धार्मिक प्रसंग व भारतीय इतिहासाचे दर्शन घडविणारे एक तीर्थक्षेत्र म्हणजे पुणे जिल्ह्यातील पानशेत धरणाजवळील निळकंठेश्वर मंदिर. शंकर महादेवाला समर्पित असलेल्या या मंदिरात तब्बल १२०० हून अधिक देव-देवता, साधू-महंतांच्या लहान-मोठ्या मूर्ती स्थापित आहेत.
या मंदिराच्या उभारणीची एक कथा आहे. पुरंदर तालुक्यातील मोरगाव येथे १९४० साली जन्मलेले शंकर रंगनाथ सर्जे ऊर्फ सर्जेमामा परमेश्वराच्या भक्तीत लीन असत. बेताचे शिक्षण झालेल्या सर्जेमामांनी कुटुंब चालविण्यासाठी सिंहगड वनक्षेत्रात वनपालाची नोकरी पत्करली होती. त्यांच्याकडे ५२ गावांतील वनसंरक्षण व संवर्धनाची जबाबदारी होती. ६ मार्च १९६२ या दिवशी डावजे गावातील डोंगरात नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना त्यांना ‘मी तहानलेला आहे, पाणी पाज’ असा ध्वनी ऐकू येऊ लागला. आवाज नेमका कोठून येत आहे याचा शोध घेतला असता, तो तेथील जमिनीखालून येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेथे खोदकाम केल्यावर एक शिव पिंडी व नंदीची मूर्ती सापडली. जमिनीतून मूर्ती काढल्यावर गावातून पाणी आणून त्यांनी अभिषेक केला. त्यानंतर काही दिवसांनी सर्जेमामा यांनी येथे देवस्थान उभारले. तेच आजचे हे निळकंठेश्वर मंदिर.
निळकंठेश्वर मंदिरात सध्या १२०० हून अधिक देव-देवतांच्या लहान-मोठ्या मूर्ती, पुराणातील अनेक प्रसंग उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये सीता स्वयंवर, समुद्रमंथन, अशोक वाटिकेत पोहोचलेला हनुमान, द्रौपदी वस्त्रहरण, विष्णूचे अवतार असे अनेक प्रसंग मूर्तीं स्वरूपात उभारण्यात आले आहेत. त्यासोबतच महाराष्ट्रातील संत परंपरा, संतांच्या मूर्ती, कृष्ण, राम, गणपती, सरस्वती, लक्ष्मी या सर्व देवी-देवतांच्या मूर्तीही आहेत. जागोजागी विविध प्रसंग, मूर्ती यांची माहिती सांगणारे फलक लावण्यात आले आहेत. डोंगरावर लांब लांबपर्यंत पसरलेल्या या भव्य-दिव्य मूर्ती आणि देखावे खूप सूंदर आहेत. मंदिराच्या खालच्या बाजूला सर्जे मामांचे स्मारकही उभारण्यात आले आहे. मंदिर देवस्थानाच्या वतीने वर्षभरात येथे अनेक उत्सव व कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
हे स्थान जागृत असल्याचा भाविकांचा विश्वास आहे. संपूर्ण परिसरात व्यसनमुक्तीचे केंद्र म्हणून या मंदिराची ओळख आहे. एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीने येथील देवासमोर शपथ घेतली, तर तो व्यसनमुक्त होतो आणि आतापर्यंत अनेकांना याची प्रचिती आल्याचे भाविकांकडून सांगितले जाते. या परिसराचे वैशिष्ट्य म्हणजे डोंगरमाथ्यावर असूनही येथे बारमाही पाणी असलेल्या सात विहिरी आहेत.
पानशेत धरणाजवळील जांभळी डोंगरावर हे मंदिर आहे. पायथ्यापासून मंदिरापर्यंतचा प्रवास पायी करावा लागतो. येथे पालखी किंवा डोलीसारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक ठिकाणी पायऱ्या, तसेच चढावाचा रस्ता आहे. या परिसरातून निसर्गसोंदर्यासोबतच सिंहगड, मुठा नदी, तसेच खडकवासला व पानशेत या धरणांचे विहंगम दृश्य नजरेत साठवता येते. येथे विविध प्रकारचे पक्षी व साप आढळतात. त्याशिवाय अनेक आयुर्वेदिक वनस्पतींसाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत भाविकांना या मंदिरात शंभू महादेवाचे दर्शन घेता येते. भाविकांसाठी येथे विश्रांतीची सोयही आहे. देवस्थानाच्या उपाहारगृहात अल्पोपाहार व न्याहारीची व्यवस्था होऊ शकते.