पळसनाथ मंदिर

पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भीमा नदीकाठी वसलेले पळसदेव हे एक प्राचीन व ऐतिहासिक गाव आहे. १९७५ मध्ये भीमा नदीवर उजनी धरण बांधून पूर्ण झाल्यावर त्याच्या जलाशयाखाली जुने पळसदेव गाव पूर्णपणे बुडाले. गावाच्या विस्थापनामुळे येथील नागरिकांनी नदीकाठीच नवीन पळसदेव गाव वसवले. या धरणामुळे गावासोबतच येथील मध्ययुगीन स्थापत्यकलेचा वारसा लाभलेले पळसनाथ मंदिरही पाण्यात बुडाले. हे मंदिरे वर्षाचे अनेक महिने पाण्यात राहते. केवळ उन्हाळ्यात उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्यावरच ते जलाशयाबाहेर दिसू लागते. ऐतिहासिक संदर्भांनुसार, पळसदेवचे प्राचीन नाव ‘रत्नपूर’ असे होते. हे गाव त्या काळी एक प्रमुख व्यापारपेठ व बाजारपेठेचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. पळसदेव ही राजा नलहंसाची जुनी राजधानी होती. येथील विष्णू मंदिराच्या सभामंडपात असलेल्या एका शिलालेखातून या मंदिरांच्या निर्मितीबद्दलची महत्त्वाची माहिती मिळते. कल्याणी चालुक्य राजांच्या काळातील शके १०७९ म्हणजेच इसवी सन ११५७ मधील या शिलालेखानुसार दंडनायक चांगदेव याने या विष्णू मंदिराची उभारणी केली. बसवण उपाध्यायाने या मंदिराच्या बांधकामाचे नियोजन केल्याचे मानले जाते. या मंदिरासाठी तत्कालीन काळात पुत्राच्या नावे असलेली सोन्याची १००० नाणी व १०० सुवर्णमुद्रा अर्पण करण्यात आल्या. मंदिराच्या देखभालीसाठी करमुक्त जमीनही दान देण्यात आली होती. नंतरच्या काळात साधारण सतराव्या व अठराव्या शतकामध्ये फलटणचे बाबूराव जहागीरदार निंबाळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून येथे नवीन बांधकामे केली. ब्रिटिश गॅझेटिअरमध्येही १६८० च्या सुमारास या मंदिराच्या बांधकामाचा व परिसरातील धर्मशाळांचा उल्लेख आढळतो. पळसदेव मंदिर या परिसरात ‘सरदेश्वर’ या नावानेही ओळखले जाते. प्राचीन काळी राजा नहुष याला शापामुळे सरडा व्हावे लागले व तो याच ठिकाणी येऊन पडल्याची पौराणिक कथा या नावामागे आहे. आध्यात्मिक क्षेत्रातही या स्थानाचे मोठे महात्म्य आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ‘ज्ञानेश्वरी’मध्ये या ठिकाणाचा उल्लेख ‘पलाशीतीर्थ’ असा केला असून त्यावरून या क्षेत्राची प्राचीनता स्पष्ट होते. हे क्षेत्र भीमा नदीच्या उत्तरवाहिनी पात्रात वसलेले आहे. शिव व विष्णू या दोन्ही देवतांची मंदिरे येथे शेजारी असणे हे ‘हरिहर’ ऐक्याचे प्रतीक मानले जाते. भीमा नदीच्या संगमावर देवांची प्रतिष्ठापना करून भक्ती व शक्तीचा संगम साधण्याचा प्रयत्न त्याकाळी करण्यात आला होता. पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण गावापासून मंदिराचा प्रवास सुरू होतो. भिगवणपासून काही अंतरावर पळसदेव गावाचा फाटा लागतो. येथून जाणारा कच्चा रस्ता थेट उजनी धरणाच्या पात्रात जाऊन पोहोचतो. धरणाचे पाणी कमी असतानाच मंदिरापर्यंत पायी जाता येते. उन्हाळ्यातही पात्रात पाणी असल्यास छोट्या होडीतून पाण्याबाहेर दिसणाऱ्या मंदिरापर्यंत प्रवास करावा लागतो. या मंदिर परिसरात मुख्य पळसनाथ मंदिरासोबतच सतीशिळा, वीरगळ, भंगलेल्या मूर्ती व दीपमाळेचे अवशेष आहेत. मंदिराच्या समोरच सतराव्या शतकात बांधलेली एक प्रशस्त धर्मशाळा आहे. अष्टकोनी व वर्तुळाकार छताच्या या धर्मशाळेत पूर्वी भाविकांची व प्रवाशांची राहण्याची सोय केली जात असे. घाटाजवळ काशीविश्वेश्वर व सोमेश्वर ही दोन मंदिरे असली तरी ती बहुतांश काळ पाण्याखालीच असतात.

यादवपूर्व काळातील भूमीज स्थापत्य शैलीचे हे मंदिर एक उत्कृष्ट उदाहरण आहे. २८ फूट उंचीच्या पळसदेव शिवमंदिराचे खालचे ८ फूट बांधकाम दगडी व वरील भाग विटांचा आहे. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी विभागलेली आहे. भूमीज शैलीचे हे शिखर आजही सुस्थितीत असून त्यावर आमलक व स्तूपिका आहे. मंदिराच्या पंचशाखीय प्रवेशद्वारावर व्याल, पद्मपत्र, गंधर्व व विविध नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपातील २७ कोरीव स्तंभांवर साखळदंड व छोट्या घंटांचे सूक्ष्म कोरीव काम दिसते. यातील काही स्तंभांवर हलक्या वस्तूने प्रहार केल्यास त्यातून संगीताचे सप्तसूर निघतात. विष्णू मंदिराच्या बाह्यभिंतींवर रामायणातील वाली-सुग्रीव युद्ध, सीता-हनुमान भेट व सेतू बांधणीची दृश्ये कोरलेली आहेत. या कोरीव कामात समुद्रातील मासे सुद्धा बारकाईने कोरलेले दिसतात. मंदिराच्या भिंतींवर १६ व ३२ प्रकारच्या सूरसुंदरींची शिल्पे आहेत. त्यात दर्पणा, पुत्रवल्लभा, कर्पूरमंजिरी या मुद्रांमधील स्त्रियांच्या आकृत्या पाहायला मिळतात.

१९७५ मध्ये पळसदेव गाव बुडाल्यानंतर तेथील उत्सवांचे स्वरूप बदलले. मूळ मंदिरातील ऐतिहासिक शिवलिंग व शेषशायी विष्णूची मूर्ती आता नवीन गावातील मंदिरात आहे. गावात नदीकिनारीच एक प्रशस्त मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.

तेव्हापासून मूळ मंदिरातील सर्व उत्सव या नवीन मंदिरात साजरे होतात. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा होतो. या दिवशी परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. जुनी मंदिरे पाण्याखाली असली तरी उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर भाविक येथे दर्शनासाठी येतात.

हे क्षेत्र आता धार्मिक उत्सवांबरोबरच पर्यावरण पर्यटनासाठीही प्रसिद्ध झाले आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी हिवाळ्यात हजारो रोहित (फ्लेमिंगो), करकोचे, बगळे व विविध पाणपक्षी येतात. पक्षी निरीक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरते.

उपयुक्त माहिती

  • इंदापूर येथून २१ किमी अंतरावर
  • पुणे येथून १२१ किमी अंतरावर
  • पुणे व इंदापूर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने गावातील नवीन मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
Back To Home