पुरंदरमधील दराडे गावाजवळच्या मरीआईच्या घाटावरून पुढे गेल्यानंतर पठारवाडीजवळ चतुर्मुख डोंगर आहे. या डोंगराच्या पश्चिमेला कऱ्हा; तर पूर्वेला चांबळी नदी उगम पावते. या परिसरात ब्रह्मदेवाने तप केल्यामुळे या डोंगराला चतुर्मुख असे नाव मिळाल्याचे सांगितले जाते. याची ब्रह्मगिरी अशीही एक वेगळी ओळख आहे. या पठारवाडीतील चतुर्मुख मंदिर प्रसिद्ध आहे.
ब्रह्मदेवांनी जिथे तपश्चर्या केली, त्या ठिकाणीच हे मंदिर उभारण्यात आल्याने हे ठिकाण अतिशय जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. चतुर्मुख, ब्रह्मगिरी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या डोंगराचे आणखी एक नावही आहे. सुवर्ण म्हणजेच सोन्याचा डोंगर!
मंदिराची आख्यायिका अशी, पांडव वनवासात असताना पुरंदर येथील पांडेश्वरला आले. येथे असताना त्यांचे पिता पंडू महाराज यांचा श्राद्ध दिन जवळ आल्यामुळे त्यांनी त्याची व्यवस्था करण्याचे ठरविले. आमंत्रणेही गेली; पण नंतर लक्षात आले की, इतक्या पाहुण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचीही सोय करावी लागेल. तेव्हा त्यांच्या मदतीस श्रीकृष्ण धावले. त्यांनी सांगितले की, समोर पश्चिमेला जो आडवा डोंगर आहे, त्याच्या माथ्यावर ब्रह्मदेव तपश्चर्या करीत बसले आहेत. त्यांच्या कमंडलूमध्ये १०८ नद्यांचे तीर्थ साठवलेले आहे. त्यांची तपश्चर्या पूर्ण झाल्यावर ते त्या तीर्थाने शिवाला जलाभिषेक करतील. कमंडलूतील जल अक्षय आहे. तो लवंडल्यास तुम्हा सर्वांना मुबलक पाणी मिळेल. या कामाची जबाबदारी भीमावर सोपवण्यात आली. भीम ब्रह्मदेव ज्या डोंगरावरती तपश्चर्या करीत बसले होते, त्या डोंगरावरती पहाटे पोहोचला आणि त्याने आपले काम केले. ब्रह्मकमंडलू लवंडून दोन प्रवाह निर्माण झाले. त्यातल्या एका प्रवाहाला आता कऱ्हा नदी म्हणून ओळखले जाते; तर दुसऱ्या प्रवाहाला चरणावती किंवा चांबळी नदी म्हणून ओळख मिळाली.
मंदिराच्या दिशेने प्रवास करताना अनुभवता येणारा आणि मंदिराच्या परिसरातून दिसणारा निसर्ग अप्रतिम आहे. सोसाट्याचा वारा व ऊन-पावसाचा खेळ अनुभवण्यासाठी पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येतात. विस्तृत परिसर लाभलेल्या या मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मूळ मंदिर दगडी आहे; पण नव्या मंदिराचे बांधकाम सिमेंटचा वापर करून करण्यात आले आहे. शुभ्र रंगातील हे नवे बांधकाम देखणे दिसते. त्यातही जुन्या वास्तुकलेचा भास होईल याची काळजी घेण्यात आली आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या नंदीमंडपात नंदीची दगडातील सुंदर मूर्ती आहे. या काळ्या तुकतुकीत नंदीच्या अंगावरील दागिन्यांना सोनेरी रंग देण्यात आल्याने तो नंदी अधिक देखणा भासतो. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला दत्त मंदिर आहे. मुख्य पटांगणामध्ये ढोल, डमरू, नाग व त्रिशूल यांनी बनवलेले एक सुंदर शिल्प आहे. अतिशय रेखीव असे हे शिल्प मन मोहित करते. मंदिराच्या आवारात दोन भव्य दीपमाळा आहेत. दीपमाळेवर सुबक नक्षीकाम आणि शिवस्तुती दिसते. त्या पार्श्वभूमीवर समोर दिसणाऱ्या पांढऱ्याशुभ्र मंदिराचे सौंदर्य आणखीनच खुलते. मंदिराची रचना सभामंडप आणि गर्भगृह, अशी आहे. नव्याने उभारण्यात आलेला सभामंडप भव्य आहे. तेथेही नंदीची लहान मूर्ती आहे. गर्भगृहाचे बांधकाम काळ्या दगडांत केलेले आहे, त्यात शिवपिंडी स्थित आहे.
मंदिराच्या आवारात अनेक लहान लहान मंदिरेही आहेत. त्यामध्ये ब्रह्मदेव व गणपती मंदिर यांचा समावेश आहे. मंदिर परिसरात पाच नैसर्गिक कुंडे आहेत आणि ती भीमाने आपल्या गदेच्या प्रहाराने निर्माण केल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या परिसरात दोन वटवृक्ष आहेत; पण इतर वृक्षांप्रमाणे त्यांना पारंब्या दिसत नाहीत. याचे कारण या झाडांना ब्रह्मदेवाने शाप दिला होता, असे सांगितले जाते.