शाकंभरी देवी मंदिर

भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः तलवार घेऊन लढलेले त्यांच्या आयुष्यातील अखेरचे युद्ध जालन्याच्या लुटीच्या वेळी संगमनेर परिसरात झाले. या युद्धात पराक्रम गाजवून धारातीर्थी पडलेले सरदार सिधोजी नाईकनिंबाळकर यांचे वतनाचे गाव म्हणजे भाळवणी. या गावात तीन एकर परिसरावर असलेला निंबाळकरांचा ऐतिहासिक वाडा हे आजही अनेक इतिहासप्रेमींचे आकर्षणकेंद्र आहे. याच गावात असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शाकंभरी देवीचे प्राचीन मंदिर आहे. चालुक्य राजघराण्याची कुलदेवता असलेली ही देवी बनशंकरी या नावानेही ओळखली जाते.

या देवीचे मूळ स्थान कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात बदामी येथे आहे. देवीची पौराणिक आख्यायिका अशी की बदामी येथील तिलकवन भागात पूर्वी १०० वर्षांचा दुष्काळ पडला होता. तेव्हा देवीने पाताळातून आणलेल्या पाण्यावर तेथे झाडेझुडुपे आणि भाजीपाला तयार केला. ते पाहून दैत्यांनी त्या क्षेत्राची नासधूस करण्यास सुरूवात केली. तेव्हा देवीने व्याघ्रारूढ होऊन आपल्या नऊ कोटी सख्यांसह दैत्यांवर चाल केली त्यांचा निःपात केला. देवीने आपल्या देहातून शाकभाजी निर्माण करून, तसेच पाताळातील हरिद्रातीर्थातून पाणी आणून लोकांचे प्राण वाचवले म्हणून तिलाशाकंभरी’ (शाकान् विभर्ती इति शाकंभरी) असे नाव पडले. ही देवी वनात राहिली म्हणून तिला वनशंकरी वा बनशंकरी असे नाव प्राप्त झाले

बनशंकरी देवीने दुर्गमानसुर तसेच शंभासुर नावाच्या दैत्यांचा वध केला, अशाही कथा स्कंद, पद्म आदी पुराणांत आहेत. या देवीला पार्वतीचा अवतार म्हणूनही ओळखले जाते. भागवत महापुराणात वर्णन केल्यानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले. भिल्लीणीचे रूप घेत अन्य कोणताही आहार घेता या काळात तिने केवळ पालेभाज्यांचे सेवन केले होते. त्यामुळेच तिचे नाव शाकंभरी पडले. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथील देवीच्या मूळ स्थानी चालुक्य राजांनी सातव्या शतकात भव्य मंदिर बांधले. बदामीचे चालुक्य बनशंकरीची पूजा शक्तीरूपात करीत असत. ही देवी भाळवणी येथे कशी आली यासंदर्भात आख्यायिका अशी की भाळवणीमधील देवीचा एक परमभक्त दरवर्षी बदामी येथे बनशंकरी अर्थात शाकंभरी देवीच्या दर्शनासाठी जात असे. वृद्धापकाळाने त्याला तो अवघड प्रवास करणे अशक्य झाले. तेव्हा देवीने त्याला स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले कीतू त्रास घेऊन माझ्याकडे येऊ नकोस, मीच तुझ्याकडे येते.’ दुसऱ्याच दिवशी त्याला देवीची शिळा सापडली. त्या ठिकाणी देवीचे पूजन सुरू झाले. कालांतराने येथे शाकंभरी देवीचे मंदिर उभारण्यात आले.

भाळवणी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी देवीचे हे प्राचीन मंदिर उभे आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीत मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या स्तंभांवर काही शिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला हस्त त्यावरील भागात १५ देवकोष्टके आहेत. आवारभिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात प्रवेशद्वाराच्या उजवीकडे डावीकडे सुंदर कलाकुसर असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळा आहेत. डावीकडील दीपमाळ ही अष्टकोनी चौथऱ्यावर आहे. या चौथऱ्याच्या चारही दिशेला गजशिल्पे आहेत. चौथऱ्याच्या वरच्या भागात दीपमाळेभोवती सहा गजशिल्पे आहेत. त्यावरील भागातून दीपमाळेतील हस्त आहेत. या दीपमाळेच्या हस्तांच्या मध्यभागी गणपती, मारुती, महादेव अन्य देवता कोरलेल्या आहेत. दीपमाळेच्या वरपर्यंत ही शिल्परचना दिसते. उजवीकडे असणाऱ्या दीपमाळेवर तुलनेने कमी परंतु सुंदर शिल्पे आहेत

मुखमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपात असलेल्या चार दगडी स्तंभावर कलाकुसर आहे. उंच जगतीवर असलेल्या या मंदिराच्या मुखमंडपातील चार पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला कक्षासने आहेत. येथील बंदिस्त सभामंडपाच्या चार दगडी स्तंभांच्या मध्यभागी रंगशिळा आहे. यापैकी पहिल्या दोन स्तंभांवर हनुमंत गरूड यांची उठावशिल्पे आहेत. गरूडाचे शिल्प असलेल्या खांबास गरूडखांब असे म्हणतात. सभामंडपातील नक्षीदार स्तंभांच्या वरील बाजूला असलेल्या हस्तांवर नागशिल्पे कोरलेली आहेत. या मंदिरात अनेक ठिकाणी अशी नागशिल्पे आहेत. मुखमंडप तसेच सभामंडपातील छतावर नागमंडलाचे दगडी झुंबर आहेत. या झुंबराच्या मध्यभागी सुबक विष्णूमूर्ती दिसते

अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्हीकडे देवकोष्टके आहेत. त्यामध्ये गणपतीसह स्थानिक देवतांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्हीकडील स्तंभशाखेवर खालच्या बाजूला द्वारपालांची शिल्पे आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे त्यावर असणाऱ्या उत्तररांगेत (प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांच्या वर समांतर असणारे नक्षीकाम) तीन शिखरे दोन मेंढी प्रतिमा कोरलेल्या आहेत. या मेंढ्यांच्या शिंगांच्या मध्यभागी नागशिल्पे आहेत

गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ देवीच्या धातुच्या पादुका आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर कलाकुसर केलेल्या लाकडी मखरात शाकंभरी देवीची काळ्या पाषाणातील सिंहासनाधिष्ठित चतुर्भुज मूर्ती आहे. डोक्यावर मुकुट, कपाळावर भरलेला मळवट, चांदीचे डोळे, नाकात नथ, भरजरी वस्त्रे अलंकार ल्यालेली ही देवीची मूर्ती शांत सुंदर भासते. देवीच्या हातांत डमरू, त्रिशूल, भाला चक्रासारखे अस्त्र आहेत. देवीचा एक पाय खाली सोडलेला दुसरा दुमडलेला आहे. मूर्तीच्या मागील बाजूस नक्षीदार कलाकुसर असलेली पितळी प्रभावळ आहे. मंदिराच्या गर्भगृहावर पाच थरांचे शिखर आहे. यातील पहिला थर चौकोनी वर कळसापर्यंत गोलाकार आहे. या शिखरावर अनेक देवकोष्टके त्यात विविध मूर्ती आहेत. शिखराच्या अग्रभागी दोन आमलक त्यावर कळस आहे

मंदिरात श्रावण महिन्यात तसेच अश्विन पौष नवरात्रींत भाविकांची मोठी गर्दी असते. पौष नवरात्रींचा उत्सव मंदिरात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव पौष शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत असतो. आश्विन महिन्यातील नवरात्रींइतकेच या नवरात्राचेही महत्त्व असते. या काळात भाविकांकडून तिला ६० हून अधिक शाकभाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. बनशंकरी देवी महाराष्ट्रातील अनेक कुळांची कुलदेवता आहे. तिचा कृपाशिर्वाद आपल्यावर कायम असतो कारण ती आपल्याकडे शंभर डोळ्यांनी पाहत असते, असा तिच्या भक्तांचा विश्वास आहे. म्हणून तिला शताक्षी असेही म्हटले जाते

महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात शांकभरी देवीच्या नवरात्री मनोभावे पाळल्या जातात. त्यांच्या घरातही शाकंभरी पौर्णिमेला देवीला पहाटे सुर्योदयापूर्वी नैवेद्य दाखवला जातो. त्यासाठी रात्री बारानंतर स्वयंपाकाला सुरूवात केली जाते. त्यावेळी बनलेल्या ताज्या पदार्थांचाच नैवेद्यात समावेश होतो. त्यात मेतकुट, उडदाचे पापड, तिळवडे, गव्हले, कटाची आमटी, साखरभात, गुंज, तंबीट, आमटीभात, वरणभात, साधा भात अशा खास मराठमोळ्या पदार्थांचा आणि साठ प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. पालेभाज्यांनी विश्वाला जीवनदान देणाऱ्या या देवीचे स्मरण म्हणून शाकंभरी पौर्णिमेला पाने, फळे फुले आणि हिरव्या भाज्या दान केल्या जातात.

उपयुक्त माहिती

  • पंढरपूर येथून किमी अंतरावर
  • पंढरपूर येथून एसटी खासगी वाहनांची सुविधा
  • राज्यातील अनेक शहरांतून पंढरपूरसाठी एसटीची सेवा
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४२१०२७९४७, ९९७५०५६०१३
Back To Home