हिंदू धर्मात परमेश्वर पूजनाच्या अनेक पद्धती आहेत. परमेश्वर एक असला तरी तो अनेक रुपात वावरत असतो. चराचरी भगवंत मानणाऱ्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक देवतेचे वेगळे वैशिष्ट्य व शक्ती मानली जाते. त्यामुळेच वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या देवतांची पूजा केली जाते. गणेश बुद्धीची देवता, लक्ष्मी धन संपत्ती देणारी, तर हनुमान संकटांचा विनाश करणारा म्हणून ओळखला जातो. याशिवाय अनेक ठिकाणी अर्थप्राप्तीसाठीही हनुमानाची पुजा केली जाते. त्यापैकीच एक प्रसिद्ध देवस्थान धुळे तालुक्यातील आरवी या गावात आहे. हा हनुमान ‘रोकडे हनुमान’ या नावाने ओळखला जातो. या हनुमानाच्या केवळ दर्शनाने धनलाभ होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
रोकडे हनुमान मंदिर सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचे आहे. अलीकडील काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराची आख्यायिका अशी की गावातील एका व्यापाऱ्यास जुगार खेळण्याचे भयंकर व्यसन जडले होते. जुगाराच्या नादात त्याचे व्यापारातील लक्ष कमी होऊन त्याला नुकसान होऊ लागले. हळूहळू त्याची आर्थिक स्थिती बिकट होत गेली. एके दिवशी विमनस्क अवस्थेत तो या मंदिरातील मारूती रायाच्या दर्शनाला आला व मारूतीरायाने आपल्या व्यापारात बरकत द्यावी म्हणून
त्याने प्रार्थना केली. त्या दिवसापासून त्याचा व्यापार नीट चालू लागला. इतकेच नव्हे तर व्यापाऱ्याचे जुगारात हरलेले धन परत मिळाले. तेव्हापासून धन म्हणजे रोकड देणारा मारूती म्हणून या देवास रोकडोबा मारूती या नावाने ओळखले जाऊ लागले. दररोज शेकडो भाविक धनप्राप्तीसाठी या मारुतीच्या दर्शनाला येतात.
मुख्य रस्त्यालगत भक्कम आवारभिंतीने हे मंदिर वेढलेले आहे. दोन चौकोनी स्तंभ व त्यावर आडवी तुळई, असे प्रवेशद्वाराचे स्वरूप आहे. येथून आत मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. रोकडे हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस पायाजवळ कमळ फुलांची प्रतिकृती व वर उभ्या धारेची नक्षी असलेले दोन गोलाकार स्तंभ आहेत. हे दोन्ही स्तंभ महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. या कमानीच्या वरील सज्जावर मध्यभागी मंगलकलश व त्याच्या दोन्ही बाजूस सिंहांची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दंडधारी द्विभुज द्वारपाल आहेत. ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. बंदिस्त स्वरूपातील या सभामंडपात हवा खेळती राहण्यासाठी अनेक खिडक्या आहेत. पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. अंतराळात मध्यभागी गर्भगृह व भोवतीने प्रदक्षिणा मार्ग आहे. अंतराळातील प्रदक्षिणा मार्गावर दोन्ही बाजूस मंदिराबाहेर पडण्यासाठी दारे आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर हनुमानाची शेंदुरचर्चित वीर मुद्रेतील उभी मूर्ती आहे. देवाच्या उजव्या हातात गदा व डावा हात कमरेवर ठेवलेला आहे. देवाच्या डोक्यावर चांदीचा मुकुट व वर छत्र आहे. याशिवाय मूर्तीच्या उजवीकडे एक मोठी चांदीची गदा आहे. या मंदिराच्या छतावर रामायणातील विविध प्रसंग दाखवणारी चित्रे रंगवलेली आहेत. गर्भगृहाच्या छतावर चारही बाजूंनी देवकोष्टक असलेले व वर निमुळते होत गेलेले चौकोनी शिखर आहे. शिखराच्या खालील बाजूस चारही कोनांत वानर शिल्पे आहेत. शिखरात शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
मुख्य मंदिराशिवाय प्रांगणात ज्वाला मातेचे मंदिर आहे. या मंदिरातील वज्रपिठावर सिंहारुढ ज्वाला मातेची संगमरवरी चतुर्भुज मूर्ती आहे. या मंदिराशेजारी साईबाबा मंदिर व काही शेंदूर लावलेले पाषाण आहेत. प्रांगणात असलेल्या यज्ञ मंडपात वेगवेगळ्या आकाराचे नऊ यज्ञकुंड आहेत. यज्ञ मंडपातील धूर बाहेर पडण्यासाठी सोळा गोलकार स्तंभांवर वर व खाली असे दोन भागात विभागलेले छत आहे. उत्सव काळात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यासाठी येथे भोजनालयाची सुविधा आहे.
मुख्य मंदिराच्या तटबंदीस लागून श्रीरामाचे मंदिर आहे. त्यातील गर्भगृहात वज्रपिठावर श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या उंची वस्त्र व अलंकारांनी सुशोभित संगमरवरी मूर्ती आहेत. देवांच्या डोक्यावर चांदीचा मुकुट व मागे प्रभावळ आहे. या मूर्तींच्या उजवीकडे मारुतीचीही मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर चौकोनी शिखरात चारही बाजूंना प्रत्येकी दोन देवकोष्टके, शिर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे.
मंदिरात हनुमान जन्मोत्सव, राम नवमी, दसरा, दिवाळी आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात. रोकड देणारा मारूती असल्याने देवास पैशांसंबंधी नवस अधिक केले जातात. दर शनिवारी, मंगळवारी तसेच नित्य दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. दररोज सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना रोकडे हनुमानाचे दर्शन घेता येते.