
हिंदू परंपरेत श्रद्धा आणि स्मृती जपण्याच्या उद्देशाने मंदिरांचे निर्माण झाले. वाईट शक्तींपासून रक्षण आणि चांगल्या शक्तींची मदत मिळावी यासाठी देवपूजा व देवालयांची निर्मिती झाली. जीवनाला सद्गती मिळवून देणारे सद्गरू व साधू संतांची मंदिरे अनेक ठिकाणी आहेत. काही मंदिरे नवसाने बांधली गेली तर काही मंदिरे शापमुक्तीच्या उद्देशाने बांधली गेली आहेत. धुळे तालुक्यातील बोरीस गावातील सती अहिल्यादेवी मंदिर हे मानसिक त्रासातून व शापातून सुटका मिळण्याच्या उद्देशाने बांधले गेले आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली येथील सती माता नवसाला पावणारी असल्याची मान्यता आहे.
मंदिराबाबत अख्यायिका अशी की १८३२ साली अहिल्यादेवीचे पती वारल्यानंतर तिने पतीसोबत सती जाण्याची इच्छा व्यक्त केली. परंतू गावकऱ्यांनी अहिल्यादेवीस सती जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी तिला घरात डांबून ठेवले. अहिल्यादेवीची सती जाण्याची इच्छा इतकी तीव्र होती की घराचे कुलूप तुटून दारे आपोआप उघडली गेली. घरातून बाहेर पडून अहिल्यादेवीने पतीच्या पेटत्या चितेवर प्राण त्यागले. परंतू गावकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे अहिल्यादेवीने मृत्यूपूर्वी संपूर्ण गावाला कायम सुतकात पडण्याचा शाप दिला. या शापातून मुक्तता मिळवण्यासाठी गावकऱ्यांनी पौष वद्य चतुर्दशी सन १८८७ रोजी अहिल्यादेवी सती गेल्याच्या जागेवर तिची पतीसहित मूर्तीं बसवून पूजा अर्चा सूरू केली. त्यामूळे गाव सती शापातून मुक्त झाले व सतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. त्यामुळे दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत गेली. आज हजारो भाविक नित्यनेमाने सती अहिल्यादेवीच्या दर्शनासाठी येथे येतात.
प्रशस्त वाहनतळासमोर असलेल्या मंदिराच्या आवारभिंतीत मंदिराचे
प्रवेशद्वार व त्यापुढे चार गोलाकार स्तंभ असलेला मुखमंडप आहे. येथील सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे व त्यात प्रकाश व हवा येण्यासाठी खिडक्यांची व्यवस्था आहे. सभामंडपाच्या छतावर जागोजागी कमळ फुलांच्या उठाव शैलीतील नक्षी साकारलेल्या आहेत. भाविकांना दर्शन घेणे सोपे जावे यासाठी सभामंडपात दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गर्भगृहाच्या भिंतींना खिडक्या व छतात घुमट आहे. गर्भगृहाची जमीन व भिंती संगमरवरी फरशी आच्छादित आहेत. गर्भगृहात घुमटाकार शिखर व कळस असलेल्या संगमरवरी मखरात वज्रपिठावर पती रामासह सती अहिल्यादेवी यांची उठाव शैलीतील शेंदूर लावलेल्या मूर्ती आहेत. वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या मूर्तींच्या डोक्यावर मुकुट आहे. मूर्तींच्या मागे असलेल्या चांदीच्या प्रभावळीवर कमळ फुलांची नक्षी आहे. मखराच्या मागील भिंतीवर चांदीची सूर्य प्रतिमा आहे. मखराच्या भोवतीने प्रदक्षिणा मार्ग आहे.
मंदिराच्या छतावर चहुबाजूंनी कठडा आणि मुखमंडपावर उभ्या धारेची नक्षी असलेला घुमट, त्यावर आमलक व कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी शिखर आहे. शिखराच्या चारही भिंतीवर खालील बाजूस चंद्रकोरींची कलाकृती व त्यावरील भागांत देवकोष्टके आहेत. कोष्टकांच्या वरील बाजूस भिंतींवर उठाव शैलीतील घुमट नक्षी आहे. शिखरात अग्रभागी आमलक व त्यावर कळस आहे. पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेल्या मंदिराच्या प्रांगणात चारही बाजूस आवारभिंतीला लागून मोठे वृक्ष व भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे.
मंदिरात पौष वद्य चतुर्दशीपासून पंधरा दिवस वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी देवीचे माहेर असलेल्या विरदेल गावाहून आणलेला नैवद्य देवीस अर्पण केला जातो. यामध्ये वरण, भात व बट्टीच्या नैवेद्यांचा समावेश असतो. या पंधरा दिवसात परिसरात विविध वस्तूंची मोठीं बाजारपेठ भरते. यात गृहोपयोगी वस्तु, करमणुकीची साधने, कृषी साहित्य, अन्न–धान्य, खाद्य पदार्थ, मिठाया, खेळणी, गाई–म्हशी, बैल, बैलगाड्या आदी वस्तूंची खरेदी विक्री होते. या यात्रेच्या आधी पौष वद्य तृतीयेपासून मंदिरात किर्तन सप्ताह सुरू होतो. याशिवाय चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी आदी वार्षिक उत्सवांचेही आयोजन केले जाते. चैत्र पाडव्यास देवीच्या माहेरहून साडी चोळीचा आहेर आणला जातो.