खंडोबा मंदिर 

कडेपठार-जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे


‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या जयघोषात ज्याची पूजा केली जाते, ते महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणजे खंडोबा. या खंडोबाचे मूळ स्थान जेजुरी गडाच्या मागे असलेल्या कडेपठार मंदिरावर आहे. सतराव्या शतकापर्यंत खंडोबाच्या नावाचा जयघोष करीत भाविक कडेपठारावरील मंदिरात येत असत. पण, सुपे परगण्यातील खैरे नावाच्या भोळ्या भक्तासाठी खंडोबा जेजुरी गडावर अवतरले आणि तेथेच भव्य मंदिर उभे राहिले. आता दररोज हजारो भाविक या जेजुरी गडावर जात असले तरी त्यातील शेकडो भाविक हे आवर्जून कडेपठारावरील खंडोबाच्या मूळ स्थानाचे दर्शन घेण्यासाठी दररोज जात असतात.

कडेपठार हे स्थान जेजुरी गावापासून २५९ मीटर उंचीवर आहे. तेथे जाण्यासाठी ७५० पायऱ्या असून, पायथ्यापासून एक ते दीड तास पायी जावे लागते. जेजुरी गावातून चिंचेच्या बागेतून (हा परिसर चिंचेची बाग म्हणून प्रसिद्ध आहे) जाणारा आणि नव्या जेजुरी गडावरून जाणारा दुसरा, असे दोन रस्ते कडेपठार मंदिराकडे जातात. त्यापैकी चिंचेच्या बागेतून जाणाऱ्या रस्त्याचा भाविकांकडून जास्त वापर केला जातो.

कडेपठाराच्या पायथ्याशी मंदिराच्या मार्गाची मुख्य कमान आहे. त्या भागाला ‘विझाला’, असेही म्हटले जाते. असे सांगितले जाते की, वीज पडून झरा निर्माण झाल्याने या भागाला हे नाव पडले. विझालापर्यंत गाडी जाण्यासाठी रस्ता आहे. कडेपठारावर जाण्यासाठीच्या पायऱ्या तेथूनच सुरू होतात.

पायरी मार्गावर सर्वप्रथम खंडोबाचे घोडेउड्डाणाचे स्थान आहे. पुढे काही अंतर चढून गेल्यानंतर डोंगरकपारीत बाणाई देवीचे स्थान आहे. बाणाई ही खंडोबाची दुसरी पत्नी. धनगर समाजाने सांभाळलेली बाणासुराची ती मुलगी असल्याचे मानले जाते. एक कथा अशीही सांगितली जाते की, शंकरावर प्रेम करणारी दासी जया हिला देवी पार्वतीने वचन दिले होते. त्यानुसार शंकराने खंडोबाचा अवतार घेतल्यानंतर बाणाईच्या रूपाने तिला दुसरी पत्नी होण्याचा मान मिळाला. या बाणाईच्या प्रेमामध्ये खंडोबाने जेजुरी सोडली आणि धनगराचे रूप घेतले. बाणाईच्या पित्याकडे शेळ्या राखण्याची चाकरीही केली. एके दिवशी त्याने सर्व शेळ्यांचे प्राण काढून घेतले आणि बाणाईच्या पित्याला सांगितले, की मी या शेळ्या जिवंत केल्या, तर बाणाईचा विवाह माझ्याशी करून द्यावा लागेल. त्यानुसार बाणाई खंडोबाची पत्नी झाली. त्यानंतर खंडोबाने आपले खरे रूप दाखवून बाणाईला कडेपठारावर आणले. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा देवी हिला मात्र सवतीबरोबरचा संसार पटला नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद होऊ लागले. तेव्हा खंडोबाने बाणाईला कडेपठारावर येण्याच्या अर्ध्या वाटेवरच स्थान दिले. रोज मध्यरात्रीनंतर खंडोबा बाणाईच्या भेटीस येत असत, अशी कथा सांगितली जाते.

बाणाईचे दर्शन घेतल्यानंतर पुढे जेजुरी गडावरून कडेपठारावर येणारा रस्ता लागतो. नव्या जेजुरी गडाच्या मागील बाजूने येणारी पायवाट अडीच किलोमीटर लांबीची आहे. याच मंदिराच्या मार्गावर जुन्या तीन वेशीही आहेत. कठेपठारावर जाण्यासाठी येथे दोन रस्ते एकत्र येतात. येथे काही मंदिरे आहेत. त्यात सर्वप्रथम हेगडी प्रधानाचे स्थान आहे. मल्लासुराशी झालेल्या युद्धात हेगडी प्रधानाच्या रूपाने साक्षात श्रीविष्णू खंडोबाचे प्रधान झाले होते. खंडोबाने बाणाईच्या रक्षणासाठी येथे हेगडी प्रधानाची नियुक्ती केल्याचे सांगितले जाते; तर काहींच्या मते हेगडी प्रधान हा बाणाईचा भाऊ होता आणि बाणाईच्या विवाहानंतर तो खंडोबाचा प्रधान बनला.

यापुढे भगवानगिरीचा मठ आहे. येथे भगवानगिरी आणि त्यांची शिष्या ज्वालागिरी यांची समाधी आहे. पुढे साक्षविनायकाचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. पार्वतीने आपली दासी जया हिला वचन देताना गणपतीला साक्षीला ठेवले होते. पुढे खंडोबा अवतारात शंकराचा बाणाईशी विवाह झाल्यानंतर म्हाळसा अवतारातील पार्वती रागावली. तेव्हा गणपती साक्ष देण्यासाठी आला; पण म्हाळसाने ही साक्ष नाकारली. पुढे विवाद मिटल्यानंतर खंडोबाने आपल्या दर्शनास आलेल्या भक्तांची साक्ष ठेवण्याचे काम गणपतीवर सोपवले, तोच हा साक्षविनायक. साक्षविनायकाच्या दर्शनाशिवाय खंडोबाचे दर्शन पूर्ण होत नाही, असे मानले जाते.

खंडोबाच्या मुख्य मंदिरासमोर पश्चिमाभिमुख मेघडंबरीत नंदी विराजमान आहे. मंदिराचा दरवाजा आणि नंदी यांच्यामध्ये सुमारे २० फूट व्यासाचे दगडी कासव आहे. तीन कमानी सदर, सभामंडप, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर जय व विजय यांच्या प्रतिमा आहेत.

गर्भगृहात खंडोबा व म्हाळसा यांचे द्विलिंग आहे. सोबत धातूचे नाग व श्वान प्रतिमा आहे. त्यामागे खंडोबा, म्हाळसा यांच्या पूजेच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. सर्वांत मागे ३ फूट उंच व २ फूट रुंद दगडात कोरलेली मार्तंडभैरवाची भव्य चतुर्भुज मूर्ती आहे. दोन्ही बाजूस म्हाळसा आणि बाणाईच्या प्रतिमा आहेत. हे खंडोबाच्या अवताराचे मूळ ठिकाण असून येथेच शंकराने हा अवतार धारण केल्याची मान्यता आहे. कडेपठारावरील या अतिप्राचीन मंदिराच्या बांधकामाबाबत कोणत्याही नोंदी उपलब्ध नाहीत.

मंदिराच्या पूर्व द्वाराजवळ एक विहीर आणि तलाव आहे. या परिसरात लक्ष्मीआई व वेताळ यांची स्थाने असल्याचे सांगितले जाते. या मार्गावर अनेक भग्नावशेष आहेत. येथेच उत्तरेकडे हुमनाबादच्या माणिक प्रभूंचे शिष्य सिद्धयोगी लक्ष्मणबाबा यांची समाधी होती. तेथे त्यांच्या शिष्यांच्याही समाधी आहेत.

पूर्व दरवाजासमोरच दगडी चौथऱ्यावर ३० फूट उंचीचा बगाडाचा लाकडी खांब आहे. लोखंडी गळ पाठीला टोचून या बगाडावर भाविक लटकत असत. नवसपूर्तीसाठी किंवा ईश्वरी सामर्थ्य दाखवण्यासाठी अशी कृती केली जायची. पण, ही अघोरी प्रथा इ.स. १८५६ मध्ये इंग्रजांनी बंद केल्याचा उल्लेख आढळतो. या दरवाजाजवळच नगारखाना आहे. मंदिराच्या कोटाचा उत्तर दरवाजा हा भग्नावस्थेत आहे. दक्षिण दरवाजाच्या बाहेर काही मंदिरे आहेत. तेथे डोंगराच्या कडेला खंडोबाचे घोडेउड्डाण स्थान आहे. मार्तंडानी येथूनच युद्धासाठी दक्षिणेस प्रस्थान केले, असे मानले जाते. याच परिसरात सटवाई देवी, काळभैरव, भवानी व भुलेश्वराचे मंदिर आहे.

मंदिराच्या कोटाला लागून पश्चिमेकडे एका ओवरीत भांडारगृह आहे. त्याशेजारील ओवरीत अश्वारूढ खंडोबाची मूर्ती आहे. या ओवरीच्या मागे पंचलिंग मंदिर आहे. येथे गर्भगृहात पंचलिंग व गणपती प्रतिष्ठापित आहे. या पंचलिंग दर्शनाने नीलाद्री, काशी, मातापूर, हरिद्वार व जयाद्री यांच्या दर्शनाचे पुण्य मिळते, असे मानले जाते.

चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यांत शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी, आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी आणि वर्षातील सर्व सोमवती अमावास्येला खंडोबाची यात्रा असते. यावेळी हजारो भाविक या स्थानाला भेट देतात. भाविकांना सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत खंडोबाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • सासवडपासून १९ किमी; तर पुण्यापासून ५० किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक भागांतून जेजुरीला येण्यासाठी एसटी बसची सुविधा
  • पुण्यातून पीएमटी बस जेजुरी गावापर्यंत येते
  • खासगी वाहने जेजुरी गावापर्यंत येऊ शकतात
  • गडावर न्याहारीची सुविधा
Back To Home