कन्हैया महाराज मंदिर

आमळी, ता. साक्री, जि. धुळे

धुळे जिल्ह्यातील चारही तालुके मूलतः दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जात असले तरी जिल्ह्याच्या पश्चिम भागातील साक्री तालुक्यात भाताची शेती मोठ्या प्रमाणावर होते. कोडाईबारी ते आमळी हा रस्ता पूर्ण जंगलभाग. गर्द झाडी आणि वळणावळणाचा घाटरस्ता असलेला हा भाग दुष्काळग्रस्त असल्याचा बट्टा पुसण्यासाठी पुरेसा आहे. याच आमळी गावातील प्राचीन कन्हैया महाराज मंदिर प्रसिद्ध आहे. हेमाडपंती बांधकाम असलेले श्रीविष्णूचे हे मंदिर जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे

मंदिराची अख्यायिका अशी की गुजरातमधील डाकोर येथील एका भक्ताच्या इच्छेनुसार तेथे विष्णूची मूर्ती प्रकट झाली होती. परंतु मुल्हेर येथील राजा विष्णूचा परमभक्त असल्याने त्याला देव आपल्या महाली रहावा, अशी इच्छा झाली त्याने तशी देवाकडे विनवणी केली. त्या रात्री देवाने राजाला दृष्टांत देऊन सांगितले की डाकोर येथील मूर्ती मुल्हेर येथे आणावी. परंतू मूर्ती आणताना ती कुठेही जमिनीवर ठेवू नये. तसे केल्यास मी तेथेच स्थिर होईल. दृष्टांताप्रमाणे राजाने डाकोर येथून मूर्ती पालखीत घेतली पालखी मुल्हेरकडे रवाना केली. पुढे आमळी येथील हिरवीगार वनश्री पाहून पालखी वाहणाऱ्या भोयांना येथे रात्री विश्रांती घ्यावीशी वाटली. त्यांनी ती पालखी झाडांच्या खोडांमध्ये अडकवून ठेवली. परंतु सकाळी उठून पाहिले असता त्यातील मूर्ती जमिनीवर होती. भोयांनी मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ती जागची हालली नाही. शेवटी मूर्ती तेथेच ठेऊन सर्वजण मुल्हेर येथे गेले

त्यानंतर अनेक वर्षे दुर्लक्षित आणि निर्मनुष्य ठिकाणी राहिल्याने मूर्तीवर वारूळे चढून तेथे टेकडी निर्माण झाली होती. एकदा परिसरातील गावांत दुष्काळ पडला असताना तेथील एक ग्रामस्थ पावबा हा गाईगुरांसह येथून काही अंतरावर असलेल्या डांग या गावाकडे जायला निघाला होता. वाटेत आमळी येथे पाण्याचा स्रोत पाहून त्याने येथेच थांबण्याचा निर्णय घेतला. पावबा हा हरिभक्त असल्यामुळे सतत तो हरिभक्तीत तल्लीन असे. एके रात्री देवाने त्याला स्वप्नदृष्टांत देऊन वारूळाखाली असलेली आपली मूर्ती काढून त्या जागेवर मंदिर बांधावयास सांगितले. परंतू पावबाने आपली आर्थिक हतबलता देवापुढे प्रकट केली. तेव्हा समोरच्या धनसरा डोंगरातील दगडाखाली तुला मंदिर बांधावयास आवश्यक तेवढे धन सापडेल, असे देवाने सांगितले. देवाच्या आज्ञेने पावबाने मंदिर बांधावयास सुरूवात केली .. १६१४ साली मंदिर बांधून पूर्ण झाले. मंदिराच्या प्रांगणात या पावबाचेही स्थान आहे

मंदिराला लागून स्वागत कमान आहे. कमानीजवळ असलेल्या बारा पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रागंणात भाविकांच्या सोयीसाठी गर्दीचे नियोजन करण्यासाठी दर्शनमार्ग केलेला आहे. येथून पुढे उंचावर असलेल्या मंदिराच्या चौथऱ्यावर येण्यासाठी आठ पायऱ्या आहेत. सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीत असलेल्या देवकोष्टकांत डावीकडे वामन अवतार उजवीकडे कृष्णसुदामा भेट अशी चित्रे आहेत. देवकोष्टकांच्या शेजारी दीपकोष्टके आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपात मध्यभागी कासवमूर्ती आहे.

सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर दोन्ही बाजूस देवकोष्टके आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. द्वारशाखांच्या बाजूला नक्षीदार स्तंभ आहेत. ललाटपट्टीच्या वरील बाजूस हस्त, लघू स्तंभ त्यावर सज्जा आहे. या सज्जावर असलेल्या देवकोष्टकात दोन्ही बाजूस व्याघ्र मानव शिल्पे आणि मध्यभागी विष्णूची मूर्ती आहे. देवकोष्टकास वरील बाजूस महिरपी कमान आहे. छताकडील बाजूस यक्ष किन्नर शिल्प आहेत. गर्भगृहाची दर्शनी भिंत नक्षीकामाने सुशोभित आहे.

बंदिस्त स्वरूपाच्या गर्भगृहातील वज्रपिठावर चार नक्षीदार स्तंभ महिरपी कमानी असलेला सोनेरी मखर आहे. या मखरात विष्णूची काळ्या पाषाणातील, शेषशय्येवरील निद्रिस्त अवस्थेतील, चतुर्भुज मूर्तीं आहे. देवाचा एक हात डोक्याखाली, दुसरा हात पोटावर, तिसऱ्या हातात पद्म चौथा हात अभय मुद्रेत आहे. विष्णूच्या पायाशी लक्ष्मी बसलेली आहे. देवाच्या चारही बाजूंनी असलेल्या नक्षीदार पटात पानाफुलांची नक्षी आहे. गर्भगृहाच्या छताला चारही बाजूंनी हस्त त्यावरील उभ्या स्तंभांवर महिरपी कमानी आहेत. छताला कमानीच्या मध्यभागी कमळ फुलाची नक्षी आहे. सभामंडपाच्या छतावर मध्यभागी घुमटाकार शिखर, त्यावर आमलक कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे शिखर आहे. खालील चौकोनी थरात चारही दिशांना एकूण वीस देवकोष्टके आहेत. चारही कोनात स्तंभ आहेत. मधल्या थरात द्वादश कोष्टक, त्यावर घुमटाकार शिखर त्यावरील आमलकावर कळस आहे. मुख्य शिखराच्या चारही बाजूंनी लघू शिखरे त्यावर कळस आहेत. गर्भगृहाच्या शिखरावर एकूण २१ कळस आहेत

मंदिराच्या प्रांगणात एका विशाल वृक्षाभोवती पार बांधलेला आहे. या पारावर अनेक प्राचीन मूर्ती शिल्पे आहेत. प्रांगणात चौथऱ्यावर नंदी त्यासमोरील मंदिरात शिवपिंडी आहे. प्रांगणात पावबा महाराज, ब्राम्हण देव, मारूती, गणपती आदी देवतांची मंदिरे आहेत

या मंदिरात तुलसी विवाह हा मुख्य वार्षिक उत्सव साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवून भगवान विष्णु तुलसीचा विवाह संपन्न होतो. या दिवशी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असतात. त्यानिमित्ताने परिसराला यात्रेचे स्वरूप येते. याशिवाय महाशिवरात्री, हनुमान जयंती, नवरात्री, दसरा दिवाळी आदी उत्सवही येथे उत्साहाने साजरे केले जातात

उपयुक्त माहिती

  • साक्रीपासून ३७ किमी, तर धुळे येथून ९० किमी अंतरावर
  • साक्री येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात न्याहरीची सुविधा आहे, निवासाची नाही
Back To Home