मुंबई-ठाण्यापासून जवळच असलेल्या भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या अकलोली येथे रामेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिरासमोर श्रीरामाने बाण मारून निर्माण केलेली गरम पाण्याची तीन कुंडे आहेत. वज्रेश्वरी परिसरातील गरम पाण्याच्या कुंडांपैकी एक असलेल्या या कुंडांमध्ये स्नान केल्यास त्वचारोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या कुंडांमध्ये स्नान करण्यासाठी तसेच या मंदिरातील जागृत रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येथे येतात.
रामेश्वर हे शंकराचे एक नाव आहे. या नावाबद्दलची पौराणिक कथा अशी आहे की श्रीरामाने रावणाचा वध केला, पण रावण हा ब्राह्मण होता. त्यामुळे श्रीरामास ब्रह्महत्येचे पाप लागले. त्याचे क्षालन करण्यासाठी श्रीरामाने शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा करावी, असे ऋषींनी सांगितले. तेव्हा सीतेने समुद्रतीरी वालुकालिंग तयार केले. तेच शिवलिंग रामेश्वरम् म्हणून ओळखले जाऊ लागले. ऋषींनी श्रीरामाला रामेश्वर या नावाचा अर्थ विषद करून सांगण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीरामाने सांगितले होते की ‘रामस्य ईश्वरः सः यः रामेश्वरः’ म्हणजे जो रामाचा ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. शिवशंकर हा माझा ईश्वर आहे. तेव्हा रामेश्वर म्हणजे शंकर.
अकलोली येथील रामेश्वर मंदिराची आख्यायिका या पौराणिक आख्यायिकेशी मिळती-जुळती आहे. या मंदिराबाबत अशी कथा सांगितली जाते की रामायण काळात हा दंडकारण्याचा भाग होता. विंध्याचल पर्वतापासून गोदावरीपर्यंतच्या परिसरात दंडकारण्य पसरलेले होते. वनवासात असताना श्रीराम-लक्ष्मण-सीता यांचे वनामध्ये किमान दहा वर्षे वास्तव्य होते. या काळात ते उत्तर कोकणातही आले असावेत. याचे कारण वाल्मिकी रामायणाच्या अरण्यकाण्डामध्ये श्रीरामांनी दंडकारण्यातील वास्तव्य काळात पनसान् म्हणजे फणसाचा वृक्ष पाहिल्याचा उल्लेख आहे. हा वृक्ष महाराष्ट्राच्या कोकण भागामध्ये प्रामुख्याने आढळतो. या भागात आले असताना वज्रेश्वरी देवीच्या मंदिर परिसरात या ठिकाणी श्रीरामाने पुजेकरीता शिवपिंडीची स्थापना केली. पाण्याकरीता त्यांनी जमिनीत बाण मारून कुंड तयार केले. या कुंडात स्नान करून व या पिंडीची मनोभावे पूजा करून ते पुढे मार्गस्थ झाले. श्रीरामाने स्थापिलेली म्हणून या शिवपिंडीस रामेश्वर असे संबोधले जाते. येथील कुंडेही श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या नावाने ओळखली जातात. मंदिरापासून जवळच असलेल्या अकलोली गावात, तानसा नदीच्या तीरावर गरम पाण्याची सात कुंडे आहेत. या कुंडातील पाण्याने स्नान केल्यावरही त्वचारोग बरे होतात, अशी श्रद्धा असल्याने अनेक भाविक येथे स्नान करण्यासाठी येतात.
रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात प्राचीन वृक्ष आहेत. येथील एका वृक्षाजवळ व मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोर प्राचीन दगडी दीपमाळ आहे. या दीपमाळेच्या उजवीकडे साईधाम मंदिर आहे. मिरा-भाईंदर येथील साईभक्त वासुभाई नम्बियार यांनी हे साई मंदिर उभारले. रामेश्वर मंदिरासमोर ही तीन कुंडे आहेत. या कुंडांपैकी सीता कुंडातील पाणी तुलनेने कमी गरम असते. राम कुंडातील पाणी सीता कुंडापेक्षा गरम, तर लक्ष्मण कुंडातील पाणी राम कुंडापेक्षा गरम असते. या कुंडांमध्ये उतरण्यासाठी चारही बाजुने पायऱ्या आहेत. या गरम पाण्यामध्ये गंधक व अन्य खनिजे असतात. त्यातील औषधी गुणधर्मामुळे या कुंडांमध्ये स्नान केल्याने त्वचारोग बरे होतात, असे मानले जाते. भूगर्भातील लाव्हारसामुळे खडक तापतात. त्याच्या संपर्कात आलेले पाणी तापते. काही ठिकाणी ते भूगर्भातून वर येते. दख्खनचे पठार हे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लाखो वर्षांपूर्वी तयार झाले. त्यामुळे या भागात अनेक ठिकाणी असे झरे आढळतात.
या मंदिर परिसरात स्वामी नित्यानंद यांनी आठ वर्षे वास्तव्य केलेली खोली आहे. नित्यानंद स्वामी हे मूळचे केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील होते. लहानपणापासूनच त्यांच्यातील दिव्यत्वाची प्रचिती लोकांस येत होती. तारुण्यावस्थेत असताना त्यांनी हिमालय, वाराणसी, रामेश्वरम, उडिपी, मंगळुरु आदी ठिकाणी प्रवास केला. जेथे जात तेथे आपल्या दैवी शक्तीने ते लोकांच्या दुःखाचे हरण करत. काही वर्षे दक्षिण कर्नाटकमधील कान्हनगड नजीकच्या गुरुवन येथे त्यांचे वास्तव्य होते. तेथील गुहेत ते ध्यान करत असत. देशभर भ्रमंती केल्यानंतर ते १९३७ मध्ये मुंबई नजीकच्या तानसा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या अकलोली आणि वज्रेश्वरी परिसरात आले. अकलोली येथील मदिर परिसरात त्यांनी सुमारे आठ वर्षे ध्यानधारणा केली. यासोबतच त्यांनी येथेही लोकांना उपदेश देण्याचे कार्य सुरू ठेवले. ते ज्या खोलीत राहात असत तेथील एका चौथऱ्यावर त्यांची मूर्ती आहे. त्यासमोरच त्यांच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. या खोलीतील भिंतींवर स्वामी नित्यानंद यांच्या अनेक प्रतिमा आहेत.
कुंडांसमोर रामेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार आहे. दर्शनमंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराभोवती तटबंदीप्रमाणे पक्की भिंत आहे. मंदिराच्या घुमटाकार शिखरावरील देवकोष्ठकांमध्ये देव-देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिरावर ऋषिमुनींच्याही मूर्ती आहेत. दर्शनमंडपात गर्भगृहासमोरील चौथऱ्यावर अखंड पाषाणात कोरलेली नंदीची मूर्ती आहे व त्यासमोर कासव मूर्ती कोरलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ डावीकडील देवकोष्ठकात गणेशाची तर उजवीकडे विष्णूची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या खालील बाजूस द्वारपाल आहेत. गर्भगृहाच्या चौकटीवर मध्यभागी ललाटबिंबावर गणेशमूर्ती कोरण्यात आली आहे. चार-पाच पायऱ्या उतरून गर्भगृहात यावे लागते. गर्भगृहात प्राचीन शिवपिंडी आहे. त्यावर नागाने छत्र धरले आहे. शिवपिंडीच्या मागील बाजूला असलेल्या भिंतीजवळ पार्वती मातेची मूर्ती आहे. मूर्तीजवळील एका देवकोष्ठकात कृष्णाची मूर्ती आहे. पार्वती मातेच्या मूर्तीच्या वरील बाजूस शिवशंकराची प्रतिमा आहे. मंदिर परिसरात हनुमान तसेच दत्ताचेही स्थान आहे.
या मंदिरात होळी, महाशिवरात्री, दत्त जयंतीच्या दिवशी मोठे उत्सव होतात. महाशिवरात्रीला मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप येते. या दिवशी जवळील कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर शेकडो भक्त रामेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावतात. या दिवशी पिंडीवर अभिषेक, महाआरती झाल्यावर भाविकांना साबुदाण्याच्या खिचडीचा प्रसाद देण्यात येतो. सायंकाळी मंदिरातून पालखी निघते. या उत्सवाच्या दिवशी मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून जातो. मंदिरापासून जवळच तानसा नदीवर गरम पाण्याचे सात कुंड आहेत. त्यापैकी नदी काठावर सूर्य, चंद्र, श्री कुंड आणि सुभाष कुंड अशी चार कुंडे आहेत. इतर तीन कुंडे नदीपात्रात आहेत. या कुंडांमध्येही स्नान करण्यासाठी अनेक भाविक येतात.
नदीपात्राच्या समोरच्या दिशेला असलेल्या केलठन गावाजवळ शिर्डी येथील साईबाबा मंदिराचे प्रतिरूप असलेले मंदिर आहे. परिसरातील ‘प्रतिशिर्डी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरालाही अनेक भाविक भेट देतात. मूळचे शिर्डी येथील रहिवासी असलेल्या यशवंत कांगणे नावाच्या व्यक्तीने दहा वर्षांपूर्वी केलठण येथे जमीन विकत घेऊन श्री ईश्वरधाम ट्रस्ट स्थापन केला. नंतर येथे हे मंदिर उभारले. या मंदिराची रचना, बांधकाम तसेच गर्भगृह शिर्डीतील साई मंदिराप्रमाणेच आहे. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात आल्यावर समोरच गुरुस्थान दिसते. डावीकडे ‘गुंजाबाई की रसोई’ आहे. येथे भाविकांना अल्प दरात भोजन मिळते. मंदिरासमोर डावीकडे शिवशंकराची ध्यानस्थ मुद्रेतील भव्य मूर्ती आहे. मंदिर परिसरात शनिमंदिर, शिवमंदिर तसेच गणेश मंदिरही आहे. याशिवाय नवग्रह, संत जलाराम बाप्पा, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे.