नारायणी धाम

तुंगार्ली, लोणावळा, जि. पुणे


थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहराजवळील तुंगार्ली गावात नारायणी देवीचे सुंदर मंदिर आहे. साडेचार एकर जागेवर उभ्या असलेल्या या प्रशस्त मंदिरात दर्शनासाठी कायमच भाविकांची गर्दी असते. लोणावळा रेल्वे स्थानकापासून जवळच हे मंदिर आहे.

मुख्य रस्त्याला लागून असलेल्या कमानीतून आत शिरताच मंदिराचा स्वच्छ व नीटनेटका परिसर नजरेस पडतो. तेथील सुंदर उद्यान, नानाविध वृक्ष, फुलझाडे आणि त्यामध्ये स्थित संपूर्ण पांढऱ्या संगमरवराचा वापर करून उभारण्यात आलेले सुंदर मंदिर.

मंदिराच्या प्रवेश मार्गावर अनेक कारंजी लावण्यात आली आहेत. उंच उडणाऱ्या कारंजांमधून उडणारे तुषार अंगावर झेलतच मंदिरासमोर जाता येते. २१ संगमरवरी पायऱ्या चढून प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. बारीक कलाकुसर केलेले नक्षीदार खांब या सभामंडपाची शोभा वाढवितात. सभामंडपाच्या छतावरही आकर्षक नक्षीकाम आहे.

सभामंडपात उभे राहिल्यावर नारायणी देवीच्या मुख्य मूर्तीसह डाव्या व उजव्या बाजूला चांदीच्या मखरातील गणपती व मारुतीच्या सुंदर मूर्ती नजरेस पडतात. ८ फुटांच्या अखंड संगमरवरातून देवीची अत्यंत सुबक व रेखीव मूर्ती तयार करण्यात आली आहे. नारायणी देवी ही दुर्गामातेचे रूप समजले जाते. सिंहावर आरूढ असलेल्या देवीच्या डोक्यावर रत्नजडीत मुकुट व गळ्यातील दागिने, तसेच अष्टभुजांमध्ये असणाऱ्या आयुधांमध्येही रत्नजडीत कलाकुसर केलेली आहे. सोनेरी मखरामध्ये स्थानापन्न असलेली देवीची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. अनेक भाविक येथील भारावलेल्या वातावरणात नामस्मरण करण्यात दंग असतात.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे संगमरवरी बांधकाम. हे संगमरवर खास राजस्थानहून मागविण्यात आले होते. राजस्थानमधीलच विशेष कारागिरांनी ही सुंदर कलाकुसर केली आहे. त्यासाठी त्यांना पाच वर्षे लागली. २००२ मध्ये भाविकांसाठी या मंदिराची दारे खुली झाली.

मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी येथे अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक भक्तनिवास व अत्यल्पदरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय परिसरातील नागरिकांच्या बौद्धिक विकासासाठी ट्रस्टतर्फे सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. महिलांसाठी संगणक, शिवणकाम असे प्रशिक्षणही दिले जाते. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी ट्रस्टतर्फे हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये अल्प दरात रुग्णांवर उपचार केले जातात. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी अनेक रुग्ण येथे येतात.

मुख्य मंदिराच्या बाजूलाच गोशाळा असून त्यात ५० गायी आहेत. भाविकांना आपल्या हाताने या गोमातांना चारा देऊन आशीर्वाद घेता येतात. मंदिर संकुलामध्ये असलेल्या सुसज्ज सभागृहात सत्संग भरविण्यात येतो. याशिवाय होम-हवनही केले जातात. दहा हजार भाविक बसतील एवढी या सभागृहाची क्षमता आहे.

या ठिकाणी गणेश चतुर्थी, नवरात्री, हनुमान जयंती, श्री कृष्ण जन्माष्टमी आणि दिवाळी हे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. त्यात हजारो भाविक सहभागी होतात. याशिवाय डिसेंबरच्या शेवटी ८ दिवस येथे भागवत सप्ताह होतो. मंदिरात दररोज सकाळी ७ वाजता मंगला आरती, सकाळी साडेआठला श्रृंगार आरती, संध्याकाळी ७ वाजता राजभोग आरती व रात्री ९ वाजता शयन आरती होते. भाविकांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ३.१५ ते रात्री ९.३० या वेळेत देवदर्शन करता येते.

उपयुक्त माहिती: 


  • मुंबईपासून ८४ तर लोणावळ्यापासून दोन किमी अंतरावर
  • मुंबई, ठाणे, पुणे, रायगड भागातून एसटीची सेवा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर ट्रस्टतर्फे अल्पदरात निवास व न्याहरीची सुविधा
  • संपर्क : ०२११४ २७० ०४७
Back To Home