प्रसन्नगड अर्थात चावंड गडाच्या पायथ्याशी आणि कुकडी नदीच्या उगमाजवळ जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध कुकडेश्वर मंदिर आहे. जुन्नरपासून २० किमी अंतरावर असलेले हे मंदिर म्हणजे स्थापत्यकलेतील एक उत्तम हेमाडपंती नमुना आहे. पूर या गावात हे मंदिर हजार वर्षांपासूनचा कलात्मक, सांस्कृतिक वारसा जपत आजही ऐतिहासिक साक्ष देत उभे आहे. त्यामुळे पूर या गावाला कुकडेश्वर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जात असले तरी शिलाहार राजा झंझ याने सातव्या ते आठव्या शतकात हे मंदिर बांधल्याचा उल्लेख आढळतो.
या मंदिराबाबत असे सांगितले जाते की परकीय आक्रमणापासून रक्षण व्हावे या उद्देशाने गावकऱ्यांनी हे मंदिर मातीखाली गाडून, त्यावर छोटी टेकडी तयार केली होती. कालांतराने ती पिढी संपल्यानंतर येथे मंदिर होते, हे ग्रामस्थांच्या विस्मृतीत गेले. १९३० साली या टेकडीवर गुरे चारायला आलेल्या मुलाला येथे एक मोठे भगदाड दिसले. त्यातून मधमाश्या आत-बाहेर करीत होत्या. म्हणून त्याने भगदाड उकरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला तेथे नक्षीदार दगडी खांब नजरेस पडला. गुराख्याने ग्रामस्थांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांनी तेथील माती खणायला सुरुवात केली. आठ ते दहा दिवस सुरू असलेले हे काम संपले आणि कुकडेश्वराचे हे मंदिर मातीतून मुक्त झाले. विशेष म्हणजे मातीखाली राहूनही या मंदिराची इतक्या वर्षांत कोणतीही मोठी हानी झालेली नव्हती.
मुळात या मंदिराच्या बांधकामात दगड जोडण्यासाठी चुना किंवा इतर कोणत्याही माध्यमाचा वापर करण्यात आलेला नाही. हे दगड वेगवेगळ्या कोनातून तासून, त्यांना खुंट्या आणि खाचा पाडून, ते एकमेकांत बसवण्यात आले आहेत. पायापासून शिखरापर्यंतचे दगड एकमेकांत गुंफून केलेली रचना हे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य आहे; जी एकसंध असण्याप्रमाणेच टिकाऊपणाही सिद्ध करते.
या मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक अप्रतिम शिल्पाचा नमुना असलेली गणेशपट्टी, कीर्तिमुखे, भींतींवर बाहेरच्या बाजुला वराह अवतार, नंदी, गणेश, कुबेर, शिवतांडव अशी अनेक उत्कृष्ट शिल्पे आहेत. येथे द्वारशाखा म्हणजे दाराच्या चौकटीचे दोन उभे खांब आहेत. येथे दगडांत कोरलेल्या शिवगण संन्याशांच्या प्रतिमा आहेत. हातात पवित्र जल घेतलेल्या गंगा-यमुना या नदीदेवतांच्या प्रतिमाही कोरलेल्या आहेत.
मंदिराचे गर्भगृह, अंतराळ व सभामंडप, असे तीन भाग आहेत. बाहेरील सभामंडपातील नंदीमंडपात कोरीव काम असून, भारवाही गंधर्व, यक्ष, शैव, किन्नर कोरलेले आहेत. येथे देवकोष्टक आहे. त्यात शिवपार्वती आणि शिव परिवाराची मुक्ती देवता मानली जाणारी कालिकेची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. एका दगडी स्तंभावर गणपती, नृत्य करणाऱ्या अप्सरा, मृदंग वाजवणारे वादक कोरलेले आहेत. दुसऱ्या स्तंभावर कमळ आणि हातात धनुष्यबाण घेतलेला व सहा हात असलेला यक्ष आहे. परशुधारी गणेश आणि अनेक नर्तकीही स्तंभावर कोरण्यात आलेल्या आहेत.
गर्भगृहात प्रवेश करताना द्वारशाखा आहे. त्यावर स्तंभथर आणि नदीदेवता कोरलेल्या आहेत. येथे कीर्तिमुख आणि गणेशपट्टीही दिसते. सप्तमातृका आणि हातात पुष्पहार घेऊन उभ्या असलेल्या अप्सराही येथे कोरलेल्या आहेत.
गर्भगृहात कुकडेश्वराची पितळेची पिंडी, पितळी नागप्रतिमा व जलाभिषेक करणारा कमंडलू आहे. पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर म्हणजे शिल्पकलेच्या अभ्यासकांसाठी ठेवा आहे, असे मानले जाते. असे म्हटले जाते की, या गाभाऱ्यात शांतपणे थोडा वेळ बसल्यावर कानावर ओमकाराचा ध्वनी ऐकू येतो. मंदिराच्या मागील बाजूस एक गोमुख आहे आणि त्यातून झरा वाहत असतो. कुकडी नदीचा उगम येथूनच होतो. पुढे याच नदीवर असलेल्या माणिकडोह धरणामुळे जुन्नर परिसर समृद्ध व संपन्न झाला आहे. मंदिरात रोज सकाळी ७ वाजता आरती होते. भाद्रपदातील दहाव्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते.