजे ताम्हिणी घाट. पुण्यातून मुळशी मार्गे रायगड जिल्ह्यात उतरताना लागणारा हा घाट अत्यंत निसर्गरम्य आहे. याच घाटामधील ताम्हिणी गावात विंझाई मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे. भारतात आदिशक्ती विंध्यवासिनीची आठ मंदिरे आहेत. त्यापैकी हे एक. हे स्थान महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांसारखेच जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.
ताम्हिणी गावातील विंझाई मातेचे मंदिर पाच कळसांचे आहे. दुरूनच हे कळस दिसू लागतात. सभामंडप आणि गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर संगमरवराचा वापर करण्यात आला आहे. या भागात भरपूर पाऊस होत असल्याने सभामंडपाची रचना उतरत्या छपरांसारखी असली तरी त्याचे बांधकाम सिमेंटचे आहे. सभामंडपात शोभिवंत खांबही आहेत. समोर दिसणाऱ्या गाभाऱ्यात अडीच फूट उंचीची, चतुर्भुज महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. त्यापैकी एका हातात खड्ग, दुसऱ्यात ढाल, तिसऱ्या हातात महिषासुराच्या पाठीत खुपसलेला त्रिशूल व चौथ्या हाताने महिषासुराचे तोंड दाबलेले आहे. देवीचा उजवा पाय महिषासुराच्या पाठीवर व डावा पाय जमिनीवर रोवलेला आहे. मस्तकावर मुकुट, मोकळे सोडलेले केस व कपाळावर मळवट लेऊन पदर खोचलेली अशी देवीची मूर्ती उग्र रूपात असली तरी तिच्या भक्तांसाठी ती प्रसन्न भासते. गाभाऱ्यात देवीच्या डाव्या बाजूस श्रीमहालक्ष्मी व महासरस्वती आहेत, तर उजव्या बाजूस वाघजाई व शिरकाई देवीच्या सुंदर मूर्ती आहेत. या मूर्तींची स्थापना नवीन मंदिर झाल्यावर ६ एप्रिल २००१ रोजी करण्यात आली आहे.
पुण्याहून कोकणात जाणारा रस्ता हा ताम्हिणी गावाजवळून जात असल्याने कोकणात जाणारे अनेक भक्त देवीचे दर्शन घेऊन मार्गक्रमण करतात. हे देवीचे जागृत स्थान मानले जाते. नव्याने बांधण्यात आलेले या मंदिराचे सुंदर स्वरूप, तसेच इथे आल्यावर मनाला मिळणारी शांतता, यामुळे इथे भक्तांची कायमच ये-जा असते. मंदिराच्या परिसरात श्री कालिकादेवी, श्री खंडोबा, श्री भैरवाचे स्थान, तसेच मारुतीचेही मंदिर आहे.
या देवीची आख्यायिका अशी की, अनेक वर्षांपूर्वी महादेव आणि रामप्रभू हे दोन भाऊ विंध्याचल पर्वतावर तप करत असताना त्यातील महादेवाने देवीला प्रसन्न करण्यासाठी तिच्या चरणी स्वतःचे मस्तक अर्पण केले. मात्र भावाच्या वियोगाने दुःखी न होता रामप्रभूने तपामध्ये खंड पडू दिला नाही. अखेर देवी त्याला प्रसन्न झाली आणि म्हणाली, ‘दक्षिणेकडे तुझ्या घराकडे चल. उजाडेपर्यंत डोळे उघडू नकोस आणि मागे पाहू नकोस. मी तुझ्या मागे येते.’ रामप्रभूने ते ऐकले. पण चालता चालता गार वाऱ्याची झुळूक आल्यावर सकाळ झाली, असे वाटून रामप्रभूने डोळे उघडून मागे पाहिले. त्यावेळी एक आगीचा लोळ अंतर्धान पावला आणि मागोमाग आकाशवाणी झाली, ‘तू घाई केलीस, आता मी पुढे येणार नाही’. मग त्याचजागी एक शिळा उत्पन्न झाली. तीच ही विंझाईमाता.
देवीचे हे मूळ स्थान दुर्गम ठिकाणी असल्यामुळे त्या काळी तेथे जाऊन देवीचे दर्शन घेणे फार कठीण काम होते. या गोष्टीचा विचार करून रामप्रभूनी श्रींच्या मूर्तीची स्थापना जवळच असलेल्या ताम्हिणी या गावी केली. त्या वेळी त्यांनी प्रथम तेथे छोटे मंदिर बांधले. या मंदिरात दर्शनासाठी चैत्र पौर्णिमेस भक्त आवर्जून ताम्हिणी येथे जाऊ लागले. हळूहळू या देवीच्या स्थानाची माहिती लोकांपर्यंत पोहचू लागली. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी खालचे जोते, देवळाच्या भिंती, छप्पर आदी बांधकाम रामराव बळवंत हर्नेकर यांनी केल्याचा उल्लेख असलेली एक शिळा जुन्या मंदिराच्या जोत्यात आढळली आहे. रघुनाथ माधवराव देशमुख यांनी देवीची मूर्ती पुण्याहून कारागीर आणून ताम्हिणीच्या डोंगरातच काळ्या पाषाणांत घडवून घेतली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ डिसेंबर १९४२ साली झाली.
ताम्हिणी येथे १८ एप्रिल १९७३ रोजी, चैत्र पौर्णिमेस श्री विंझाई देवस्थान मंडळ, ताम्हिणी या संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरून नवीन मंदिर बांधण्याचे ठरले. सर्व भक्त व कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नाने निधी गोळा करून प्रत्यक्ष बांधकामास डिसेंबर १९९० मध्ये सुरुवात झाली. २००० साली देवीचे नवीन मंदिर तयार झाले. काशीपीठाचे प्रमुख चंद्रशेखर शिवाचार्य शंकराचार्य यांच्या उपस्थितीत कलशारोहण झाले.
श्री विंझाई देवी ही अनेक कायस्थ कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. चैत्र पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा, अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत दहा दिवस, मार्गशीर्षातील चंपाषष्ठी, माघ पौर्णिमा, पौष पौर्णिमा, फाल्गुन पौर्णिमा या दिवशी येथे उत्सव असतात. अश्विन महिन्यात नवरात्रात अखंड दीप, घटस्थापना, पुष्पमाला, सुवासिनी किंवा कुमारिका भोजन तसेच एक दिवस सुवासिनी -पूजन करण्याचा प्रघात आहे. प्रतिमासी अष्टमी हा दिवस देवीच्या उपासनेचा पवित्र दिवस मानला जातो. त्याशिवाय मंगळवार व शुक्रवार हे दोन वार देवीच्या पूजा-अर्चनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. सकाळी ९ ते दुपारी १ व दुपारी २ ते सायंकाळी ७ पर्यंत भाविकांना मंदिरातील देवीचे दर्शन घेता येते.
श्री विंझाई देवस्थान मंडळाद्वारे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी कार्यशाळा, असे अनेकविध उपक्रम केले जातात. या उपक्रमांची बाहेरगावच्या भाविकांना माहिती मिळावी यासाठी देवस्थानाने वेबसाईट https://www.vinzai.org/home/ सुद्धा सुरू केली आहे!