एकमुखी दत्त मंदिर

नारायणपूर, ता. पुरंदर, जि. पुणे


चौदाशे वर्षांचा एक हठयोगी साधू वाघावर बसून ज्ञानेश्वरादी भावंडांना धडा शिकवण्यासाठी निघतो. पण, तीच भावंडे भिंतीवर बसून, आकाशमार्गे उड्डाण करीत त्या हठयोग्याला भेटायला येतात. चार बालकांना निर्जीव भिंतीवर बसून येताना पाहिल्यावर गर्वहरण झालेला तो हटयोगी ज्ञानेश्वरांना शरण जाऊन आठ वर्षांच्या मुक्ताबाईचे शिष्यत्व पत्करतो. या हठयोग्याचे नाव चांगदेव. पुण्याजवळील नारायणपूर हे चांगदेव महाराजांचे गाव.

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले नारायणपूर तसे लहानसे गाव; परंतु ऐतिहासिक व आध्यात्मिकदृष्ट्या या स्थानाचे महत्त्व मोठे आहे. येथे असलेले नारायणेश्वर मंदिर आणि तेथील यादव काळातील शिल्पे या गावाचे प्राचीनत्व सिद्ध करते. ऐतिहासिक पुरंदरचा तह याच गावात झाला होता; ज्या तहाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले २३ किल्ले दिलेरखानाला द्यावे लागले होते.

सद्गुरू नारायण तथा अण्णा महाराजांनी देशात चार दिशांना चार ‘दत्तधाम’ बांधले. त्यापैकीचे एक एकमुखी दत्त मंदिर हे याच गावात आहे. जागृत देवस्थान असलेल्या या दत्त मंदिरामुळे हे गाव प्रसिद्धीस आले. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची कायमच गर्दी असते.

मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर भव्य सभामंडप आहे. सभामंडपातच एका औदुंबराच्या झाडाखाली विष्णूच्या संगमरवरी पादुका आहेत. त्याच्या शेजारीच शिवपिंडी व नंदी आहे. सभामंडपात एका लहान गाभाऱ्यात त्रिमूर्ती दत्ताची मूर्ती; तर मुख्य गाभाऱ्यात सुंदर अशी एकमुखी दत्ताची मूर्ती स्थानापन्न आहे. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा जप करीत भाविक या मूर्तीला प्रदक्षिणा करतात. सभामंडपात अनेकदा गुरुचरित्राचे पारायण होत असल्याने गुरुचरित्राच्या काही अध्यायांचे सार छायाचित्ररूपात सभागृहाच्या भिंतींवर लावण्यात आले आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला प्राचीन नारायणेश्वर मंदिर; तर उर्वरित तिन्ही बाजूंनी पूजाविधीची दुकाने थाटलेली दिसतात. मंदिर समितीतर्फे येथील साधक व भाविकांसाठी भक्त निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याशिवाय गुरुवारी व इतर उत्सवाच्या दिवशी नि:शुल्क प्रसादाची सुविधा आहे. या मंदिराची दारे २४ तास भाविकांसाठी खुली असतात.

सद्गुरू नारायण तथा अण्णा महाराजांनी येथील नारायणेश्वराच्या मंदिरात तपश्चर्या केली होती. तिथे त्यांना नारायणेश्वराने ध्वनीरूपात दर्शन दिले; मात्र तेवढ्याने अण्णा महाराजांचे समाधान होईना. त्यांनी भगवंताकडे प्रकटरूपात दर्शन देण्याची याचना केली. त्यावेळी भगवंतांनी त्यांना गुरुकृपा करून घेण्याची आज्ञा दिली. त्यानंतर नारायणेश्वराची आज्ञा घेऊन अण्णा महाराज आता ज्या ठिकाणी एकमुखी मंदिर आहे, त्या ठिकाणी असलेल्या औदुंबराच्या लहानशा झाडाला रोज प्रदक्षिणा घालू लागले. एके दिवशी अण्णा महाराजांना येथे दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला. तिथेच त्यांनी विष्णूच्या निर्गुण पादुका, शंकराची पिंडी व नंदीची प्रतिष्ठापना केली आणि तीन मुखी दत्त मंदिर उभारले. साधारण १९६४ च्या आसपास हे मंदिर उभारण्यात आले. त्यानंतर १९८६ मध्ये एकमुखी दत्ताची सहा भुजा असलेली संगमरवरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येथे करण्यात आली.

नारायणपूरचे हे दत्त मंदिर जागृत देवस्थान आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. सलग २१ गुरुवारी येथे येण्याचा संकल्प केल्यास २१ गुरुवार पूर्ण होण्यापूर्वीच भाविकांचे इच्छित काम पूर्ण होते, असा अनेक भाविकांचा अनुभव आहे. येथे आल्याने मनाला शांती आणि समाधान लाभते, असे अनेक भाविक आवर्जून सांगतात.

दर गुरुवारी आणि पौर्णिमेला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्या दिवशी सकाळी ५ वाजता रुद्राभिषेक आणि नंतर काकड आरती होते. दुपारी महाप्रसाद आणि रात्री ९.३० वाजता आरती झाल्यानंतर पालखी सोहळा असतो. शेवटची आरती मध्यरात्री १२.३० वाजता होते. पौर्णिमेच्या दिवशी होमहवन होते. दत्त जयंती हा येथील सर्वांत मोठा उत्सव असतो. हा सोहळा तीन दिवसांचा असतो. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक येथे येतात.

उपयुक्त माहिती:

  • स्वारगेटपासून ३२ किमी; तर सासवडपासून८ किमी अंतरावर
  • भोर व सासवडहून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाण्याची व्यवस्था
  • परिसरात भक्त निवास व न्याहारीची सुविधा
Back To Home