ओझरचा श्रीविघ्नहर


ओझर ता. जुन्नर, जि. पुणे


अष्टविनायकांतील सातवा, जुन्नर तालुक्यातील दुसरा आणि श्रीमंत असा गणपती म्हणजे ओझरचा श्रीविघ्नहर! कुकडी नदीच्या रमणीय पात्राशेजारी विघ्नहराचे भव्य मंदिर आहे. दुरूनच या मंदिराचा उंच, सुबक कळस भाविकांचे लक्ष वेधून घेतो. हे देवालय पूर्वाभिमुख आहे. त्यास उंच दगडी तटबंदी आहे. ती एवढी रुंद आहे की, त्यावरून सहज चालत जाता येते. मंदिरास विशाल प्रवेशद्वार आहे. दगडी पायऱ्या चढून प्रवेशद्वारात येताना आपले लक्ष वेधून घेतात ते त्याच्या दोन्ही बाजूंस कोरलेले भालदार, चोपदार. त्यावर ध्यानमग्न आणि वाचनमग्न अशा दोन ऋषींच्या मूर्ती कोरल्या असून, द्वारपट्टीवर गजाननाची मूर्ती आणि ऐश्वर्याचे प्रतीक असलेले दोन गजराज आहेत.

प्रवेशद्वाराचा उंच उंबरा ओलांडून आत जाताच दोन ओवऱ्या दिसतात. त्या समोरच दगडी फरसबंदीवर दोन भव्य दीपमाळा आहेत. त्याही दगडानेच बांधलेल्या आहेत. उत्सवप्रसंगी शेकडो दिव्यांनी त्या उजळून निघतात. त्या प्रकाशाने लखलखणारे मंदिर खूप खुलून दिसते. मंदिराच्या सभामंडपात अष्टविनायक व जुन्या चित्रशैलीतील धार्मिक चित्रे चितारलेली आहेत.

गाभाऱ्यात चांदीच्या महिरपी कमानीत असलेली विघ्नहराची शेंदूरचर्चित स्वयंभू मूर्ती आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची असून मूर्तीचे नेत्र माणकांचे तर माथ्यावर हिरा आहे. गणेशमूर्तीच्या दोन्ही बाजूंस रिद्धी आणि सिद्धी यांच्या लहान मूर्ती आहेत. भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येत नसल्याने याच गणेशाची प्रतिकृती समोर ठेवलेली आहे. त्याची भाविकांना पूजा करता येते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर मंदिराला प्रदक्षिणा घालून दर्शनसोहळा पूर्ण करता येतो. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या पारिजातक, शमी, कण्हेर आदी झाडांमुळे हा परिसर खुलून दिसतो.

हा गणपती सकल विघ्ने हरणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. याबाबत आख्यायिका अशी, की राजा अभिनंदन याने त्रिलोकाचा स्वामी होण्यासाठी यज्ञ सुरू केला. त्यामुळे इंद्राचे आसन डळमळीत होऊ लागले. इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्याकरीता विघ्नासुराची उत्पत्ती केली. या दैत्याने पृथ्वीलोकातील सर्वच यज्ञांत विघ्न आणण्यास सुरुवात केली. मनुष्यप्राण्यांस मोठी पिडा केली. त्यामुळे ऋषीमुनींनी पार्शव ऋषींच्या नेतृत्वाखाली गजाननाची प्रार्थना सुरू केली. गजानन प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी त्यास विघ्नासुराचे संकट निवारण्याची विनंती केली. त्यानुसार या क्षेत्री विघ्नासुर आणि गणपती यांचे तुंबळ युद्ध झाले. त्यात विघ्नासुराचा पराभव झाला. तो गणपतीस शरण गेला. त्यावर गणपतीने त्याला, जेथे गणेशाची पूजा केली जाते तेथे न जाण्याच्या अटीवर सोडून दिले. त्यावेळी विघ्नासुराने गणपतीला विनंती केली, की तुमचे नाव घेण्याआधी भक्तगणांनी माझे नाव घ्यावे व याच ठिकाणी तुम्ही वास्तव्य करावे. त्यानुसार गणपतीने विघ्नेश्वर वा विघ्नहर असे नाव धारण करून ओझर तीर्थक्षेत्री वास्तव्य केले. तेच हे विघ्नहराचे मंदिर.

पौराणिक कथेप्रमाणेच या मंदिराचा संबंध इतिहासाशीही आहे. पुण्याचे पेशवे हे गजाननाचे भक्त होते. १७८५ मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी या देवळाचा गाभारा बांधला आणि त्यावर सोनेरी कळस चढविला, असे सांगण्यात येते.

या मंदिराचा कारभार श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे चालविला जातो. येथे भाद्रपद व माघ चतुर्थीस मोठा उत्सव साजरा केला जातो. भाविकांची येथे सतत वर्दळ असते. त्यांच्यासाठी येथे भव्य भक्तनिवास बांधण्यात आलेला असून, भोजन, निवास आणि धार्मिक विधी यांची अल्पदरात व्यवस्था केली जाते. ओझर देवस्थान ट्रस्टतर्फे विविध सामाजिक कार्येही केली जातात. अत्यंत कमी खर्चात ट्रस्टतर्फे सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. दररोज पहाटे ५ वाजता गणेशाची पूजा-अर्चा झाल्यावर रात्री ११ पर्यंत भाविकांना गजाननाचे दर्शन घेता येते. अंगारकी चतुर्दशीच्या दिवशी हीच वेळ पहाटे ४ ते रात्री ११ पर्यंत असते. सकाळी ७.३० वाजता महाआरती, दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती व रात्री १० वाजता शेजारती होते. मंदिर समितीतर्फे भाविकांना देण्यात येणाऱ्या महाप्रसादाची वेळ सकाळी १० ते दुपारी १ व सायंकाळी ७.३० ते रात्री १०.३० अशी आहे.

उपयुक्त माहिती:


  • कल्याणवरून १२५ किमी, तर पुण्यावरून ८५ किमी अंतरावर 

  • पुण्यातील अनेक भागांतून एसटीची सुविधा

  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • भक्तनिवास व प्रसादालयाची उत्तम सुविधा

  • संपर्क : देवस्थान ट्रस्ट : ०२१३२ २८८३३०, २८८५३०
Back To Home