कैलादेवी मंदिर

पाचोरा, ता. पाचोरा, जि. जळगाव

राजराजेश्वरी महायोगिनी माता कैलादेवीचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आहे. राजस्थानातील त्रिकूट पर्वतावर, करौली येथे वसलेली जागृत देवी कैला मातेच्या मंदिरासारख्याच मूर्ती असलेले हे देवस्थान शहरातील भाविकांचेशक्तिपीठआहे. देवकीने कारागृहात जन्म दिलेल्या आठव्या अपत्याला मारण्याच्या प्रयत्नात कंसाच्या हातातून निसटून आकाशात उडालेली कन्या नंतर त्रिकूट पर्वतावर विराजमान झाली, अशी कैलादेवीची आख्यायिका आहे. पाचोरा येथील मंदिरातील देवीही करौलीतील देवीप्रमाणेच नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

आदिशक्ती महायोगिनी मायेच्या अवताररूपात पूजल्या जाणाऱ्या करौली येथील कैलादेवीबाबतची पौराणिक कथा अशी आहे की नंदयशोदेच्या अपत्याच्या रूपाने तिने जन्म घेतला होता. देवकीवसुदेवाच्या विवाहादरम्यान, या दोघांच्या आठव्या पुत्राच्या हातून मथुरेचा राजा असलेल्या कंसाचा वध होईल, अशी आकाशवाणी झाली होती. त्या रागातून कंसाने देवकी आणि वसुदेवाला कारागृहात डांबले होते. त्यांच्या सहा अपत्यांना त्याने कारागृहात जन्मतःच मारले. सहावा पुत्र बलराम दैवी इच्छेने वसुदेवाच्या इतर पत्नींपैकी एक असलेल्या रोहिणीच्या गर्भाशयात हस्तांतरित झाल्यामुळे जिवंत राहिला. या दाम्पत्याचा आठवा पुत्र म्हणून कृष्णाने जन्म घेतला

कृष्णाला यशोदेजवळ सोडून ये आणि तिच्या नवजात मुलीला आपल्यासोबत कारागृहात घेऊन ये, असे विष्णूने वसुदेवाला सांगितले. विष्णूच्या सांगण्यानुसार वसुदेवाने या कन्येला आपल्यासोबत कारागृहात आणले. कंसाने या बालिकेला दगडावर आपटून मारण्याचा प्रयत्न केला असता, तिने दिव्य रूप धारण केले. ‘तुझा वध ज्याच्या हातून होणार आहे, त्याने जन्म घेतला असून तो सुरक्षित ठिकाणी आहे’, असे सांगत ती कंसाच्या हातातून निसटून आकाशात गेली. कलियुगात माझे नावकैलाअसे असेल आणि भाविककैलेश्वरीच्या रूपात माझे पूजन करतील, अशी या देवीने आकाशवाणी केल्याचे स्कंद पुराणातील ६५ व्या अध्यायात नमूद आहे. काही ठिकाणी या देवीला विंध्यवासिनी आणि हिंगलाज मातेच्या रूपातही पूजले जाते

या देवीचे मूळ स्थान करौली येथे आहे. ही देवी केदारगिरी नावाच्या ऋषींसमोर प्रगट झाली. मी लवकरच परिसरातील लोकांच्या कल्याणासाठी येथे येईन, असे आश्वासन तिने दिले. त्यानुसार अकराव्या शतकाच्या आसपास देवीची मूर्ती करौलीच्या जंगलात आढळली. एका लोककथेनुसार, आक्रमकांपासून बचाव करण्यासाठी नगरकोटहून पलायन करणाऱ्या एका साधूने ही मूर्ती बैलगाडीत ठेवली. ती बैलगाडी जंगलातील एका पर्वताच्या मध्यभागी, कालिसील नदीच्या तटाजवळ येऊन थांबली. काही केल्या बैल तेथून हलेनात. त्यानंतर दैवी संकेतानुसार मूर्तीची त्या ठिकाणीच प्रतिष्ठापना करण्यात आली. १७२३ मध्ये करौलीचे यदुवंशी शासक महाराजा गोपाल सिंह यांनी तिचे मंदिर उभारले. येथे त्यांनी चामुंडा मातेच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना केली. चामुंडा मातेची मूर्ती त्यांनी गागरौन किल्ल्याजवळील गुहेतून आणली होती. कैला देवीची मूर्ती चामुंडा देवीपेक्षा उंच असून ही मूर्ती थोडी तिरकी आहे. त्यामागेही एक आख्यायिका आहे. एके दिवशी मंदिरात आलेल्या एका भक्ताला देवीचे दर्शन घेतल्याशिवाय माघारी पाठवण्यात आले. त्यामुळे नाराज झालेली देवी, तो भक्त गेलेल्या दिशेने मान फिरवून पाहू लागली. तेव्हापासून तिचे मुख तिरके आहे

३० वर्षांपूर्वी पाचोरा येथील प्रसिद्ध उद्योजक जगदीश अग्रवाल ऊर्फ पुरुषोत्तम अग्रवाल यांनी त्यांची कुलदेवता असलेल्या या देवीचे मंदिर पाचोरा येथे उभारले. नागपूरमुंबई महामार्गावर एम. एम. महाविद्यालयाजवळ हे मंदिर आहे. येथील कैला देवीची प्रसन्न मूर्ती तसेच मंदिरात अखंड तेवत असणाऱ्या दोन ज्योती करौली येथून आणण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका ज्योतीत तेल तर दुसऱ्या ज्योतीत शुद्ध तूप घालण्यात येते

मंदिर परिसरात येताच मंदिराचे आकर्षक शिखर नजरेत भरते. सुबक नक्षीकाम केलेल्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताच उजवीकडे कैला देवीचे मंदिर दिसते. पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेल्या प्रांगणात भैरवनाथ तसेच महादेव यांचीही मंदिरे आहेत. महादेव मंदिरात शिवपंचायतन (शंकराचे कुटुंब) आहे. येथील शिवपिंडीच्या मागील चौथऱ्यावर डावीकडे कार्तिक स्वामी, मध्ये पार्वतीमाता तर उजवीकडे गणेश यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. पिंडीच्या समोरील बाजूस नंदीची संगमरवरी मूर्ती आहे. भैरवनाथ आणि महादेव मंदिराच्या बाजूला यज्ञशाळा आहे. येथील कैलादेवीच्या मंदिराची वास्तू महाराष्ट्र, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील प्रसिद्ध शिल्पकारांनी साकारली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर येथील खांबांवर आकर्षक कलाकुसर आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात मध्यभागी राक्षसाचे कीर्तिमुख त्याच्या दोन्ही बाजूंना मयूर आहेत. सभामंडप, गर्भगृह प्रदक्षिणा मार्ग असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपाला भिंती नसून त्याऐवजी येथील खांबांवर स्टेनलेस स्टीलच्या जाळ्या लावण्यात आल्या आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या गर्भगृहातील संगमरवरी वज्रपीठावर नक्षीदार मखरात कैलादेवी आणि चामुंडामातेच्या शेंदूरचर्चित मूर्ती आहेत. करौली येथील मंदिराप्रमाणेच येथील कैलादेवीची मूर्तीही चामुंडा मातेच्या मूर्तीपेक्षा थोडी उंच असून तिची मान तिरकी आहे. दोन्ही मूर्ती मुकुटधारी आणि वस्त्रालंकारित असून त्यांच्यावर चांदीचे छत्र आहे. दोन्ही मूर्तींच्या मध्यभागी मोरपीस आहे

या देवीची मनोभावे पूजा केल्यास सुखसमृद्धी प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथे सूर्योदयाच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी नित्यनेमाने आरती होते. मंदिरात चैत्री शारदीय हे दोन्ही नवरात्रोत्सव उत्साहात साजरे होतात. नऊही दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रम होतात. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान येथे गरबा होतो. वैशाख शुद्ध अष्टमीला मंदिराचा स्थापना दिन सोहळा असतो. त्यानिमित्त दोन दिवस येथे होमहवन, महाआरती, भंडारा तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होतात. उत्सवांदरम्यान मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात येते. मंदिराचा परिसर फुलांनी सजवण्यात येतो

उपयुक्त माहिती

  • पाचोरा बस स्थानकापासून पायी १० मिनिटांवर
  • छत्रपती संभाजी नगर जळगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७८४३०७०८४४
Back To Home