चौंढेश्वरी देवी ही नवदुर्गांपैकी एक चामुंडा देवी असल्याचे मानले जाते. उत्तर भारतात ती चामुंडा म्हणून, तर दक्षिण भारतात चौंढेश्वरी, चौडेश्वरी वा चामुंडेश्वरी या नावाने पुजली जाते. भारतात देवीची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, कर्नाटकातील सिंगदूर, तसेच आंध्र प्रदेशातील राजा नंदना चक्रवर्ती यांनी बांधलेले नंदावरम येथील मंदिर या मंदिरांचा समावेश आहे. चौंढेश्वरीचे असेच एक प्रसिद्ध मंदिर विटा या शहरात आहे. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पौराणिक ग्रंथांनुसार ब्राह्मणी, वैष्णवी, ऐंद्री, माहेश्वरी, कौमारी, वाराही आणि योगेश्वरी यांबरोबरच चामुंडेसही अष्टमातृकांत स्थान आहे. ‘मार्कंडेय पुराणा’तील ‘देवी माहात्म्या’च्या ७व्या अध्यायानुसार, शुंभ–निशुंभ या दैत्यांनी इंद्राकडून त्रैलोक्याचे राज्य जिंकले. तेव्हा त्यांच्या वधाकरीता पार्वतीमातेच्या शरीरकोषातून अंबिका देवी निर्माण झाली. चंड आणि मुंड हे शुंभ–निशुंभाचे सेवक होते. त्यांनी अंबिकेस पाहिले व तिच्या रुपसौंदर्याचे वर्णन शुंभाकडे केले. शुंभाने अंबिकेस आपली पत्नी हो, असा निरोप पाठवला. अंबिकेने त्यास धुडकावून लावल्यावर तिला पकडून आणण्यासाठी शुंभ–निशुंभाने चंड–मुंडांना पाठवले. त्यावेळी अंबिकेच्या शरीरातून प्रकटलेल्या कालीने चंड–मुंडांचा वध केला. यामुळे देवी भगवतीने कालीदेवीस चामुंडा असे नाव दिले. याच चामुंडा, चामुंडेश्वरीचा अपभ्रंश चौंडेश्वरी वा चौंढेश्वरी असा झाला.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांत चौंढेश्वरीची मोठ्या प्रमाणावर पूजा केली जाते. काही मंदिरांमध्ये चौंढेश्वरीची शाकंभरी देवी म्हणून पूजा केली जाते. शाकंभरी देवीची आख्यायिका अशी की पूर्वी कर्नाटकातील तिलकवन या भागात १०० वर्षांचा दुष्काळ पडला होता. तेव्हा देवीने पाताळातून आलेल्या पाण्यावर तेथे झाडेझुडुपे आणि भाजीपाला तयार केला. देवीने आपल्या देहातून शाकभाजी निर्माण करून, तसेच पाताळातील हरिद्रातीर्थातून पाणी आणून लोकांचे प्राण वाचवले म्हणून तिला ‘शाकंभरी’ (शाकान् विभर्ती इति शाकंभरी) असे नाव पडले.
ऐतिहासिक विटा शहरात १९७० साली चौंढेश्वरी देवीचे मंदिर स्थापन करण्यात आले. याच्या स्थापनेचा इतिहास असा की येथे १९५५ मध्ये स्थापन झालेल्या ‘देवांग समाज ट्रस्ट’ने येथील विणकर समाजाची आराध्यदेवता असलेल्या चौंढेश्वरी मातेचे मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार शहरातील विणकरांनी विणलेल्या प्रत्येक साडीमागे एक पैसा अशा प्रकारे वर्गणी गोळा करण्यात आली आणि त्यातून सावरकर नगर या भागात ३ नोव्हेंबर १९६७ रोजी मंदिरवास्तूची पायाभरणी करण्यात आली. २६ फेब्रुवारी १९७० रोजी मंदिरात देवीच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करून हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. विटा शहरातील गजबजलेल्या वस्तीत रस्त्यालगत देवीचे हे मंदिर आहे.
मंदिरास आवारभिंत व त्यात प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात मध्यभागी लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे गजपृष्ठाकार छत आहे. या छताच्या दोन्ही बाजूस पत्र्याचे उतरते छत आहे. मंदिरास खुल्या स्वरुपाचा दुमजली सभामंडप आहे. सभामंडपाचे बांधकाम सिमेंट काँक्रिटचे आहे. सभामंडपात मधल्या दोन रांगांत प्रत्येकी पाच चौकोनी स्तंभ व बाह्यबाजूच्या दोन्ही रांगांत प्रत्येकी सहा चौकोनी स्तंभ आहेत.
सभामंडपापुढे कोरीव लाल दगडात बांधलेले अंतराळ व गर्भगृह आहे. सभामंडपापेक्षा उंचावर असल्यामुळे अंतराळात जाण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. अंतराळाची समोरील बाजू खुली आहे. येथे तीन महिरपी कमानीने जोडलेले चार नक्षीदार स्तंभ आहेत. गोलाकार व वर निमुळते होत गेलेले स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. या स्तंभांच्या शीर्षभागी चौकोनी कण्या आहेत. स्तंभदंड खाली व वर चक्राकार आहेत. मधला भाग कमळदल नक्षींनी व्यापलेला आहे. स्तंभांवरील महिरप कमानीवर दोन्ही बाजूला चक्राकार नक्षी आहेत. वितानावर चक्रनक्षी आहेत. अंतराळात जमिनीवर मध्यभागी कासवशिल्प आहे. अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्टके आहेत. उजव्या बाजूच्या देवकोष्टकात मारुती व डाव्या बाजूच्या देवकोष्टकात गणपती यांच्या शेंदूरचर्चित मूर्ती आहेत.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. मंडारकावर कीर्तिमुख आहे. गर्भगृहात वज्रपिठावर देवीची काळ्या पाषाणातील सिंहारूढ अष्टभुजा मूर्ती आहे. देवीच्या हातात खड्ग, गदा, धनुष्य, आदी शस्त्रे तसेच अग्नीकुंड व अमृतपात्र आहे. मस्तकी मुकुट व अंगावर उंची वस्त्रालंकार धारण केलेल्या या देवीमूर्तीच्या पाठशिळेवर मध्यभागी पंचफणी नाग व दोन्ही बाजूस पर्णलता व पुष्पलता नक्षी आहेत. वज्रपीठ व देवींच्या मूर्तीस चांदीचे नक्षीदार आवरण आहे. देवीची मूर्ती सुमारे पाच फूट उंच आहे. ती लिंगाप्पा दासाप्पा या शिल्पकाराने घडविलेली आहे. मूर्तीसमोर वज्रपिठावर देवीची पितळी उत्सव मूर्ती आहे. गर्भगृहाचे वितान अष्टकोनी व मध्यभागी चक्रनक्षी आहे. गर्भगृहाच्या छतावर नक्षीदार शिखर व त्यावर कळस आहे.
येथे दरवर्षी २६ फेब्रुवारी हा मंदिराचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या निमित्ताने सलग आठ दिवस धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मंदिरात शाकंभरी नवरात्रौत्सव व शाकंभरी पौर्णिमा हा अकरा दिवस चालणारा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. याशिवाय शारदीय नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी, चैत्र पाडवा आदी सण व उत्सव साजरे केले जातात. देवीची पालखी मिरवणुकीने ग्रामप्रदक्षिणा होते. या वेळी ढोल–ताशांच्या गजरात गुलाल उधळीत हत्ती व घोडे नाचवित देवीचा पालखी सोहळा साजरा केला जातो. सर्व उत्सवाच्या वेळी परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.