बलाढ्य राक्षस भीमासुराचा वध करण्यासाठी गणपतीच्या सल्ल्याने शंकराने ज्या ठिकाणी १२ वर्षे तपश्चर्या केली ते ठिकाण म्हणजे आजचे तपनेश्वर महादेव मंदिर. मंचरपासून एक किमी अंतरावर भीमाशंकरला जाण्याच्या मार्गावर निसर्गसमृद्ध परिसरात हे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. स्वतः श्रीकृष्ण पांडवांच्या मदतीला या ठिकाणी धावून आले होते, असा संदर्भही या स्थानाला आहे.
या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की, आज ज्या ठिकाणी मंदिर आहे तो परिसर म्हणजे पुराणांत प्रसिद्ध असलेली मणिपूर नगरी. या समृद्ध भूमीत प्राचीन काळी अनेक ऋषी-मुनी तपश्चर्येला बसत असत. कालांतराने एक बलाढ्य राक्षस भीमासुर त्यांच्या तपश्चर्येत व्यत्यय आणून त्यांना त्रास देऊ लागला. शेवटी सर्व ऋषींनी ही समस्या सोडविण्यासाठी श्री शंकराचा धावा केला. त्यानुसार भगवान शंकर या मणिपूर नगरीत भीमासुराचा वध करण्यासाठी आले. हे समजताच राक्षसाने आपल्या सामर्थ्याने श्री शंकराला जागेवरच थोपवले. शंकराचे भीमासुरासमोर काही चालत नाही, हे पाहून ऋषींनी शंकराला तेथून जवळच असलेल्या वडगाव काशिंबेग येथील गणपतीचा सल्ला घेण्यास सांगितले. या गणपतीने दिलेल्या सल्ल्यानुसार शंकराने या भूमीत १२ वर्षे तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्यांनी भीमासुराचा वध करून सर्व परिसर त्याच्या दहशतीतून मुक्त केला. श्री शंकराने या भूमीत तप केल्यामुळे या भूमीला तपोभूमी, असे नाव पडले.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार, भगवान श्रीकृष्णाने पांडवांना आपले साम्राज्य सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करण्यास सांगितले. त्यानुसार हस्तिनापूर येथून एक अश्व (घोडा) सोडण्यात आला. सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन या घोड्याचा रक्षक होता. जेथे हा घोडा जात होता, तो प्रदेश आपल्या साम्राज्यात घेत अर्जुन पुढे जात होता. एक एक प्रदेश पादाक्रांत करीत पुढे चाललेल्या विजयी घोड्याला या मणिपूर नगरीत आपल्या शक्तीच्या सामर्थ्याने बब्रुवाहनाने अडविले. मी आपलाच पुत्र असल्याचे त्याने अर्जुनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, अर्जुनाने त्याचा अपमान करीत तू नर्तिकेचा मुलगा आहेस, असे हिणवले. यावेळी झालेल्या घनघोर युद्धात अश्वमेध यज्ञाचा अश्व धारातीर्थी पडलाच; शिवाय बब्रुवाहनाने अर्जुनाचे शिरही उडविले. ही बातमी हस्तिनापुरात पोहोचली. श्रीकृष्णाने इतर पांडवांसह मणिपूर नगरीत धाव घेऊन अर्जुनाचे शरीर व शिर एकत्र जोडून त्याला जिवंत केले. बब्रुवाहनाला आशीर्वाद देऊन श्रीकृष्णाने येथील तपनेश्वराचे दर्शन घेतले. त्यामुळे आजही तपनेश्वर महादेवाच्या प्रांगणात असलेल्या पिंपळ वृक्षाखाली श्रीकृष्णाचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.
पुणे-नाशिक महामार्गावर पुण्यापासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मंचरमध्ये हे प्रसिद्ध व प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या समोरच भलीमोठी दगडी पुष्करणी आहे. परिसरातील शेकडो वर्षांपूर्वीचे अनेक वृक्ष या क्षेत्राचे प्राचीनत्व सिद्ध करतात. प्रवेशद्वाराशी असलेल्या आकर्षक कमानीच्या बाजूलाच दोन भव्य दीपमाळा आहेत. तेथूनच संपूर्ण दगडी बांधकामातील मुख्य मंदिर नजरेस पडते.
खुला सभामंडप आणि गर्भगृह, अशी मंदिराची रचना आहे. १० खांबांवर उभ्या असलेल्या या सभामंडपात सुंदर नंदी स्थानापन्न आहे. गर्भगृहाच्या बाहेर, डाव्या बाजूला, श्री गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर दगडांत कोरलेले नक्षीकाम आहे. आत असलेल्या मूळ दगडी शिवपिंडीवर पितळेचे आवरण चढविले आहे. त्यामुळे शिवपिंडीचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे. मंदिरावरील कळसावरही नक्षीकाम आणि त्यावर रंगकाम केलेले आहे. मंदिराबाहेर अनेक संत-महंतांची समाधिस्थाने आहेत.
या तपनेश्वर मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे जो कुंभमेळा होतो, त्यातील नाथ संप्रदायाची दिंडी जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र पारुंडेमार्गे दर १२ वर्षांनी तपनेश्वराच्या प्रांगणात येते. त्या दिंडीतील एक साधू १२ वर्षांसाठी येथील गादीवर विधिवत महंत म्हणून नियुक्त केला जातो. संत तुकाराम महाराजांनीही याच परिसरात ‘मंचरी’ हा ग्रंथ लिहिला आहे. असे म्हटले जाते की, भीमाशंकर जोतिर्लिंगाचे दर्शन तपनेश्वराच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही.
श्री तपनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा मोठा उत्सव असतो. हे मंदिर भीमाशंकर मार्गावर असल्यामुळे येथेही भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. पहाटेपासून दर्शनासाठी सुरू झालेली रांग रात्री उशिरापर्यंत सुरू असते. महाशिवरात्रीला येथे महाप्रसादाचे वाटप होते.