पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथे मीना नदीच्या काठावर श्री लक्ष्मी नृसिंहाचे अत्यंत पुरातन व जागृत मंदिर आहे. हिंदू धर्मातील विष्णूच्या दशावतारांपैकी नृसिंह अवतार हा भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारा मानला जातो. येथे असलेली भगवान नृसिंहाची पूर्ण सिंह रूपातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती ही एकमेवाद्वितीय मानली जाते. वैशाख शुद्ध चतुर्दशीला भगवान नृसिंहाचा होणारा जन्मोत्सव हा या गावचा सर्वात मोठा सोहळा असतो व यावेळी राज्यभरातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
रांजणी येथील या मंदिराचा इतिहास विविध ऐतिहासिक कालखंडांशी जोडलेला आहे. या मंदिराच्या मूळ रचनेवरून मंदिराचा संदर्भ यादव काळापर्यंत मागे जातो. मराठा साम्राज्याच्या वैभवाच्या काळात म्हणजे अठराव्या शतकात या मंदिराला विशेष राजकीय व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. थोरले बाजीराव पेशवे जेव्हा निजामाच्या स्वारीवर निघाले होते, तेव्हा त्यांनी वाटेत या मंदिरात थांबून भगवान नृसिंहाचे दर्शन घेतले होते. मोहिमेत यश मिळाल्यास या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा नवस त्यांनी त्यावेळी केला होता. बाजीराव पेशवे स्वतः हा नवस पूर्ण करू शकले नाहीत, तरी पुढे पेशवाईचे धोरणी कारभारी नाना फडणवीस यांनी १७८० च्या सुमारास या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
नाना फडणवीस यांनी मंदिराच्या उभारणीसोबत मीना नदीच्या तीरावर एक मजबूत व सुंदर दगडी घाट बांधला.
संत तुकाराम महाराज यांचे आध्यात्मिक सहकारी कचेश्वरभट्ट ब्रह्मे याच रांजणी गावचे रहिवासी होते. त्यांच्या भक्तीमुळे हे स्थान प्रसिद्धीस आले. ब्रह्मे घराण्यातील वंशजांना पुढे ‘राजगुरू’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या घराण्याकडे असलेल्या मोडी लिपीतील जुन्या कागदपत्रांतून या मंदिराच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यातही या गावाचे योगदान राहिले आहे. सन १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील झुंजार सेनापती तात्या टोपे यांनी या मंदिरात येऊन भगवान नृसिंहाचा आशीर्वाद घेतला होता. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांविरुद्धच्या आपल्या लढ्यादरम्यान या मंदिरात दोन दिवस व दोन रात्री गुप्त मुक्काम केला होता. या क्रांतिकारी घटनांमुळे रांजणी गावाला ‘बंडाची रांजणी’ अशी ऐतिहासिक ओळख प्राप्त झाली.
पौराणिक ग्रंथांमधील उल्लेखानुसार, भगवान विष्णूचा नृसिंह अवतार हा अधर्माचा नाश आणि धर्माच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिरण्यकश्यपू या दैत्याचा वध करण्यासाठी देवाने स्तंभातून अवतार घेतला व आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचा अंत केला. या अवतारात मस्तक सिंहाचे तर देह मानवाचा होता. मूर्तिशास्त्रामध्ये नृसिंहाची अनेक रूपे वर्णिलेली आहेत. त्यात प्रामुख्याने केवल नृसिंह, स्थौण नृसिंह, यानक नृसिंह आणि योग नृसिंह यांचा समावेश होतो. विष्णूच्या दशावतारात केवल नृसिंह हाच लक्ष्मीसह प्रकट होतो व त्याला लक्ष्मी नृसिंह असे संबोधले जाते. रांजणी येथील मूर्तीचे वैशिष्ट्य तिचे पूर्ण सिंह रूपात असणे हे आहे. सामान्यतः नृसिंह मूर्तीचे मस्तक सिंहाचे व देह मानवाचा असतो. परंतु येथे असलेली मूर्ती चतुष्पाद म्हणजे चार पायांच्या सिंहाच्या रूपात आहे. जगात अशा स्वरूपाची ही एकमेव मूर्ती असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या मूर्तीसंदर्भात एक आख्यायिका अशी की नृसिंहाचे भक्त असलेले लखुजी दरवर्षी वारीसाठी इंदापूर येथील नीरा नरसिंहपूरला पायी जात असत.
वयोमानामुळे वारी करणे कठीण झाले, तेव्हा स्वतः भगवंताने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला व मीना नदी जिथे उत्तरवाहिनी होऊन पूर्ववाहिनी होते तिथे जळत्या पेंढीजवळ मूर्ती मिळेल, असे सांगितले. cलखुजींना त्या ठिकाणी ही वैशिष्ट्यपूर्ण चतुष्पाद सिंह रूपातील मूर्ती प्राप्त झाली आणि त्यांनी तिची रांजणीत स्थापना केली.
रांजणी गाव हे आंबेगाव तालुक्यातील मीना नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. मीना नदीने या गावाला तिन्ही बाजूंनी कवेत घेतले आहे. नदीचा प्रवाह येथे उत्तरवाहिनी होऊन पुढे पूर्ववाहिनी होतो. नदीकाठचा हा परिसर विविध प्रकारच्या दाट झाडांनी व्यापलेला आहे. मंदिराच्या परिसरातही शेकडो वर्षांपूर्वीचे प्राचीन चिंचेचे झाड आहे. वास्तुकलेच्या दृष्टीने हे मंदिर पेशवेकालीन वाडा पद्धतीचे व आधुनिक स्थापत्याचा एक सुंदर मिलाफ मानले जाते. मंदिराचे महाद्वार भव्य स्वरूपाचे असून त्यावर भक्कम अशा घडीव दगडांचे बांधकाम केलेले आहे. या महाद्वारावरच नगारखाना आहे. येथे सण-उत्सवांच्या वेळी पारंपरिक वाद्यांचा गजर केला जातो.
येथील मुख्य सभामंडप लाकडी खांबांवर आधारलेला आहे. या प्रशस्त सभामंडपातील खांबांवर असलेले कोरीव काम पेशवेकालीन कलेची साक्ष देते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर आणि भिंतींवर विष्णूच्या विविध अवतारांचे तसेच पौराणिक कथांचे चित्रण केलेले आहे. गर्भगृहात भगवान नृसिंहाची सुमारे एक मीटर उंचीची मूर्ती आहे. काळ्या पाषाणात घडवलेल्या या मूर्तीच्या डोळ्यांवर व नाकावर सोन्याचा पत्रा तसेच भुवयांवर चांदीचा पत्रा मढवलेला आहे. मूर्तीचे पुढचे दोन पाय भक्तांना आशीर्वाद देण्याच्या स्थितीत असून तिचे मस्तक ताठ व मानेवर सुंदर आयाळ दिसते. मूर्तीच्या मागील बाजूस मोर व नागाच्या प्रतिकृती असलेला कोरीव महिरप आणि मध्यभागी सिंहाचे शिल्प कोरलेले आहे. मंदिराचे शिखर विविध थरांमध्ये विभागलेले आहे व त्यावर देव-देवतांच्या मूर्ती आणि कळस आहेत. काही वर्षांपूर्वी मूळ हेमाडपंती रचनेला धक्का न लावता ग्रामस्थांनी तीन कोटी रुपये खर्चून या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.
मंदिरात वर्षभर विविध उत्सव व सण अत्यंत उत्साहात साजरे होतात. या परंपरा शतकानुशतके येथे जपल्या गेल्या आहेत. वैशाख शुद्ध चतुर्दशीला भगवान नृसिंहाचा जन्मोत्सव हा या गावचा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. यावेळी संपूर्ण गावाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. या निमित्ताने मंदिरात नऊ दिवसांची नृसिंह नवरात्र साजरी केली जाते. या नऊ दिवसांत येथे भजन, कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन केले जाते. दररोज सकाळी देवाला पंचामृत अभिषेक घालून नवीन वस्त्रे व मौल्यवान अलंकार चढवले जातात. वैशाख शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी भगवंताचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. यावेळी मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण आणि देवाचा जयजयकार केला जातो. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘पाऊल गडी’ नावाचा एक विशेष कार्यक्रम होतो. यात देवासमोर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर कुंकवाच्या पावलांचे ठसे उमटवले जातात. भाविक मोठ्या श्रद्धेने ‘गुळाची शेरणी’ नावाचा नवस करतात आणि नवसपूर्तीनंतर पाच किलो वजनाचा गूळ देवाला अर्पण करतात. दिवाळीतील लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला येथे विशेष अलंकार पूजा केली जाते. दररोज सकाळी पाच ते सायंकाळी सात या वेळेत भाविक येथे दर्शन घेऊ शकतात.