मल्लिकार्जुन मंदिर

लोणी भापकर, बारामती, जि. पुणे


मोरगाव अष्टविनायक तीर्थक्षेत्रापासून आठ किमी; तर बारामती या तालुक्याच्या ठिकाणाहून ३० किमी अंतरावर लोणी भापकर गाव आहे. प्राचीन अवशेष, वाडे, पुरातन शिल्पे यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या गावात प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर आहे. शंकराला समर्पित असलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्यातील दोन शिवपिंडी हे येथील वैशिष्ट्य. हे मंदिर चौदाव्या शतकातील असावे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

या लोणी भापकरमधील सर्वांत महत्त्वाचा ठरावा असा ठेवा म्हणजे येथील यज्ञवराहाचे शिल्प. भगवान विष्णूच्या वराह अवताराचे प्रतीक असलेले हे अतिशय दुर्मीळ शिल्प याच मल्लिकार्जुन मंदिराजवळ आहे. हिरण्याक्ष राक्षसाचा वध करण्यासाठी विष्णूने वराह अवतार घेतला होता. अवतारपूर्तीनंतर विष्णूने वराह शरीराचा त्याग केला. त्यावेळी शरीरापासून यज्ञासाठी लागणारी विविध अंगे बनली. म्हणून हा यज्ञेवराह, अशी आख्यायिका आहे. येथील यज्ञेवराह शिल्पाच्या चारही पायांवर विष्णूच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्याशिवाय पायाखाली शंख, चक्र, गदा व पद्म ही विष्णूची आयुधे आहेत. यज्ञेवराहाच्या या शिल्पावर अत्यंत बारीक कोरीव काम आहे. वराहाच्या अंगावर दगडाची झूल पांघरली आहे आणि त्या झुलीच्या लहान लहान चौकोनांमध्ये विष्णूप्रतिमा कोरलेल्या आहेत. अशा एकूण १४२ प्रतिमा आहेत.

प्राचीन अशा या मल्लिकार्जुन मंदिरात नवनाथांनी तपश्चर्या केल्याची आख्यायिका आहे. मल्लिकार्जुन मंदिराच्या आसपासची मंदिरे जमिनीत पुरलेल्या स्थितीत होती. सव्वाशे वर्षांपूर्वी दत्तानंद सरस्वती महाराजांनी ती शोधून काढली, असे सांगितले जाते.

हेमाडपंती बांधणीच्या या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील कळसापासून ते पायाच्या दगडांपर्यंत अतिशय नाजूक कलाकुसार आहे. मंदिराच्या कळसावर शेकडो रथ कोरलेले आहेत. हा कळस पंचरथी शिखर या प्रकारात मोडतो. मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारासमोर नंदी स्थानापन्न आहे. इतर दोन नंदी तेथेच भग्नावस्थेत आहेत.

मंदिराच्या दर्शनी भिंतीवर जाळीदार खिडक्या आहेत. प्रवेशद्वारावर नक्षीदार वेलबुट्ट्या व काही मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडपातील प्रत्येक स्तंभावर भारवाहक यक्षिणी कोरलेल्या आहेत. येथील भिंतींवर श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंग, सीताहरण यांसारखे अनेक प्रसंग कोरलेले दिसतात. सभामंडपास पूर्वेला व उत्तरेला अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. गाभाऱ्याला नक्षीदार द्वारपट्टिका आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्यात दोन शिवलिंगे आहेत. ती शिव व पार्वती यांची प्रतीके असल्याची मान्यता आहे. येथे शिव ‘अर्जुन’ म्हणून व पार्वती ‘मल्लिका’ म्हणून ओळखले जातात. म्हणून या मंदिराला मल्लिकार्जुन असे म्हटले जाते.

मंदिराच्या बाहेर रेखीव चौकोनी पुष्करणी आहे. पुष्करणीच्या एका बाजूला भव्य नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाच्या चारही बाजूंना बाहेरून शिल्पे कोरलेली आहेत. त्यामध्ये शंकर, कृष्ण व दशावतार कोरलेले दिसतात. याशिवाय मातृशिल्पे, मैथूनशिल्पे व विविध वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया येथे कोरल्या आहेत. नंदीमंडपाचे छतही रेखीव व सुंदर आहे. फुलांच्या कोरीव कामाने ते सजलेले आहे. मात्र, या नंदीमंडपात आता नंदी नाही. नंदीमंडपाच्या समोरच दत्त मंदिर आहे. दत्त मंदिर वेगळे असले तरी येथे प्रत्येक गुरुवारी शंकर, दत्त, देवी यांची एकत्रित आरती केली जाते. मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्री व श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • मोरगावपासून ८ किमी; बारामती शहरापासून ३० किमी अंतरावर
  • लोणी भापकरला येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येण्याची व्यवस्था
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा
Back To Home