थोर ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभलेले सांगली आजही विविध बाबींसाठी सुप्रसिद्ध आहे. आशियातील हळदीची सर्वांत मोठी बाजारपेठ, आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना असलेल्या सांगलीची ओळख कुस्तीगिरांचे शहर अशीही आहे. येथेच १८४३ साली आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’चा पहिला प्रयोग झाला होता. याच प्रमाणे धार्मिकदृष्ट्याही सांगलीस मोठा वारसा आहे. गणपती पंचायतन हे येथील प्राचीन मंदिर ख्यातकीर्त आहे. ‘सांगलीचा गणपती आहे सोन्याचा… त्याला बाई आवडे भरजरी शेला’, असे या मंदिराबाबत म्हटले जाते.
महाराष्ट्रात गणेशाची पूजा सातवाहन काळापासून होत असली, तरी त्यास पेशवे काळात अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्या काळात येथे अनेक गणपती मंदिरांची स्थापना झाली. पेशव्यांच्या पटवर्धन सरदारांचे गणेश हे आराध्य दैवत. या घराण्याचे संस्थापक हरभट बाळंभट पटवर्धन यांनी गणपतीपुळे येथे बारा वर्षे गणेशाची आराधना केली होती. त्यांच्या वारसांनी गणेशाराधनेचा तोच वारसा जपला. पटवर्धनांना पेशव्यांच्या काळात प्राप्त झालेल्या जहागिरीच्या ठिकाणी व पुढे आपल्या संस्थानांत त्यांनी गणेश मंदिरांची स्थापना केली. मिरज येथे श्रीमंत गंगाधरराव गोविंद पटवर्धनांनी उभारलेले तळ्यावरील गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. सांगलीतील गणेश पंचायतन हे भव्य मंदिर या संस्थानचे संस्थापक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी उभारले.
रावबहादुर डी. बी. पारसनीस यांच्या १९१७ साली प्रकाशित झालेल्या ‘द सांगली स्टेट’ या इंग्रजी ग्रंथानुसार, हरभटांचे पुत्र गोविंद हरि यांना श्रीमंत नानासाहेब पेशव्यांच्या काळात (इ.स. १७४० ते ६१) मंगळवेढा, कुरुंदवाड आणि मिरज या ठिकाणी जहागिरी प्राप्त झाली. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन हे गोविंद हरि यांचे खापर पणतू. वयाच्या नवव्या वर्षी त्यांना मिरजेच्या सरदारकीची वस्त्रे प्राप्त झाली. ते अल्पवयीन असल्याने ते त्यांचे चुलते गंगाधरपंत यांच्यामार्फत कारभार पाहात. पुढे अंतर्गत गृहकलहामुळे चिंतामणराव व गंगाधरपंत यांचे पटेनासे झाले व जानेवारी १८०० मध्ये त्यांच्या वाटण्या झाल्या. यानंतर चिंतामणरावांनी आपल्या राजधानीसाठी कृष्णाकाठी असलेल्या सांगली या छोट्या गावाची निवड केली.
१८०७ पासून त्यांनी सांगलीतील पेठांची आखणी करून वसाहतीला प्रारंभ केला. यानंतर तीनच वर्षांनी, १८११मध्ये त्यांनी गणेश पंचायतन मंदिराच्या बांधकामास प्रारंभ केला. सुदैवाने या मंदिराच्या बांधकामाविषयीचे तपशीलवार कागदपत्रे आजही इतिहास अभ्यासकांना उपलब्ध आहेत. त्यानुसार सर्वप्रथम या मंदिराकरीता चिंतामणराव पटवर्धनांनी येथील स्वानंद भवनच्या माळावरील विस्तृत जागा निश्चित केली होती. परंतु तेथे पाण्याची कमतरता जाणवू लागल्याने मंदिराचे बांधकाम अर्धवट राहिले. त्यानंतर त्यांनी कृष्णाकाठच्या रम्य परिसराची निवड केली. १८४५च्या चैत्र शुद्ध दशमी या दिवशी मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली, तर १८४७ साली मंदिराचा कलशारोहण समारंभ पार पडला. यानंतरही वेळोवेळी मंदिराच्या वास्तूमध्ये भर टाकण्यात आली. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांचे १८५१ मध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र धुंडिराव हे सांगली संस्थानचे अधिपती झाले. त्यांच्या कार्यकालात (१८५१ ते १९०१) मंदिराच्या मुख्य वास्तूचा सज्जा, तसेच चार देवतांच्या तीन खणी सोप्यांची बांधकामे झाली. तिसऱ्या टप्प्यात, चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन (दुसरे) यांच्या काळात १२ मार्च १९४४ रोजी गणपतीच्या सभामंडपाच्या बांधकामास प्रारंभ झाला. नऊ वर्षे त्याचे काम चालले व त्यास चार लाख रूपये खर्च आला. या सभामंडपाचे उद्घाटन १९५३ साली तत्कालिन उपराष्ट्रपती व हिंदू तत्त्वज्ञानाचे थोर अभ्यासक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या हस्ते झाले. यानंतर १९५४ मध्ये येथे नऊ लाख रूपये खर्चून भव्य महाद्वार बांधण्यात आले.
गोकाकहून आणलेल्या लाल–गुलाबी रंगाच्या पाषाणातून बांधलेल्या या दुमजली महाद्वारासमोर पूजा साहित्याची अनेक दुकाने आहेत. मध्यभागी मुख्यद्वार व दोन्ही बाजूस उपद्वार अशी महाद्वाराची रचना आहे. तिन्ही द्वारांत महिरपी कमानी व आत दोन्ही बाजूस पहारेकरी कक्ष आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना व चार नक्षीदार स्तंभात तीन महिरपी कमानी असलेला सज्जा आहे. प्रवेशद्वारांच्या छतावर घुमटाकार तीन शिखरे व त्यावरील आमलकावर कळस आहेत. महाद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथील कारंजे व सुंदर उद्यान मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात. प्रांगणातून काही अंतर पुढे गणेशाचे काळ्या पाषाणात बांधलेले मंदिर आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे सभामंडपात जाण्यासाठी तीन पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्यांच्या डाव्या व उजव्या बाजूस चौथरे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दर्शनी भिंतीत दीपकोष्टके आहेत.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रवेशद्वारालगत दोन्ही बाजूस प्रत्येकी दोन नक्षीदार स्तंभ व त्यावरील कणीवर हस्त व महिरपी कमानी आहेत. दुमजली सभामंडपात प्रत्येकी पाच लाकडी स्तंभांच्या दोन रांगा व त्यावर वरील मजल्याचा सज्जा आहे. वरील मजल्यावरील दोन्ही बाजूंच्या सज्जात पाच नक्षीदार स्तंभ व त्यात महिरपी कमानी आहेत. उत्सवांच्या वेळी राजघराण्यातील महिला या सज्जात उभ्या राहून कार्यक्रमाची शोभा पाहत असत. सभामंडपास अंतराळाच्या प्रवेशद्वाराजवळ डाव्या व उजव्या बाजूस बाहेर पडण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपाच्या छताला विशाल झुंबर व पितळी घंटा टांगलेली आहे.
अंतराळात नक्षीदार लाकडी मखरात गणेशाची उत्सवमूर्ती आहे. पुढे गर्भगृहाचे नक्षीदार प्रवेशव्दार आहे. द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणेश शिल्प आहे. गर्भगृहात संगमरवरी मखरात वज्रपिठावर गणेशाची चतुर्भुज डाव्या सोंडेची मूर्ती आहे. मूर्तीच्या पाठीमागील दोन भुजांपैकी उजव्या भुजेमध्ये पाशांकुश व डाव्या भुजेमध्ये दंत आहे. तर समोरील उजवी भुजा अभय मुद्रेत व डाव्या भुजेमध्ये मोदक आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंस रिद्धी–सिद्धी यांच्या उभ्या स्वरूपाच्या मूर्ती आहेत. त्यांनी चवऱ्या व फुलांची परडी धारण केलेली आहे. गणेश मूर्ती उंची वस्त्रे व अलंकारांनी सुशोभित आहे. मागील सोनेरी धातूच्या प्रभावळीवर उत्कृष्ट नक्षीकाम केलेले आहे. महाबळेश्वर येथून आणलेल्या संगमरवरी पाषाणात या मूर्तीसह येथील पंचायतन देवांच्या मूर्ती घडवलेल्या आहेत. संस्थानातील कागदपत्रांतील नोंदींनुसार, त्या मूर्तींसाठीचा सर्व दैवतशास्त्रीय सल्ला पुण्याचे वेदशास्त्रसंपन्न पंडित चिंतामण दीक्षित आपटे यांच्याकडून घेण्यात आला होता. या मूर्ती घडवण्याचे काम मुकुंदा पाथरवट व जिवाण्णा देशिंगकर यांच्याकडे सोपवण्यात आले होते.
मंदिराच्या सभामंडपावर वर व खाली असे दोन भागात विभागलेले कौलारू छत आहे. छतावर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन थरांची दोन शिखर आहेत. शिखराच्या पहिल्या थरात प्रत्येकी आठ देवकोष्टके व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. वरील थरात कमळ फुलाच्या नक्षी व शीर्षभागी आमलक आणि त्यावर कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे, निमुळते होत आकाशात झेपावणारे मुख्य शिखर आहे. शंकूच्या आकाराच्या या शिखराची उंची ८० फूट आहे. त्यातील चार थरातील देवकोष्टकांत विविध मूर्ती आहेत. पाचव्या थरात एकावर एक असे दोन आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
मंदिराच्या चारही बाजूला चिंतामणेश्वर, चिंतामणेश्वरी, लक्षीनारायण व सूर्य नारायण यांची चार मंदिरे आहेत. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या काळातील कागदपत्रांत चिंतामणेश्वर देवाचा उल्लेख ‘श्री सांब’, तर चिंतामणेश्वरी देवीचा उल्लेख ‘श्री देवी’ असा करण्यात आला आहे. यावरून त्यांच्या मृत्यूनंतर या देवांस त्यांचे नाव देण्यात आले असल्याचे स्पष्ट होते. या मंदिराच्या सभामंडपास पाच पायऱ्या आहेत. सभामंडपात महिरपी कमानीने जोडलेले चार नक्षीदार स्तंभ आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखा पानाफुलांच्या नक्षीने सुशोभित आहेत. ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. छतावर चार थरांचे शिखर असलेल्या या चारही मंदिरांची रचना एकसारखी आहे. सर्व मंदिरांचे बांधकाम लाल नक्षीदार दगडातील आहे. प्रांगणातील भिंती विरहित नवग्रह मंदिरात नऊ स्वतंत्र वज्रपिठावर नवग्रहांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती स्थित आहेत.
प्रांगणात गजराज शिल्प तसेच चौथऱ्यावर श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन यांचा पुतळा आहे. माघी गणेश जयंती व भाद्रपद मासातील पार्थिव गणेशोत्सव हे मंदिरांतील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. पार्थिव गणेशोत्सव काळात पाचही दिवस मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पाचव्या दिवशी संस्थानाच्या पार्थिव गणेशाची हत्ती, उंट, घोडे, भालदार, चोपदार आदिंसहित कृष्णेच्या घाटावर रथातून विसर्जन मिरवणूक निघते. यावेळी भाविकांकडून रथावर पेढ्यांची उधळण केली जाते. या मंदिरात संकष्टी व विनायकी चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी असते.