भोर तालुक्यात गुंजवणी व शिवगंगा या नद्यांच्या संगमावर मोहरी गाव वसले आहे. शिव काळापासून ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या या गावात हेमाडपंथी शैलीतील अमृतेश्वर मंदिर आहे. ते यादवकालीन असल्याचे सांगितले जाते. काशीखंड ग्रंथामध्ये मोहरीच्या या देवस्थानाचा उल्लेख आहे.
गुंजवणी नदीमुळे परिसराला गुंजण मावळ, असे संबोधले जायचे. छत्रपतींच्या काळात गुंजण मावळावर शिळीमकर, जेधे, बांधल या देशमुखांचे वर्चस्व होते. हे देवस्थान शिळीमकर – देशमुख यांचे कुलदैवत होय. शिळीमकर यांच्या कार्यकाळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. त्यानंतर पेशव्यांच्या काळात १७६३ मध्ये कळसाचे काम झाल्याच्या नोंदी आहेत.
भोर शहरापासून साधारणतः १५ किमी अंतरावर अमृतेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रशस्त परिसरात चारही बाजूंनी बंदिस्त आवार आहे. मंदिराबाहेर शक्तीचे प्रतीक असलेल्या गंडभेरुंडाचे एक शिल्प आहे आणि ते अत्यंत प्राचीन समजले जाते. त्यामध्ये गरुडासारखा दोन मुखे असलेला काल्पनिक पक्षी आहे.
मंदिराच्या परिसरात सुबक दीपमाळ आहे. काही वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी मूळ मंदिरासमोरच भव्य सभामंडप बांधला आहे. त्यामुळे आधीपासूनच मंदिरासमोरील मोकळ्या जागेवर असलेला नंदीमंडप आता सभामंडपाचाच एक भाग बनला आहे.
मूळ मंदिर दगडी बांधकामातील आहे. सभामंडप व गाभारा, अशी त्याची रचना आहे. सभामंडपात १६ दगडी खांब आहेत आणि त्यावर मंदिराचा कळस आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर डाव्या बाजूला गणेशमूर्ती; तर उजवीकडे पाच मुखे असलेल्या गाईचे शिल्प आहे. त्याशिवाय येथे काळ्या पाषाणातील दोन भैरव मूर्ती आहेत. त्यापैकी एक नृत्य करणाऱ्या भैरवाची आहे. नृत्यावस्थेतील ही मूर्ती दुर्मीळ समजली जाते.
गाभाऱ्यात शंकराची स्वयंभू पिंडी आहे. त्यावर उत्सवाच्या वेळी पितळी मुखवटा ठेवला जातो. पिंडीच्या मागील बाजूला लक्ष्मी-विष्णूची मूर्ती आहे. त्याखाली मानवरूपातील गरुडमूर्ती आहे. या गरुडाच्या कानात कुंडले, गळ्यात हार आणि पोटावर नागबंध आहे. विष्णूमूर्ती चतुर्भुज आहे. विष्णूच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे आणि तिचा उजवा हात विष्णूच्या गळ्याभोवती आहे. येथील पिंडीखालून बाराही महिने पाणी वाहत असते
आणि तेथून ते मंदिराच्या उत्तरेला असलेल्या कुंडात जाते. मंदिर परिसरात दगडी बांधकामातील तीन कुंडे आहेत. तसेच दगडी चौथऱ्यावर मंदिराचा सभामंडप व गाभारा आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला दीपमाळ आहे आणि मंदिर परिसरात मध्ययुगातील काही मूर्ती पाहायला मिळतात.
मंदिराच्या जीर्णोद्धारप्रसंगी जमिनीखाली अनेक मूर्ती सापडल्या होत्या. त्यात शंकराचीही एक सुंदर मूर्ती होती; जी मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे. सहा हात असलेले शंकराचे हे शिल्प अत्यंत दुर्मीळ समजले जाते. मूर्तीच्या डावीकडील तीन हातांत त्रिशूल, कवटी व पात्र आहे; तर उजवीकडील हातांमध्ये डमरू, माळ व परशू आहे. या मूर्तीला कंबरपट्टाही आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व दादोजी कोंडदेव हे या मंदिर परिसरात बसूनच परिसरातल्या गावांतील अंतर्गत तंटे सोडविण्यासाठी न्यायनिवाडा करीत असत, असे सांगितले जाते. सुभेदार सर्जेराव मांग यांना महाप्रचंड तोफ रायगडावर घेऊन जाण्याची जबाबदारी येथेच देण्यात आली होती. दोन घराण्यांतील वाद मिटवण्यासाठी १६९० मध्ये याच मंदिरात दिव्य प्रयोगही
(उकळते तेल किंवा अग्नीसमोर खरे-खोटे करणे) झाले होते. या मंदिराची आख्यायिका अशी की, येथील एका शेतकऱ्याच्या दोन गाई नेहमी ओढ्याकाठी पान्हा सोडत असत.
ग्रामस्थांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी ती जागा खोदली असता, तेथे दोन शिवपिंडी सापडल्या. त्यातील एक पिंडी वरच्या भागात नेऊन, तेथे शिव मंदिर उभारावे, असा त्या शेतकऱ्याचा मानस होता. परंतु, काही केल्या ती पिंडी तेथून त्याला हलवता आली नाही. त्याच वेळी त्याला शंकराने ‘ज्या गाई मला दुग्धाभिषेक करीत होत्या, त्यांची दोन खोंडे (नर वासरू) लावून मला बाहेर काढण्याचा प्रयत्न कर; तुला यश मिळेल’, असा स्वप्नदृष्टांत दिला. स्वप्नदृष्टांतानुसार तसे करताच त्याला यश मिळाले आणि सध्या असलेल्या मंदिराच्या जागी ती पिंडी आणण्यात आली.
दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार गणेश व कार्तिकस्वामी यांच्या पृथ्वी प्रदक्षिणेची कथा या ठिकाणी घडली होती. येथील गाभाऱ्यापुढे असलेल्या दगडाभोवती तीन वेळा गायत्री मंत्रासह प्रदक्षिणा केली असता, पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचे पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे.
गुढीपाडवा व त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी येथे मोठी जत्रा असते. सर्व गावकऱ्यांकडून मंदिरापुढे असंख्य पणत्या लावून दीपोत्सव साजरा केला जातो. चैत्र पाडव्याला येथून शिखरशिंगणापूरला कावड नेली जाते. वर्षातून येणाऱ्या प्रत्येक सोमवती अमावस्येला देवाला पालखीत बसवून येथील संगमावर नेले जाते. भाविकांना पहाटेपासून रात्रीपर्यंत या मंदिरात दर्शन घेता येते.