प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील निमगावात खंडोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे. खंडोबा म्हटले की, तिथे वाघ्या-मुरळी असतात. परंतु, राज्यातील हे एकमेव मंदिर असे असावे, जेथे मुरळी नाहीत; फक्त वाघ्याच आहेत. निमगावचे हे खंडोबाचे मंदिर अतिशय जागृत देवस्थान असल्याचे सांगितले जाते.
मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके १३४७ म्हणजेच २६ नोव्हेंबर १४२४ रोजी खंडोबा निमगावात प्रकटला, असे सांगितले जाते. त्यामागची कथा अशी की एकदा खंडोबा शांततेसाठी म्हणून जेजुरी गडावरून निघाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे प्रधान हेगडे होते. खंडोबा आणि हेगडे प्रधान घोडदौड करीत निमगावला येऊन पोहोचले. तेथील शांतता मनाला भावली म्हणून खंडोबाने या ठिकाणी बराच काळ वास्तव्य केले. कालांतराने देवाला बानूची आठवण आली. तिला भेटण्याची इच्छा अनावर झाली. देवाने बानूला आणण्यासाठी फर्मान सोडले. त्यावेळी हेगडे प्रधानाने बानूऐवजी जेजुरीच्या मुरळीला बानू म्हणून देवासमोर हजर केले; पण आपली फसवणूक झाल्याचे देवाच्या लगेचच लक्षात आले. खंडोबा रागावला आणि त्याने त्या मुरळीला शाप दिला आणि तू पुन्हा इथे यायचे नाही, असे सांगितले. तेव्हापासून ती मुरळी तिथे शिळा होऊन पडली. याच कारणामुळे येथील खंडोबाकडे मुरळी नसतात; फक्त वाघ्या असतात, अशी आख्यायिका आहे. लहानशा घाटमार्गाने मंदिराकडे जाताना पायऱ्या लागतात. यापैकी काही पायऱ्या चढून गेल्यानंतर या मुरळीची आडवी शिळा लागते.
वाघ्या-मुरळीबाबतची कथा अशी की, खंडोबाचे भक्त अपत्यप्राप्तीसाठी किंवा झालेले मूल जगत नसेल, तर खंडोबाला नवस करतात की आम्हाला मूल होऊ दे; ते जगल्यास तुला अर्पण करू. या नवसानंतर मूल जन्माला आले, तर ते खंडोबाला अर्पण केले जाते. त्यानुसार मुलगा असेल, तर तो वाघ्या बनतो आणि मुलगी असेल, तर मुरळी. वाघ्या बनलेला मुलगा पुढे मुरळीबरोबर खंडोबाची गाणी म्हणतो आणि मल्हारीची वारी म्हणजेच भिक्षा मागू लागतो.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेले निमगाव हे पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर राजगुरूनगरपासून आठ किमी अंतरावर आहे. निमगावच्या उत्तरेला असलेल्या छोट्या टेकडीवरील दगडी बांधकामातील हे मंदिर लांबूनच नजरेस पडते. मंदिराच्या चोहोबाजुने भक्कम तटबंदी आणि बुरूज आहेत. त्यामुळे लांबून तो एखादा किल्लाच भासतो. मंदिराच्या पूर्व, पश्चिम व दक्षिणेस भव्य दरवाजे आहेत. मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला आहे. त्याला दावडी दरवाजाही म्हणतात.
मुख्य मंदिरासमोर तीन उंच दगडी दीपमाळा आहेत. उत्तरेकडील दीपमाळेवर शिलालेख आहेत. दीपमाळेसमोर नंदीमंडप आहे. मंडपाच्या डाव्या हाताला दोन उंच दगडांवर पोर्तुगीज बनावटीच्या घंटा टांगलेल्या असून, त्यांच्यावर १८९१ हा अंक कोरलेला आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या देवड्यांत गणपती आणि हनुमानाची मूर्ती आहे. मंदिर सोपे, सभामंडप व गर्भगृह अशा रचनेचे आहे.
गाभाऱ्यात खंडोबाची मूर्ती आहे. सोबत बाणाई, म्हाळसा, भैरव व जोगेश्वरी यांच्या धातूच्या मूर्ती आहेत. येथे खंडोबाच्या नित्य पूजेसाठी भीमा नदीचे पाणी आणले जाते. मंदिरात एकूण चार भुयारे आहेत. त्यापैकी एक भुयार निमगाव येथील पेशव्यांचे दिवाण राहिलेले चंद्रचूड यांच्या वाड्यात जाते, असे सांगितले जाते.
दसरा, सोमवती अमावास्या, चैत्र पौर्णिमा, माघ पौर्णिमा, पौष पौर्णिमा, गणपूजा, महाशिवरात्रीला या ठिकाणी उत्सव साजरे केले जातात. विशेष म्हणजे १३ ते १७ मार्च या कालावधीत खंडोबाच्या गाभाऱ्यापर्यंत सूर्यकिरण पोचतात. यावेळी खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात.
सोमवती अमावास्येच्या दिवशी देव अंघोळीला निघतात. त्यावेळी पालखी सजवली जाते. पालखीत देवाचे मुखवटे ठेवून, ती नदीच्या दिशेने मार्गस्थ होते. पालखी वाजत-गाजत टाळ, मृदुंग व दिमडीच्या गजरात गावातून निघते. सुवासिनी जागोजागी पालखीची पूजा करतात. नंतर पालखी भीमा नदीच्या काठी येते. तिथे पंचामृताने देवाला अभिषेक केला जातो आणि नंतर भीमास्नान होते. त्यानंतर देवाला पुन्हा पालखीत ठेवून आलेल्या भाविकांना दर्शन दिले जाते. नंतर पालखी कमळजाईमार्गे येथून जवळच असलेल्या कडेपठार या खंडोबाच्याच स्थानावर नेली जाते. तिथून पालखी पुन्हा मंदिरात आणली जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी देवाला हळद लागते. यावेळी इथे सात दिवस अखंड हरिनाम, कीर्तन होते. अन्नदान केले जाते. माघ पौर्णिमेला देवाचे लग्न लागते आणि चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंतीदिनी देवाची वरात निघते. दसऱ्याच्या दिवशी शिलंगणाचा (सीमोल्लंघन) उत्सव असतो. खंडोबाच्या दोन हातांमध्ये तलवारी आहेत. त्यापैकी एक तलवार शिलंगणासाठी बाहेर काढली जाते. असे इथे वर्षभर कार्यक्रम होत असतात.