सिद्धिविनायक /ओंकारेश्वर मंदिर

पोखरबाव-दाभोळे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

देवगड तालुक्यातील दाभोळे येथील निसर्गसमृद्ध परिसरात असलेले सिद्धिविनायक गणपती मंदिर व या मंदिराच्या खालच्या बाजूला खळाळत्या झऱ्याच्या पाण्यातील पंचमुखी शिवलिंग असलेले ओंकारेश्वर मंदिर हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. असे सांगितले जाते की सिद्धिविनायकाचे स्थान जागृत असून येथील मूर्ती ही प्राचीन आहे. या दोन्ही मंदिरांच्या शेजारी असलेल्या प्राचीन विहिरीमुळे हे देवस्थान पोखरबाव गणपती म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी येथे केवळ सिद्धिविनायक गणपतीचे प्राचीन मंदिर होते. या मंदिरात दैनंदिन पूजाविधी करणाऱ्या दाभोळे राऊतवाडीतील पुजारी श्रीधर राऊत यांना एका रात्री स्वप्न पडले. त्यामध्ये गणेश मंदिराखाली असलेल्या पोखरबाव विहिरीतून एक दिव्य पुरुष हातात शिवपिंडी घेऊन बाहेर पडला व त्याने ती पिंडी पुजाऱ्याच्या हातात देऊन तिचे विधिवत पूजन सुरू करण्यास सांगितले. स्वप्नदृष्टांतानुसार या पुजाऱ्याने गावकऱ्यांच्या मदतीने मंदिराच्या खालील बाजूस असलेल्या विहिरीत अनेक दिवस शोध घेतला. त्यानंतर त्यांना पाण्याखाली पंचमुखी शिवलिंग सापडले. ग्रामस्थांनी गगनगिरी महाराजांकडे जाऊन सापडलेल्या शिवलिंगाबाबत सांगितले. अनेक वर्षे पाण्यात राहिलेल्या या शिवलिंगाची स्थापना गणेश मंदिराच्या खालच्या बाजूने वाहणाऱ्या झऱ्याशेजारी मंदिर बांधून करावी, अशी सूचना त्यांनी दिली. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी येथे मंदिर बांधून त्यात या पंचमुखी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली.

देवगड आचरा मार्गावरील दाभोळे गावापासून काही अंतरावर पोखरबाव गणपती मंदिर आहे. रस्त्याला लागून व डोंगर उतारावर असलेल्या या छोटेखानी मंदिराचे बांधकाम तसे साधेसे आहे. भोवतीने खुल्या पद्धतीचा सभामंडप व मध्यभागी गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपापासून काहीसे वर षटकोनी आकारातील गर्भगृह आहे. या गर्भगृहातील एका चौथऱ्यावर लाडू हातात घेतलेल्या मूषकराजाची मूर्ती आहे. त्यासमोर वज्रपीठावर शुभ्र संगमरवरी चौरंगावर अखंड काळ्या पाषाणात कोरलेली प्राचीन गणेशमूर्ती आहे. ही मूर्ती त्रिकोणी पाषाणातून घडविलेली असावी, असे भासते. ही मूर्ती चतुर्भुज आहे व दोन्ही पाय गुढघ्यात वाकवून पसरविलेले आहेत. मूर्तीच्या शेजारी एक लहानसा मूषक आहे. असे सांगितले जाते की पूर्वी ही गणेशमूर्ती तीन झाडांच्या मध्यभागी उघड्यावर होती; परंतु रस्ता रुंदीकरणामुळे ती मागे घेण्यात आलेली आहे. प्राचीन असलेल्या या स्थानावर १९७९ मध्ये मंदिर बांधण्यात आले.

या गर्भगृहाच्या उजव्या बाजूने खाली असलेल्या ओंकारेश्वर शिव मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. येथून सुमारे ३० ते ३५ पायऱ्या उतरून झऱ्यापर्यंत जाता येते. पावसाळ्याच्या दिवसांत हा झरा ओलांडता येत नाही; परंतु इतर दिवशी मात्र या झऱ्याच्या पाण्यातून पलीकडे असलेल्या ओंकारेश्वर मंदिरात जाता येते. पायरी मार्गावरून खाली उतरत असताना काही मूर्ती व शिल्पे दिसतात. त्यामध्ये शिवशंकर, श्रीदत्त, गजानन महाराज व विशाल फण्याचा शेषनाग, झेप घेणारा वाघ, द्रोणागिरी पर्वतासह उड्डाण करणारा हनुमान यांचा समावेश आहे. ओंकारेश्वर मंदिरासमोर एक प्राचीन विहीर आहे, ती पोखरबाव म्हणून प्रसिद्ध आहे.

ओढा पार करून गेल्यावर ओंकारेश्वर मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपात एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे, तर गर्भगृहाच्या मध्यभागी साधारणतः कासवाच्या आकाराची पंचमुखी शिवपिंडी आहे. या शिवपिंडीच्या पाषाणात एका बाजूला कासवाचे मुख, दुसऱ्या बाजूस चंद्रकोर, तिसऱ्या बाजूस शिव व पार्वती मुख असल्याचे सांगण्यात येते. शिवपिंडीच्या वरच्या बाजूस मध्यभागी लहानसे शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या मागील बाजूस एक गुंफा आहे. मंदिराच्या सभामंडपावर एक लहानसे घुमटाकार शिखर व गर्भगृहावर मुख्य शिखर आहे.

या मंदिरात गणेश जयंती व महाशिवरात्री हे दिवस मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या दिवशी देवांचे महाअभिषेक, रुद्र अभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी हजारो भाविक येथे सिद्धिविनायक व ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी येतात. प्रत्येक मंगळवारी व संकष्टी चतुर्थीलाही भाविकांची येथे गर्दी असते. नवसाला पावणारा गणपती अशी या देवाची ख्याती आहे. काही शुल्क आकारून या मंदिरात अभिषेक, एकादष्णी, सहस्त्रावर्तन व सत्यनारायण पूजा असे विधी केले जातात.

उपयुक्त माहिती

  • देवगडपासून ११ किमी, तर दाभोळे गावापासून २ किमी अंतरावर
  • देवगड व आचरा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home