मयूरेश्वर मंदिर(अष्टविनायक क्षेत्र)

मोरगाव, ता. बारामती, जि. पुणे



अष्टविनायक क्षेत्रांमध्ये आद्य स्थानाचा मान मिळतो तो मयूरेश्वर अर्थात मोरेश्वर मंदिराला. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात, कऱ्हा नदीच्या काठावरील, मोरगावस्थित हे मंदिर म्हणजे काळ्या दगडांतील एक प्रशस्त गढीच आहे. मयूरेश्वराच्या या स्थानाचे वर्णन मुद्‌गल पुराणाच्या सहाव्या व सातव्या खंडात आलेले आहे.

चारही बाजूंनी उभारलेल्या काळ्या दगडांच्या तब्बल ५० फूट उंच तटबंदीमुळे मंदिराचे परकीय आक्रमणापासून शेकडो वर्षे संरक्षण झाले आहे. बहमनी राजवटीत आदिलशाही कालखंडात सुभेदार गोळे यांनी या मंदिराचे बांधकाम केल्याचा उल्लेख आढळतो. त्या काळात आदिलशहाचा मुख्य शत्रू मुघल सम्राट होता. मुघल आक्रमणापासून संरक्षण व्हावे, या हेतूने मंदिराची विशिष्ट रचना करण्यात आली होती. त्यात उंच तटबंदीबरोबरच चार कोपऱ्यांत चार मनोरे आणि शिखराचा घुमटाकार आकार यामुळे दूरून हे मंदिर मशीद असल्याचा भास होतो.

उत्तराभिमुख असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूंना उंच दीपमाळा आहेत. मंदिरातील मयूरेश्वराची मूर्ती डाव्या सोंडेची व पूर्वाभिमुख आहे. या शेंदूरचर्चित मूर्तीच्या डोळ्यांत व बेंबीत हिरे बसवले आहेत. मयूरेश्वराच्या डोक्यावर नागराजाचा फणा अंकित आहे आणि पुढे मूषक व मयूराच्या मूर्ती आहेत. गणरायाच्या डाव्या- उजव्या बाजूला पितळी धातूमधील रिद्धी-सिद्धीच्या मूर्तीही प्रतिष्ठापित आहेत.

गणपतीच्या या मयूरेश्वर अवताराची पौराणिक कथा अशी की गंडकी राज्याचा असुर कुळातील राजा चक्रपाणी याचा पुत्र सिंधू याने कठोर तपस्या करून सूर्याला प्रसन्न करून घेतले. सूर्यदेवाकडून त्याने अमरत्वाचा वर मागून घेतला. त्यानंतर मात्र शक्तिशाली सिंधू असुराचा अहंकार वाढत गेला आणि त्याने पृथ्वीतलावर अक्षरशः उत्पात माजवला. साधू-तपस्व्यांचा संहार करीत त्याने पुढे इंद्रलोकावर स्वारी केली. या युद्धात इंद्राचा लीलया पराभव केल्यानंतर त्याने विष्णूला लढाईसाठी आव्हान दिले. त्याचाही पराभव करीत सिंधूने सर्व देवांना एका गुहेत डांबून ठेवले. तेथे देवांनी गणपतीची प्रार्थना केली. तेव्हा गणपतीने मोरावर आरूढ होऊन अर्थात मयूरेश्वराचा अवतार घेऊन सिंधू असुराशी घनघोर युद्ध केले. त्यात गणपतीने त्याचा वध करून, त्याच्या धडाचे तीन तुकडे केले आणि ते तीन दिशांना फेकले. सिंधू असुराचे मस्तक जेथे पडले, ते स्थान म्हणजेच मोरगाव आणि येथेच गणरायाच्या मयूरेश्वर अवताराचे मंदिर ब्रह्मदेवाने बांधल्याची मान्यता आहे. मयूरेश्वराची मूळ मूर्तीही ब्रह्मदेवानेच घडवली होती, अशी आख्यायिका सांगितली जाते.

सध्याची मयूरेश्वराची मूर्ती ही मूळ मूर्ती नाही. मूळ लहान मूर्ती वाळू व धातूचा अंश असलेली आणि हिऱ्यांपासून बनविलेली होती. पुढे पांडव येथे आले असता, त्यांनी मूळ मूर्ती संरक्षणास्तव तांब्याच्या पत्र्याने बंदिस्त करून ठेवली आणि नियमित पूजेसाठी सध्याची दगडाची भव्य मूर्ती प्रतिष्ठापित केली. मूळ मूर्ती आताच्या मूर्तीच्या मागे सुरक्षित असल्याचे सांगितले जाते.

या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मुख्य सभागृहासमोर एका मंडपात भल्या मोठ्या नंदीची मूर्ती आहे. मंडपात स्थानापन्न असलेल्या या नंदीला क्षेत्रपाल, असेही संबोधले जाते. असे म्हटले जाते की, ही अर्धवट कोरीव काम झालेली नंदीची मूर्ती येथील एका शिव मंदिरासाठी रथातून नेताना मंदिरासमोरच त्या रथाचे चाक तुटले. खूप प्रयत्न करूनही हा नंदी जागचा हलविता आला नाहीच; शिवाय त्याखालील रथही तुटला. त्यामुळे अनेक दिवस हा नंदी येथेच होता. ही मूर्ती घडविणाऱ्या कारागीराला नंदीने ‘मला मोरेश्वरासमोरच ठेवा. मी येथून कोठेही जाणार नाही’, असा स्वप्नदृष्टांत दिला. तेव्हापासून या नंदीला येथेच ठेवण्यात आले. या नंदीचे कोरीव काम पूर्ण न झाल्यामुळे आताही मूळची पाषाणी शिळा मागच्या बाजूने तशीच दिसते. असे असले तरीही ही मूर्ती सुंदरच भासते. या ठिकाणाला मोरगाव नाव पडण्यामागे येथे बहुसंख्येने आढळणाऱ्या मोरांचा दाखलाही दिला जातो.

मोरेश्वराच्या पूजेचा वसा संत मोरया गोसावी यांनी घेतला होता. ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ या आरतीचे स्फुरणही श्री समर्थ रामदास स्वामी यांना याच मंदिरातील वास्तव्यादरम्यान झाल्याचे म्हटले जाते. अष्टविनायक क्षेत्राची पेशवे काळात निश्चिती झाल्यानंतर या मंदिराचा नावलौकिक वाढल्याचे मानले जाते.

भाद्रपद व माघ मासातील प्रतिपदा ते पंचमी या काळात येथे मोठे उत्सव साजरे होतात. त्यावेळी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरातून येथे पालखी येते. मयुरेश्वराची दररोज पहाटे ५ वाजता प्रक्षाळपूजा होते. सकाळी ७ व दुपारी १२ वाजता षोडशोपचार पूजा आणि रात्री ८ वाजता पंचोपचार पूजा होते. रात्री १० वाजता शेजारती होते. दुपारच्या पूजेच्या वेळी नैवेद्य म्हणून जेवणाचे ताट गणपतीसमोर ठेवले जाते; तसेच रात्रीच्या पूजेला दूधभाताचा नैवेद्य दाखविला जातो. यावेळी मंदिराच्या नगारखान्यातील नगारा वाजत असतो. पहाटे ५ ते रात्री १० पर्यंत मंदिरात जाऊन भाविक दर्शन घेऊ शकतात. मंदिर ट्रस्टतर्फे येथे अत्यल्प शुल्कात भक्त निवास व प्रसादाची व्यवस्था करण्यात येते.

 

 

उपयुक्त माहिती:

  • पुण्यापासून सोलापूर मार्गाने ५५ किमी अंतरावर; हडपसर, सासवडमार्गे ६४ किमी
  • मोरगावला जाण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या पार्किंगपर्यंत जाण्याची व्यवस्था
  • मंदिर ट्रस्टतर्फे भक्त निवास व प्रसादाची सुविधा
Back To Home