भक्तांच्या हाकेला धावून जाणारी व नवसाला पावणारी देवी, अशी मेसाई देवीची ख्याती आहे. या देवीचे मंदिर शिरूर तालुक्यातील कान्हूर येथे आहे. तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक कुटुंबांची मेसाई देवी कुलदेवता आहे. राजगुरूनगर-शिरूर मार्गावर स्थित असणारे हे मंदिर राजगुरूनगरपासून ३० किलोमीटर; तर शिरूरपासून २८ किलोमीटर अंतरावर आहे.
पुराणांतील उल्लेखानुसार, भगवान परशुरामाने जमदग्नीच्या आज्ञेवरून आई रेणुकेचे शिर धडावेगळे केले. परंतु, जमदग्नीला नंतर आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. त्याने रेणुकेला पुन्हा जिवंत करण्याचे ठरवले. पण, रेणुकेचे शिर मिळत नसल्याने समोर आलेल्या एका मातंगीचे शिर कापून, ते रेणुकेच्या धडाला चिकटवले. तेव्हा रेणुकेच्या पूजेआधी मातंगीची पूजा होईल, असा वर परशुरामाने तिला दिला. हीच मातंगी काही ठिकाणी मायराणी, मेसको, मेसाई या नावांनी ओळखली जाते.
मेसाई म्हणजेच महाकालीचा अवतार. कान्हूरमध्ये बालिकेच्या रूपात देवी प्रकट झाली. देवीने आपले स्थान कान्हूर गावाबाहेरील स्मशानात निश्चित केल्यामुळे तिला स्मशाननिवासिनी, असेही म्हटले जाते. देवीची सात रूपे आहेत. त्यापैकी महाकाली म्हणजे मेसाई देवी. देवीची अख्यायिका अशी, एके दिवशी देवीचे हे सात अवतार, सात रूपे म्हणजेच या सात बहिणी एकत्र आल्या. प्रत्येकीने आपले स्थान वेगवेगळ्या गडावर निश्चित केले. सर्व देवी आपापल्या निश्चित केलेल्या गडावर स्थायिक झाल्या. मात्र, देवी मेसाईला कुठेही स्थान मिळाले नाही. त्यावेळी मेसाई देवीने बहिणींना विचारले, ‘मी कुठे जाऊ?’ तेव्हा बहिणी गमतीने म्हणाल्या, ‘तू जा मसनात.’ त्यावर ‘होय, मी जाईन मसनात. मला काय अडचण आहे,’ असे म्हणत देवी मेसाई आपल्या मार्गाने जाऊ लागली. वाटेत जाताना देवीला लमाणी तांडा दिसला. त्या तांड्याच्या मदतीने देवी नाशिकवरून ढगेगावपर्यंत आली. देवीने तेथील एका माळ्याला ‘मला कान्हूर येथे सोड’, असा दृष्टांत दिला. मग माळ्याच्या मदतीने देवी कान्हूर येथे स्थायिक झाली. देवीने आपले स्थान स्मशानात मांडले, अशीही आख्यायिका प्रसिद्ध आहे.
मेसाई मंदिराचे प्रवेशद्वार नक्षीदार आहे. कळसावरील रंगकामामुळे मंदिर खुलून दिसते. मंदिराला प्रशस्त सभामंडप आहे. सभामंडपाचे बांधकाम २०२० साली नव्याने करण्यात आले आहे. गाभाऱ्यासमोर सिंहाचे रेखीव शिल्प असून गाभाऱ्यात देवीची सुबक मूर्ती आहे. मुकुट, साडी, दागिने, मोरपीस यांमुळे देवीचे रूप अधिकच खुलते. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की, देवीच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी केवळ विधवा स्त्रियांनाच आहे. त्यांनाच देवीच्या पूजेचा मान दिला जातो. इतर भाविकांना गाभाऱ्याबाहेरूनच देवीचे दर्शन घेता येते.
मंदिरात दररोज सकाळी ७ ते १० या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण होते. सायंकाळी ४ ते ६ प्रवचन असते. सायंकाळी ७ ते रात्री ८ हरिपाठ असतो. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत भाविक देवीचे दर्शन घेऊ शकतात.
मेसाई देवी भोळ्या भक्तांच्या हाकेला धावणारी आहे, असा सर्वांचा विश्वास आहे. चैत्र पौर्णिमेला दोन दिवस देवीची यात्रा भरते. या दिवशी देवीचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील हजारो भाविक येथे येतात. या दोन दिवसांत भजन, कीर्तन, भारूड, ढोल, लेझीम असे विविध कार्यक्रम होतात. यावेळी देवीला सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले जातात. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरानजीक भक्त निवासाची व्यवस्था आहे.