
बालाघाट पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या व मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांगरी गावापासून जवळच नीलकंठेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर स्थित आहे. बालाघाट पर्वतांत उगम पावलेल्या नीलकंठा नदीकिनारी असल्यामुळे येथील महादेवास नीलकंठेश्वर असे नाव पडले. या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना प्रभू श्रीरामांनी केल्याची आख्यायिका आहे. येथील शिवलिंग जागृत आहे व त्याच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दर सोमवारी व विशेषतः श्रावणी सोमवारी या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रिघ लागलेली असते.
मंदिराची आख्यायिका अशी की रामायण काळामध्ये हा सर्व परिसर दंडकारण्याचा भाग होता. प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे तिघे वनवासाच्या काळात दंडकारण्यात आले होते. श्रीराम हे शिवभक्त होते. ते रोज सकाळी शंकराची पूजा केल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसत. ज्या ठिकाणी त्यांना शिवलिंग आढळत नसे, तेथे शिवलिंग तयार करून ते त्याची पूजा करीत असत. अनेक ठिकाणी त्यांनी शिवलिंगे तयार करून त्यांची प्रतिष्ठापना केली. बालाघाटच्या पर्वतरांगांतून प्रवास करीत असताना त्यांनी पांगरीपासून दोन किमी व चिंचोली गावापासून अर्ध्या किमी अंतरावरील या स्थळी विश्राम केला. येथे ते शंकराच्या पूजेची तयारी करीत असताना अचानक जमिनीतून शिवलिंग प्रकट झाले. श्रीरामांनी स्वहस्ते येथे त्याची प्रतिष्ठापना केली.
वनराईने आच्छादलेला डोंगर, लगतच वाहणारी नीलकंठा नदी अशा निसर्गरम्य वातावरणात विराजमान असलेल्या या शिवलिंगास नीलकंठेश्वर म्हणून पूजले जाते. या मंदिराबाहेर दशश्वमेध कुंड आहे. या कुंडाभोवती
ब्रह्मदेवाने दहा अश्वमेध यज्ञ केल्याची आख्यायिकाही सांगण्यात येते. येथील नीलकंठेश्वराचे स्थान अतिप्राचीन आहे.
सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या पांगरी गावातील हेमाडपंती स्थापत्यशैलीतील निलकंठेश्वर मंदिराचा ५० वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला होता. चारही बाजूंनी आवारभिंत असलेल्या या मंदिरात येण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. या भिंतीत दक्षिण दिशेला किल्ल्याप्रमाणे भासणारे प्रवेशद्वार आहे. या दगडी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या भिंतींमध्ये देवकोष्टके आहेत. या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात हस्त, त्यावर तुळई व त्यावर छत आहे. या छतावर तीन घुमटाकार शिखरे आहेत. त्यापैकी मध्यभागी असलेले शिखर मोठे आहे. या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात प्राचीन उंबर वृक्षासह अनेक वृक्ष आहेत. त्यामुळे या वृक्षांच्या हिरवाईत हे मंदिर सामावल्याचे भासते. प्रांगणात प्रवेश करताच नंदीमंडपाचे दर्शन होते. शिवमंदिरांमध्ये सहसा एकच नंदी असतो. मात्र, येथील नंदीमंडपात दोन नंदी विराजमान आहेत व त्यासमोर कासवमूर्ती
आहे.
मुख्य मंदिरासमोर नंतरच्या काळात मंडप बांधलेला दिसतो. अखंड शिळांचा वापर करून बांधण्यात आलेल्या या मंदिराची सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी संरचना आहे. एका लहानशा प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या सभामंडपात भाविकांच्या सोयीसाठी दर्शनरांगेची व्यवस्था केलेली आहे. हेमाडपंती शैलीतील बांधकाम असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात दगडी स्तंभ आहेत. येथून अंतराळ व पुढे गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये असलेल्या नीलकंठेश्वराच्या लिंगावर पितळी मुखवटा आहे. असे सांगितले जाते की ही स्वयंभू शिवपिंडी आहे. या पिंडीतून सतत गंगा वाहत असते. मुखवट्याच्या बाजूला पाषाणी पिंडीवर चंद्रकोर, गाईचे खूर उमटल्याचे येथे दाखविले जाते. समोरील भिंतीवर ध्यानस्थ शिवाची प्रतिमा आहे.
या मंदिरावर जमिनीपासून ते कळसापर्यंत अनेक थर असलेले उंच शिखर आहे. या प्रत्येक थरात नक्षीकाम व सुंदर रंगकाम केलेले आहे. शिखराच्या
अग्रभागी पितळी आमलक व त्यावर कळस आहे. या मंदिरात दररोज पहाटे सहा व सायंकाळी सात वाजता आरती होते. दररोज पहाटे ५.३० ते रात्री ९ या काळात भाविकांना येथील निळकंठेश्वर महादेवाचे दर्शन घेता येते.
या मंदिरापासून साधारणतः २०० मीटर अंतरावर शिवपिंडीच्या आकाराचे एक कुंड आहे. असे सांगितले जाते की या कुंडातील पाण्यानेच पूर्वीपासून येथील पुजाअर्चा केली जाते. या कुंडाचे वैशिष्ट्य असे की कितीही पाऊस असो वा उन्हाळा यातील पाण्याची पातळी कधीही कमी जास्त झालेली नाही. शेकडो वर्षांत या भागात अनेकदा दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा परिसरातील ग्रामस्थ याच पाण्याचा वापर करीत होते. परंतु त्याही वेळी या कुंडातील पाण्याची पातळी कायम होती. याशिवाय या मंदिरासमोर असलेल्या नंदीच्या आकाराचा आणखी एक नंदी येथील मंदिराच्या वरील बाजूस डोंगरकड्यावर आहे. ही नंदीची मूर्ती दरवर्षी गव्हाच्या आकाराऐवढी पुढे सरकते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
जागृत स्थान असल्यामुळे येथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. गुढीपाडव्याच्या दिवशी येथे यात्रा असते. या यात्रेचे वैशिष्ट्य असे की नीलकंठेश्वराला नवस केल्यानंतर झालेले मूल यात्रेच्या दिवशी येथील कळसावरून खाली टाकले जाते व त्याला खाली झेलले जाते. या दिवशी अशी नवसफेड करण्यासाठी शेकडो दाम्पत्ये येथे येतात. श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून महापूजा, अभिषेक, मंत्रोच्चाराने परिसर दुमदुमून जातो. महाशिवरात्रीला येथे सात दिवसांचा मोठा उत्सव होतो. त्यावेळीही या परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले असते.