पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान! किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरूनच महाराजांचे नाव ठेवण्यात आले होते, हे सर्वश्रुत आहे. अभेद्य किल्ला आणि जागृत देवस्थान यामुळे या स्थानावर इतिहासप्रेमी, शिवप्रेमी, पर्यटक आणि भाविकांची नेहमीच वर्दळ असते.
पुण्यापासून ९६ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे हे ऐतिहासिक व सुंदर मंदिर आहे. समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंचीवर असणाऱ्या या किल्ल्यावर जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. या मार्गावरून जाताना ठिकठिकाणी प्रवेशद्वारे लागतात. त्यातीलच एका प्रवेशद्वारातून शिवाई देवी मंदिरासाठी जाता येते. मोठमोठ्या गुलमोहर वृक्षांमधून ही वाट शिवाई मंदिरापर्यंत घेऊन जाते. गुलमोहर जेव्हा बहरलेला असतो तेव्हा या वाटेवर जणू फुलांची रांगोळीच काढली आहे, असा भास होतो.
शिवाई देवीचे मंदिर हे किल्ल्याच्या एका टोकाला आहे. मागच्या बाजूला उंच ताशीव कातळाचा भाग, तर दोन बाजूंनी खोल दऱ्या आहेत. येथून जुन्नर तालुक्यातील अनेक गावांचे विहंगम दृश्य पाहाता येते. यामध्ये हिरव्यागार दाक्षबागा, उसाची शेती, लहान मोठ्या नद्या, धरणे हे आल्हाददाई दृष्य नजरेत साठवता येते. मंदिराच्या डाव्या बाजूला पाचशे ते सातशे लोक बसू शकतील, अशी मोकळी जागा आहे.
मंदिरात प्रवेशासाठी दोन दरवाजे आहेत. सभामंडप व गाभारा असे त्याचे स्वरूप. सभामंडपातील लाकडी खांबांवरील नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूळ मंदिरापुढे पेशवाईच्या काळात हा सभामंडप बांधण्यात आला, अशा नोंदी आहेत. सध्या दिसणारा गाभारा हे शिवाई देवीचे पूर्वीचे मूळ मंदिर. अखंड दगडात कोरलेल्या गाभाऱ्यात शिवाई देवीची स्वयंभू चतुर्भुज मूर्ती आहे.
इतिहासातील नोंदींनुसार, शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी शहाजी राजांनी सुरक्षित स्थळ म्हणून राजमाता जिजाऊ बाईंना बाळंतपणासाठी शिवनेरीवर ठेवले होते. त्यावेळी परिसरात मोघलांचे थैमान सुरू होते. जाळपोळ, लुटालूट हे नित्याचेच झाले होते. संपूर्ण जनता त्रस्त होती. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जिजाऊंनी या देवीला नवस केला होता. या देवीच्या नावारून शिवाजी हे नाव ठेवण्यात आले होते.
नवरात्रोत्सवात शिवाई मंदिरात नऊ दिवसांचा सोहळा असतो. त्यावेळी दररोज कीर्तन, प्रवचन, जागरण असे कार्यक्रम असतात. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कुसूर गावातील ग्रामस्थांकडून हा सोहळा साजरा करण्यात येतो. यावेळी येथे येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद दिले जाते. भाविकांना दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मंदिरात देवीचे दर्शन घेता येते.