पुणे-सासवड मार्गावर दिवेघाटाजवळ बोपगाव येथे श्री क्षेत्र कानिफनाथ गडावर कानिफनाथांचे सुमारे ८०० वर्षे प्राचीन मंदिर आहे. हे क्षेत्र नाथांची तपोभूमी असून, येथे भाविकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, असा अनेकांचा अनुभव आहे. उंच डोंगरावर असलेल्या या मंदिरात प्रत्येक पौर्णिमेला ढोल-पिपाण्यांच्या गजरात नवनाथांची पालखी फिरवली जाते. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यातील अनेक भागांतून हजारो भाविक येथे उपस्थित असतात.
मंदिराबाबतची आख्यायिका अशी, की नगरमधील मढी येथे कानिफनाथांची मूळ समाधी आहे. बोपगाव येथील एक भक्त कानिफनाथांच्या दर्शनासाठी मढी येथे पायी जात असे. कालपरत्वे त्याला मढी येथे जाणे शक्य होईना. कानिफनाथांच्या चरणी नतमस्तक होत त्याने ही आपली अडचण सांगितली. त्यावर कानिफनाथ यांनी, ‘मी बोपगावला येईन’, असे आश्वासन त्याला दिले. दिलेल्या आश्वासनानुसार कानिफनाथ बोपगाव येथे आले आणि त्यांनी सध्या मंदिर आहे त्या गडावर २४ वर्षे अखंड तपश्चर्या केली. याच ठिकाणावरून कानिफनाथ महाराज आणि शंकर महादेव यांच्यात संवाद होत होता, असा उल्लेख काही ग्रंथांमध्ये आढळतो. भक्तासाठी देव कुठेही जायला तयार असतो, याची अनुभूती कानिफनाथ गडावर येते.
मंदिर परिसरात प्रवेश करताच कानिफनाथांची कमान दिसते. हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आहे. कानिफनाथ गडावरील मूळ मंदिर हे छोटेखानी आहे. या मंदिराचा २००५ मध्ये जीर्णोद्धार केल्यानंतर सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग बांधण्यात आला. कमानीतून आत शिरताच समोरच वेताळाची मूर्ती दिसते. ग्रंथांमध्ये आलेल्या उल्लेखानुसार नवनाथांनी वेताळाचा पराजय केला होता. त्यामुळे नवनाथांच्या मंदिरात वेताळाची मूर्ती हमखास असतेच. वेताळ म्हणजे भुतांचा राजा. म्हणजेच सगळी भुते नवनाथांच्या आधीन असतात, असे सांगितले जाते.
जवळच कानिफनाथ गडाचे शिल्पकार कृष्णाजी फडतरे यांची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. मंदिराच्या कमानीवर नवनाथांच्या कथा चित्रित करण्यात आल्या आहेत. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज यांची शिल्पेही येथे आहेत. कानिफनाथांच्या गाभाऱ्याजवळ येताच ‘असे श्रद्धा ज्याच्या उरी, त्यास दिसे हा कानिफा मुरारी’ असे कोरलेले दिसून येते. मूळ गाभाऱ्यात कानिफनाथांचे दर्शन घ्यायचे असेल तर आत जाण्यासाठी जी चौकट आहे ती केवळ एक फूट बाय सव्वा फुटाची आहे. ज्याच्या मनात श्रद्धा आहे, तोच या चौकटीतून आत प्रवेश करू शकतो, असे सांगितले जाते. पुरुषांना सदरा, कंबरपट्टा बाहेर ठेवूनच त्या लहानशा चौकटीतून आत सरपटत प्रवेश करावा लागतो. मुख्य गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश नाही. आत गेल्यानंतर भक्त कानिफनाथांच्या चरणी नतमस्तक होतो. हे मंदिर म्हणजे एक गुहा आहे. याच गुहेत कानिफनाथांनी तपश्चर्या केली होती. आतमध्ये १५ ते २० जण उभे राहू शकतील एवढा गाभारा आहे. गाभाऱ्यातून बाहेर येण्यासाठी पाय पुढे आणि डोके कानिफनाथांकडे करून पुन्हा सरपटत बाहेर यावे लागते. मंदिरावर कानिफनाथांचे सुंदर शिल्प आहे. मंदिराच्या एका कोपऱ्यात कानिफनाथांचे गुरू जालिंदरनाथांचे स्थान आहे. दुसऱ्या बाजूला मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ यांची स्थाने आहेत.
गर्भगृहाला पूर्णपणे चांदीचे नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिराच्या दोन्ही दरवाजांवर हत्तीची शिल्पे आहेत. मंदिराचे मुख्य द्वार पूर्वेला आहे. कानिफनाथांचा जन्म हिमालयात हत्तीच्या कानातून झाल्याची आख्यायिका आहे. त्यामुळेच त्यांचे नाव कानिफनाथ असे ठेवण्यात आले. महादेवाने जालिंदरनाथांना सांगितले, की एका हत्तीच्या कानात ब्रह्मतेज आहे आणि या ब्रह्मतेजातून एका नाथांचा जन्म होणार आहे. जालिंदरनाथ हत्तिणीजवळ गेले. हत्तीण सैरावैरा धावत होती. मात्र, जालिंदरनाथांनी मंत्रशक्तीने तिला शांत केले आणि तिच्या कानातून सुंदर अशा बालकाचा जन्म झाला, अशी आख्यायिका सांगितली जाते.
दररोज पहाटे ५ वाजता मंदिरात काकड आरती केली जाते. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथ गडावर आनंदोत्सव यात्रा होते. गडावर, मंदिराच्या शिखरावर रंगांची उधळण केली जाते. पहाटे मंदिरात अभिषेक करण्यात येतो. बोपगावात पालखी व मानाच्या शिखरकाठीचे पूजन केले जाते. त्यानंतर हा लवाजमा वाजत-गाजत कानिफनाथ मंदिरात नेला जातो. जवळच्या गावांतील शिखरकाठ्या गडावर दाखल होतात. नाथांची आरती करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवांना रंग लावण्यात येतो. मंदिरात दर गुरुवारी दुपारी आरतीनंतर महाप्रसाद दिला जातो. शेकडो भाविक या प्रसादाचा लाभ घेतात. याशिवाय रामनवमी, हनुमान जयंती, गोकुळाष्टमी, दहीहंडी, गोपाळकाला, दत्तजयंती हे उत्सवही येथे साजरे होतात.
गडावरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य डोळ्यांत साठवण्यासाठी आणि कानिफनाथांचे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यासाठी खासकरून भाविक येथे येत असतात. भाविकांना पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत गाभाऱ्यात जाऊन कानिफनाथांच्या समाधीचे दर्शन घेता येते. रविवारी व गुरुवारी हीच वेळ पहाटे ५ ते रात्री १०.३० पर्यंत असते.