तळ्यातील गणपती

सारसबाग, पुणे, ता. जि. पुणे

पुण्यातील सारसबागेचा ‘तळ्यातला गणपती’ हे पुणेकरांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी अठराव्या शतकाच्या मध्यावर पर्वतीच्या पायथ्याशी एका मोठ्या तलावाची निर्मिती केली होती. तलावाच्या मध्यभागी हे मंदिर वसलेले असल्यामुळे याला ‘तळ्यातला गणपती’ असे नाव पडले. पेशवेकालीन वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिरात उजव्या सोंडेची सिद्धिविनायक गणेशमूर्ती आहे. नवसाला पावणारा हा गणपती भाविकांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. कालांतराने तलावाच्या जागी आता एक सुंदर उद्यान विकसित करण्यात आले आहे.

श्रीमंत बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांच्या कारकीर्दीत पुणे शहराचा विस्तार आणि विकास अत्यंत वेगाने झाला. वाढत्या लोकसंख्येमुळे शहराला होणारा पाणीपुरवठा अपुरा पडू लागल्याने नानासाहेबांनी प्रथम कात्रज तलावाची उभारणी करून दगडी व खापरी नळांद्वारे शहरात पाणी आणले. तथापि कात्रजच्या पाण्याला एक सक्षम पर्याय निर्माण करण्यासह पर्वतीच्या पायथ्याचे सुशोभीकरण व्हावे, या उद्देशाने त्यांनी १७५० च्या सुमारास एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी केली. पर्वती टेकडीच्या परिसरातून वाहणाऱ्या आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून तिथे एक भव्य तलाव निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले. या ओढ्याचा प्रवाह एका भिंतीद्वारे अडवून तसेच २५ एकर जमीन खोदून या तलावाचे काम सुरू झाले. पावसाळ्यात कात्रज तलावाचे अतिरिक्त पाणी आणि आंबिल ओढ्याचे पाणी या तलावात सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. पुराचे अतिरिक्त पाणी पुन्हा नदीकडे वळविण्यासाठी तलावाच्या पश्चिम भागात एका विशेष सांडव्याची व्यवस्थाही करण्यात आली.

या तलावाचे बांधकाम सुरू असताना घडलेली एक घटना अशी की तलावाच्या खोदकामाचा वेग मंद असल्याची माहिती मिळाल्यावर नानासाहेब पेशव्यांनी स्वतः त्या स्थळाला भेट देऊन पाहणी केली. कामाचा मंद झालेला वेग पाहून त्यांनी हत्तीच्या अंबारीतून खाली उतरून स्वतः एक मोठी शिळा उचलली आणि ती बांधाच्या जागी नेऊन ठेवली. आपल्या राजाला स्वतः कष्ट करताना पाहून उपस्थित मजूर व नागरिक खजील झाले. यामुळे कामाला वेग आला आणि १७५४ मध्ये हे काम पूर्ण झाले. या तलावाच्या मध्यभागी राखून ठेवलेल्या सुमारे २५,००० चौरस फूट विस्ताराच्या बेटावरच पुढे सुंदर बाग विकसित करण्यात आली. या तलावात व परिसरात सारस पक्ष्यांचा वावर असल्यामुळे या बागेचे नामकरण ‘सारसबाग’ असे करण्यात आले.

तलावाच्या निर्मितीनंतर काही वर्षांनी, म्हणजेच १७८४ मध्ये श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बेटावर श्री सिद्धिविनायकाचे एक छोटेसे मंदिर उभारले. उजव्या सोंडेच्या या गणपतीला तेव्हापासून ‘तळ्यातला गणपती’ म्हणून ओळखले जाते. पेशवेकालीन राजकीय व सामाजिक जीवनात या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व होते. सवाई माधवराव पेशवे, महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांसारख्या धुरंधरांच्या अनेक गुप्त राजकीय बैठकी तसेच मसलती या तलावातील नौकाविहारादरम्यान पार पडत असत. विशेष म्हणजे, या चर्चांची गोपनीयता राखण्यासाठी नौका चालविण्याचे काम बऱ्याचदा मराठी भाषा न समजणाऱ्या आफ्रिकन वंशाच्या ‘सिद्दी’ लोकाकडे किंवा कर्णबधिर नावाड्यांकडे सोपविले जात असे.

मराठा साम्राज्याचा अस्त होऊन १८१८ मध्ये पेशवाई संपुष्टात आल्यानंतर, ब्रिटिश राजवटीत या तलावाच्या देखभालीकडे कालांतराने दुर्लक्ष झाले. १८४२ पर्यंत देवस्थानांची व्यवस्था पेशवाई पद्धतीनुसारच सुरू होती, परंतु १८६१ मध्ये इंग्रज सरकारने तलावातील बेटाची जागा श्री देवदेवेश्वर संस्थानाकडे ठेवून उर्वरित जागा पुणे नगरपालिककडे हस्तांतरित केली. या काळात तलावात गाळ व पाण्याचे डबके साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून शहराच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. परिणामी, नगरपालिकेने हा तलाव कचरा आणि राडारोडा टाकून बुजविण्याचा निर्णय घेतला. एकेकाळी टिळक रस्त्यापर्यंत पसरलेला हा जलाशय बुजवून तिथे सध्याचे मैदान व बाग निर्माण करण्यात आली, मात्र बेटावरील मंदिराचे अस्तित्व कायम राहिले. १९३६-३७ च्या सुमारास न्यायाधीश रा. ब. कोंडो महादेव कुमठेकर यांनी भाविकांच्या सोयीसाठी मंदिरात जाण्यासाठी संगमरवरी पायऱ्या आणि पत्र्याचा सभामंडप बांधून दिला.

या ऐतिहासिक परिसराचा आधुनिक कायापालट करण्याचे श्रेय पुण्याचे तत्कालीन आयुक्त भुजंगराव कुलकर्णी यांना जाते. १९६८-६९ मध्ये त्यांनी तलावाच्या उर्वरित जागेत एक सुसज्ज आणि सुंदर उद्यान विकसित करण्याची योजना प्रत्यक्षात आणली. पुणे महानगरपालिकेने हा प्रकल्प अत्यंत नियोजनबद्ध रीतीने राबवून तिथे हिरवळ, वृक्षलागवड, ‘जॉगिंग ट्रॅक’ आणि आसनव्यवस्था निर्माण केली. उद्यानाच्या विकासामुळे भाविकांची संख्या वाढल्याने जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करणे आवश्यक ठरले. मंदिराच्या विश्वस्त मंडळाने पुढाकार घेऊन वास्तुविशारद उ. म. आपटे यांच्याकडून नवीन मंदिराचा आराखडा तयार करून घेतला. ३ डिसेंबर १९६९ रोजी तत्कालीन महापौर वि. भा. पाटील यांच्या हस्ते कोनशिला समारंभ पार पडला आणि २० मार्च १९७० रोजी नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या संपूर्ण नूतनीकरणासाठी त्याकाळी सुमारे सव्वासहा लाख रुपये खर्च आला होता.

पुण्याच्या सुप्रसिद्ध सारसबागेत वसलेले हे मंदिर मराठा व उत्तर भारतीय स्थापत्यशैलीचा संगम आहे. मंदिराकडे येण्याचा मार्ग सारसबागेच्या बाहेरील ‘खाऊ गल्लीतून’ आहे. बागेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील तीन कमानींच्या माथ्यावर आमलक व कळस आहेत. सुमारे ८० वर्षांपूर्वी या तलावाचे रूपांतर बागेत करण्यात आल्याने हा भाग रस्त्यापेक्षा सखल आहे. बागेच्या मध्यभागी असलेल्या तलावातील बेटावर हे मंदिर स्थित आहे. या मंदिरात येण्यासाठी तलावावर पूल बांधण्यात आला आहे. हा पूल संपल्यावर उंचावर असलेल्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या चढून यावे लागते.

सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सुमारे ४० फूट रुंद व ४८ फूट लांब असलेला हा सभामंडप पूर्वाभिमुख आहे. सभामंडपातील नक्षीदार स्तंभांच्या रांगा एकमेकांना कमानींनी जोडलेल्या आहेत. अर्धखुल्या सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या पाषाणी बांधणीच्या गर्भगृहाच्या बाह्य भिंतींवर संगमरवरी फरशीचे आच्छादन केले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला नक्षीदार द्वारशाखा व ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. गर्भगृहातील वज्रपीठावरील मखरात वस्त्रे, अलंकार व सुवर्णमुकुट धारण केलेली सिद्धिविनायकाची मूर्ती विराजमान आहे. मूर्तीवर छताला चांदीचे छत्र टांगलेले आहे, तसेच वज्रपीठ व मखर यांना चांदीचे नक्षीदार आच्छादन आहे. वज्रपीठाच्या मागील भिंतीवरील चांदीच्या पटलावर पर्ण, पुष्प, लता आणि वृक्ष यांची सुबक नक्षी आहे. मंदिरातील या मूर्तीमध्ये कालानुरूप बदल झाले असून माधवराव पेशवे यांनी स्थापित केलेली मूळ मूर्ती भंग पावल्यामुळे १८८२ मध्ये दुसरी मूर्ती बसविण्यात आली. त्याही मूर्तीची झीज झाल्यामुळे २८ मे १९९० रोजी उजव्या सोंडेच्या नवीन संगमरवरी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावरील चौकोनी शिखरावर उरुश्रुंगी पद्धतीची लघूशिखरे आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका आणि त्यावर निमुळत्या रचनेचा उंच कळस आहे.

मंदिराच्या मागील बाजूच्या ‘गणेश दर्शन संग्रहालयात’ प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या २००० हून अधिक गणेशमूर्ती पाहावयास मिळतात. मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे व इतर महापुरुषांची तेलचित्रे लावण्यात आली आहेत. तसेच येथे पेशव्यांची वंशावळ व ऐतिहासिक माहितीही लावण्यात आली आहे.

या मंदिरात वर्षभर विविध धार्मिक व सांस्कृतिक उत्सव साजरे होतात. त्यामध्ये भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी हा प्रमुख उत्सव आहे. या काळात गणपतीच्या दर्शनासाठी पुणेकरांची आणि पर्यटकांची अलोट गर्दी असते. येथे माघी गणेशोत्सवही भक्तिभावाने साजरा होतो. त्यावेळी विशेष पूजा, अभिषेक व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेला होणारा दीपोत्सव हे येथील मुख्य आकर्षण आहे. यावेळी हजारो पणत्यांच्या प्रकाशात संपूर्ण मंदिर व बागेचा परिसर उजळून निघतो. याव्यतिरिक्त प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला आणि विशेषतः अंगारकी चतुर्थीला मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागतात.

उपयुक्त माहिती

  • पुणे रेल्वे स्थानक व बस स्थानकापासून ५.५ किमी अंतरावर
  • स्वारगेट एसटी स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • देशभरातील अनेक शहरांतून येथे येण्यासाठी विमान, रेल्वे व बस सेवा उपब्लध
  • खासगी वाहने सारसबागेच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी: ०२० – २४४२१३२३, मो. ८९२८७२०४१५
Back To Home