यमाई देवी ही परशुरामाची माता व जमदग्नी पत्नी रेणुका देवीचे रूप असल्याची मान्यता आहे. सातारा जिल्ह्यातील औंध येथे यमाई देवीचे मूळ स्थान आहे. तेथे देवीस मूळमाया नावाने ओळखले जाते. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटकात यमाई देवीची अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी या देवीचे एक प्रसिद्ध, प्राचीन व जागृत मंदिर महाळुंग गावात आहे. हे औंधनंतरचे यमाईचे दुसरे ठाणे मानले जाते. यमाई ही महाळुंगची ग्रामदेवता मानली जाते. संकटांपासून गावाचे रक्षण करणारी माता म्हणून ही देवी येथे पूजली जाते.
‘केदारविजय’ ग्रंथामध्ये यमाई देवीबद्दलची आख्यायिका नमूद करण्यात आली आहे. ‘केदारविजय’ हा मूळचा संस्कृत ग्रंथ होता. हरि अंगारपूरकर यांनी १७७९ मध्ये तो मराठीत आणला. या ग्रंथात ३६ अध्याय आहेत. त्यातील २७व्या अध्यायात यमाईदेवीची कथा आहे. ती अशी की कोल्हासुराच्या उत्पातांमुळे करवीरातून बहिष्कृत झालेल्या लक्ष्मीला तेथे पुन्हा प्रतिष्ठापित करण्याचे कार्य केदारनाथाने स्वीकारले. त्या दक्षिण मोहिमेत यमाईदेवी ही केदारनाथाची साह्यकर्ती होती. तिने कोल्हासुराच्या दैत्यसैन्यातील औंधासूर या दैत्याचा वध केला. त्यामुळे केदारनाथांचा दक्षिणेकडचा मार्ग निष्कंटक झाला. हे जेथे घडले त्या स्थळाचे नाव औंध असे पडले. हे गाव सातारा जिल्ह्यात आहे. औंधासुराचे पारिपत्य करण्यासाठी यमाईदेवी औंधनजीकच्या कंठगिरी डोंगरावर प्रकट झाली होती. यमाई ही मूळ माया असल्याने कंठगिरीस नंतर मूळगिरी म्हणण्यात येऊ लागले. ते यमाई देवीचे मूळ स्थान आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील चाफेबनात यमाई देवीचे स्थान आहे. त्याच प्रमाणे महाळुंग येथील यमाई देवीचे ठाणेही महत्त्वाचे मानले जाते. येथील यमाई देवीबाबत आख्यायिका अशी की या भागात पूर्वी एक दैत्य ग्रामस्थांना त्रास देत असे. तेव्हा देवीने त्याचा संहार करून गावाचे रक्षण केले. त्यामुळेच गावकऱ्यांनी तिला ग्रामदेवता मानले. स्थानिक इतिहासानुसार येथील यमाई मंदिर सुमारे ७०० वर्षांपूर्वी, यादव काळात बांधण्यात आलेले आहे. राज्य पुरातत्त्व विभागाने ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून त्यास घोषित केले आहे. काळ्या पाषाणात बांधलेल्या या मंदिराच्या स्थापत्यशैलीवर हेमाडपंती प्रभाव आहे.
महाळुंग गावच्या वेशीवर असलेल्या या मंदिराच्या वाहनतळापासून प्रवेशद्वारापर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजूला पूजा साहित्याची दुकाने आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उजवीकडे एका चौथऱ्यावर तीन थरांची दीपमाळ आहे. दीपमाळेचा खालील थर षटकोनी व वरील दोन थर गोलाकार आहेत. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व मंडारकावर कीर्तीमुख आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या प्रांगणात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. दगडी फरसबंदी असलेल्या या प्रांगणात तुलसी वृंदावन व एका महावृक्षाभोवती दगडी पार आहे. या पारावर विष्णूची प्राचीन चतुर्भुज मूर्ती आहे. या मूर्तीत पायाजवळ पद्मावती व लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. मूर्तीच्या शेजारी काही नागशिळा व शिवपिंडी आहेत.
मंदिरासमोर अलीकडील काळात दर्शनमंडप बांधलेले आहे. त्यापुढे अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेले प्राचीन मंदिर आहे. येथील अर्धमंडपात प्राचीन नगारे ठेवलेले आहेत. अर्धंमंडपात आठ चौकोनी स्तंभ आहेत व मंडपाच्या वितानावर चक्राकार नक्षी आहे. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीत दीपकोष्टके आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती व मंडारकास चंद्रशिळा आहे.
सभामंडपात प्रत्येकी तीन नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभपादावर उभे असलेल्या या सर्व स्तंभांना षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी, त्यावर हस्त, तुळई व छत आहे. वितानावर चक्राकार नक्षी आहे. हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा (गूढमंडप) आहे व त्यात हवा व प्रकाश येण्यासाठी गवाक्ष आहेत. सभामंडपापुढे अरूंद अंतराळ आहे. अंतराळातून बाहेर पडण्यासाठी उजव्या व डाव्या बाजूला दोन दारे आहेत. अंतराळाच्या पुढे गर्भगृहाचे पंचशाखीय प्रवेशद्वार आहे. येथील द्वारशाखांवर पानाफुलांच्या व स्तंभ नक्षी आहेत. लालटबिंबावर गणपतीची मूर्ती व तोरणात शिखरशिल्पे आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर चांदीच्या नक्षीदार मखरात यमाई देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. उंची वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे.
गर्भगृहाच्या छतावर गोलाकार व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका, स्तुपिकेवर कळस व ध्वजपताका आहे. शिखरात खालील बाजूस नागफणी रिंगण व वर स्तंभनक्षी आहेत. मंदिराच्या प्रांगणात स्थानिक देवतांची लहान लहान मंदिरे आहेत. मागील बाजूस गोड्या पाण्याचे कुंड आहे. कुंडात उतरण्यासाठी चारही बाजूंनी बांधीव पायऱ्या आहेत. कुंडांच्या बाजूला उंच चौथरा व त्यावर ओवऱ्या आहेत. त्यांचा वापर भाविकांकडून पूजाविधी व निवासासाठी करण्यात येतो.