
नवी मुंबईतील वाशी–कोपरखैरणे मार्गावर जुहूगावच्या प्रवेशद्वारावर मुख्य रस्त्याच्या मध्यभागीच नवी मुंबईतील प्रसिद्ध मरीआईचे जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी, अशी ख्याती असल्यामुळे मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील भाविक येथे येत असतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्व कारभार महिला पाहतात. मंदिर समितीवरही सर्व महिला सदस्याच आहेत. चैत्र शुद्ध षष्ठीला येथे भरणारी यात्रा ही नवी मुंबईतील मोठ्या यात्रांपैकी एक समजली जाते.
वाशीनजीकचे जुहूगाव हे पूर्वी खाडीत वसलेले एक बेट होते. या निसर्गसमृद्ध गावाभोवती शेतजमीन होती. येथे गावदेवी मरीआईचे प्राचीन स्थान होते. शहराच्या विकासात या गावाभोवतालची खाडी बुजविल्याने हे गाव आता वाशी या उपनगराच्या मध्यवर्ती भागात आले आहे. गावदेवी मरीआई मंदिर हे जुहूगावसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वाशी बसस्थानकापासून दोन किमी अंतरावर असलेले गावदेवी मरीआईचे मंदिर हे
५०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. पूर्वी ते कौलारू होते. शहराच्या विकासात हे मंदिर नामशेष होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ते हटविण्याचा प्रयत्न झाला; परंतु प्रशासनाला त्यात अपयश आले. अखेरीस या मंदिराच्या दोन्ही बाजूने रस्ता तयार करण्यात आला. मरीआई जागृत असल्यामुळे तिने स्थान अबाधित राखले, अशी श्रद्धा आहे.
मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, मरीआई ही मूळची उग्र प्रवृत्तीची देवता आहे. मुळात मरी म्हणजे पटकी, देवी यांसारख्या रोगांची साथ. पूर्वी प्राणघातक असलेल्या या साथीच्या रोगाची एक देवी कल्पून ती मरीआई या नावाने महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पुजली जाते. ‘मरीअम्म’, ‘मारी’, ‘मरीमाय’, ‘मरीभवानी’ अशा नावांनी ती प्रदेशपरत्वे ओळखली जाते. मरीप्रमाणेच जरी म्हणजे तापाची साथ या रोगाच्या देवीस जरीआई म्हणतात. या जरी–मरीचे स्थान गावात एका कोपऱ्यात किंवा गावाबाहेर झाडाखाली असते. तिच्या पुजाऱ्यास पोतराज वा पोतुराजा म्हणतात. ते मरीआईचा देव्हारा डोक्यावर घेऊन गावोगावी फिरतात. महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतातील मरीआईच्या पूजाद्रव्यात कडुनिंबाच्या पाल्याला विशेष महत्त्व आहे. पोतराज हा मरीआईचा उपासक वा भगत असून त्याच्यामार्फत मरीआईला प्रसन्न करून घेता येते, अशी सर्वत्र समजूत आहे. गावात आलेल्या साथीच्या शमनार्थ मरीआईचा गाडा गावसीमेपर्यंत नेण्यासाठी पोतराजच लागतो. त्यास काही ठिकाणी कडकलक्ष्मी म्हणतात. मरीआईला संतुष्ट केल्याने गावावरील रोगराईचे संकट टळते अशी लोकश्रद्धा आहे. याच श्रद्धेतून जुहू गावातील असंख्य भाविक गावदेवी मरीआईच्या दर्शनासाठी येत असतात.
मरीआईच्या पूर्वीच्या साध्या मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला. त्यातून मंदिराला सध्याचे आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. दुमजली असलेल्या या मंदिराच्या तळमजल्यावर देवीचे गर्भगृह आहे. येथे उंच आणि रुंद अशा वज्रपीठावर देवीची मूर्ती विराजमान आहे. वज्रपीठावर खालच्या
बाजूस गजप्रतिमांची रांग कोरलेली आहे. देवीच्या मुखवट्यावर प्रसन्न व शांत भाव आहेत. वस्त्रालंकार आणि पुष्पमालांनी नटविलेल्या देवीच्या मस्तकी नक्षीदार मुकुट आहे. मूर्तीच्या मागे नक्षीदार सोनेरी मखर आहे. मखराच्या वरच्या बाजूस धातूच्या ध्वजपताका तसेच मत्स्याकृती लावलेल्या आहेत. देवीच्या समोर धातूचा मोठा नक्षीदार त्रिशूल आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला नागेश्वर, तर डाव्या बाजूला सिद्धेश्वराची मूर्ती आहे. या दोन्ही मूर्ती काळ्या पाषाणात घडविलेल्या असून, त्या चतुर्भुज व शस्त्रधारी आहेत. नागेश्वराच्या मूर्तीच्या मागे नागशिल्प ठळकपणे दिसते.
या मंदिराच्या पहिल्या मजल्यावर सभागृह, तर दुसऱ्या मजल्यावर घुमट आहे. देवीच्या गर्भगृहासमोरील जागेचा वापर सत्संग व धार्मिक कार्यासाठी करण्यात येतो. मंदिराच्या प्रांगणात एक शिवमंदिर आहे. या मंदिराच्या बाहेर चौथऱ्यावर मोठा नंदी स्थानापन्न आहे. मंदिरात महादेवाची भलीमोठी पिंडी आहे. येथील शाळुंका काळ्या संगमरवरातील आहे व त्यावरील लिंग सुमारे
अडीच फूट उंचीचे आहे. हे लिंग नेपाळमधील गंडकी या हिमालयातून उगम पावलेल्या नदीतील शिळेपासून तयार केलेले आहे. त्याचा रंग गडद तपकिरी व काही भागावर करडा आहे. गंडकी नदीतील दगड ॲमोनाईट जीवाश्म प्रकारचे असतात. त्यांची शालीग्राम म्हणूनही पूजा केली जाते. याशिवाय येथील वज्रपीठावर गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. या मंदिराच्या शेजारी एका लहान मंदिरात श्रीराम, लक्ष्ण व सीता यांच्या मू्र्ती आहेत. याशिवाय येथे अनेक स्थानिक देवतांची लहान मंदिरे आहेत.
चैत्र शुद्ध षष्ठीला मरीआईची मोठी यात्रा असते. त्याआधी चैत्र शुद्ध पंचमीला मरीआईचे जागरण असते. त्यावेळी दोन लांब बांबूच्या काठ्या फुलमाळा, पताका व विविधरंगी कपड्यांनी सजवून वाजत–गाजत मंदिराजवळ आणल्या जातात. त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून त्या मंदिरासमोर उभ्या करून देवीचा मान दिला जातो. या दिवशी मरीआईची पालखी निघते व ती गावात फिरते. यावेळी प्रत्येक घरातून ग्रामस्थ देवीची आरती ओवाळतात. ज्या लहान मुलांना कांजण्या तसेच देवीचा आजार (अंगावर पुरळ येणे) असतो अशा
मुलांना आवर्जून या दिवशी देवीच्या दर्शनाला आणले जाते. देवीच्या दर्शनाने मुलांची या आजारातून मुक्तता होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून भाविकांची देवीच्या दर्शनासाठी रीघ लागते. हजारो भाविक यात्रेत सहभागी होतात.
येथे नवरात्रोत्सवही मोठ्या उत्साहाने साजरा होतो. याशिवाय होमहवन, स्तोत्रवाचन, नवचंडी होम हे सर्व विधी येथे होत असतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व धार्मिक विधी पुजाऱ्याकडून न करता येथील महिलाच करतात. मंदिर समितीवरही महिला कार्यरत आहेत. मंदिराचे संपूर्ण कामकाजही त्याच सांभाळतात. याशिवाय येथे आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप, महिलांसाठी आरोग्य शिबिर, श्रावण महोत्सव असे विविध कार्यक्रम भरविले जातात.
आतापर्यंत गगनगिरी महाराज, संत निरंकारी महाराज, डॉ. वीरेंद्र हेगडे महाराज, वामनराव पै, पांडुरंग शास्त्री आठवले यांची मानसकन्या दीदी, बालयोगी सदानंद महाराज आदींनी या मंदिराला भेट देऊन मरीआईचे दर्शन घेतले आहे. मंदिरात दररोज सकाळी ७ व सायंकाळी ७ वाजता देवीची आरती होते. सकाळी ७ ते १ व सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत भाविकांना या मंदिरातील गावदेवी मरीआईचे दर्शन घेता येते.