गुप्त विठोबा मंदिर

बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे


‘प्रतिपंढरपूर’ अशी ख्याती असलेले जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील ‘गुप्त विठोबा मंदिर’ संपूर्ण जिल्ह्यातील भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण मंदिरच जमिनीच्या पोटात सापडले होते, म्हणूनच त्याला ‘गुप्त विठोबा मंदिर’ असे नाव पडले आहे. आषाढी व कार्तिकीला येथे हजारो भाविक दर्शनाला येतात.

बेल्हे गावापासून जवळच असलेल्या बांगरवाडीमध्ये हे विठ्ठल-रुक्मिणीचे स्थान आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी बेल्हे गावातून काहीसा कच्चा व नागमोडी रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या घनदाट वृक्षवल्लींमधून मंदिराकडे जावे लागते. डोंगराच्या शब्दशः कुशीत मंदिर उभे आहे. मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत मुक्तपणे मोर विहारताना दिसतात.

मंदिराची आख्यायिका अशी, १९१७ साली एक गुराखी येथील मोकळ्या माळावर गायी चरण्यासाठी घेऊन गेला होता. सायंकाळी परतीच्या वेळी कळपात एक गाय कमी असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने शोध घेतला असता आता ज्या ठिकाणी हे मंदिर आहे तेथे मातीखाली गायीचा पाय रुतला होता. इतर ग्रामस्थांच्या मदतीने त्याने तेथून गायीची सुटका केली. त्याच रात्री देवाने त्याला स्वप्नदृष्टांत देऊन ‘मी येथे अडकलो आहे, मला बाहेर काढ’, असे सांगितले. गुराख्याने इतर ग्रामस्थांना जेव्हा आपल्या स्वप्नाबाबत सांगितले तेव्हा त्यांनी ज्या ठिकाणी गायीचा पाय रुतला होता ती जागा खणून पाहण्याचे ठरविले. त्यानुसार खोदकाम करता करता गावकऱ्यांना तेथे एक भुयार लागले. संपूर्ण खोदकामानंतर विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीसह संपूर्ण मंदिरच तेथे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जमिनीच्या पोटात सापडलेले मंदिर, म्हणून याचे नामकरण गावकऱ्यांनी ‘गुप्त विठोबा मंदिर’ असे केले.

गुप्त विठोबाचे मूळ मंदिर जमिनीच्या पोटात असले तरी त्यावर १९५५ मध्ये ग्रामस्थांनी एक सुंदर विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बांधले आहे. भव्य सभागृह व गाभारा अशी त्याची रचना आहे. सभामंडपाचे बांधकाम २००६-०७ या वर्षात केले आहे. गाभाऱ्यात विठ्ठल-रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती आहेत. या गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गावरून एक खाली जाणारे भुयार लागते. तेच गुप्त विठोबाचे मूळ मंदिर. तेथील पायऱ्यांवरून खाली उतरल्यानंतर १० बाय १५ फुटांची एक छोटी गुहा आहे. त्याच्या समोरच एका कोनाड्यात विठ्ठल – रुक्मिणीच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात.
दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठा उत्सव असतो. आषाढी एकादशीला मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी तीन ते साडेतीन टन धान्याचा प्रसाद बनविला जातो. पंचक्रोशीतील गावांबरोबरच संगमनेर, पारनेर, आंबेगाव, अकोला येथून या मंदिरात दिंड्या येतात. आषाढीच्या आदल्या दिवसापासून भाविकांची येथे गर्दी असते. आषाढी-कार्तिकेला दिवसभर मंदिर समितीतर्फे भाविकांना प्रसाद वाटप केले जाते. या दिवशी दिवसभर धार्मिक कार्यक्रम सुरू असतात.

भाविकांना दररोज सकाळी सात ते अकरा व सायंकाळी चार ते सहा या वेळेत मंदिरात देवदर्शन करता येते. प्रत्येक एकादशीला हीच वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात अशी असते. रोज सकाळी सात वाजता देवापुढे हरिपाठ केला जातो. आषाढी व कार्तिकीला येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी एसटीतर्फे विशेष सेवा पुरविली जाते.

उपयुक्त माहिती:

  • पुण्यापासून १०१ तर जुन्नरपासून ४२ किमी अंतरावर
  • बेल्हे या गावापर्यंत एसटीची सुविधा
  • आषाढी, कार्तिकीला एसटीची विशेष सेवा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • उत्सवाव्यतिरिक्त निवास व न्याहरीची व्यवस्था नाही
Back To Home